जातिभेदविरहित समाजनिर्मितीसाठी...

09 Apr 2019 21:43:29



 


कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही, चातुर्वण्य व जातिभेद ही मानवाचीच निर्मिती आहेअसे रोखठोक बोलणार्‍या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांची १९२ वी जयंती दि. ११ एप्रिल रोजी सारा देश साजरी करणार आहे. त्यानिमित्ताने हा लेखप्रपंच.

 

सुमारे दीडशे-पावणेदोनशे वर्षांपूर्वी महात्मा फुलेंनी जे सामाजिक विचार समाजापुढे ठेवले, ज्या समस्यांसाठी रक्ताचे पाणी करून ते वणवण फिरले, जनजागृती करत राहिले, त्या समस्या आज संपल्या आहेत का? मोठ्या अभिमानाने आज आम्ही स्वत:ला महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, लहुजी वस्ताद, संत रोहिदास, संत गाडगेमहाराज यांचे पाईक म्हणत आहोत, पण आपल्या आचारात या महान विभुतींच्या विचारांचा थोडातरी अंश उतरला आहे का? हे आत्मचिंतन आपण प्रत्येकाने करण्याची वेळ आली आहे. या तत्त्वचिंतकांच्या विचारांचा जागर सातत्याने करत राहणे हा खरा त्यांच्या विचारांचा विजय असणार आहे आणि तसे होणे आजची सामाजिक परिस्थिती पाहता अत्यावश्यक आहे. महात्मा फुलेंपासून ते बाबासाहेब आंबेडकर हयात असेपर्यंत जातीविरहित समाज निर्माण होण्याची एक आशा जनसामान्यात फुलत होती. ती आशेची ज्योत आज विझू पाहत आहे आणि ती विझू न देणं हेच आज सर्वांचं कर्तव्य आहे. महात्मा जोतीराव फुलेंना हे माहीत होतं की बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्—य आणि समाजातील जातिभेद हे केवळ शिक्षणानेच नष्ट होऊ शकतात, म्हणून तर त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. म. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. आज शिक्षणाचा टक्का वाढला आहे पण, ज्यासाठी जनमानसाने शिक्षित व्हावे असा महात्मा फुलेंचा हट्ट होता. तो बंधुभाव, ती एकात्मता मात्र आज कुठेच दिसत नाही.

 

असे असले तरीही महात्मा फुलेंच्या विचारांवर, त्यांच्या कार्यावर अतूट श्रद्धा आणि विश्वास असणार्‍या अनेक ज्ञातिसंस्था आज कार्यरत आहेत. हे करत असतानाच, समाजातील जातिभेदाची दरी कमी करण्यासाठीदेखील तन-मन-धनाने समर्पित होऊन या ज्ञातिसंस्था काम करत आहेत. हा प्रकाशाचा एक किरण उद्याचा सूर्य व्हावा, यासाठी त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. सर्वांच्या आशीर्वादाची, सहकार्याची आणि सहयोगाची गरज आहेे. अशा संस्थांना त्यांच्या कार्यात प्रोत्साहन मिळावे, ते करत असलेल्या कामाचे कौतुक व्हावे म्हणून ‘सामाजिक समरसता मंचा’च्यावतीने ‘महात्मा जोतीराव फुले समरसता पुरस्कार’ दिला जातो. आजवर अनेक संस्थांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या वर्षीही पुण्यातील विविध समाजात काम करणार्‍या सहा ज्ञातिसंस्थांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.‘महाराष्ट्र नाभिक महामंडळ सकल नाभिक समाज,’ ‘अखिल भारतीय होलार समाज संघटना,’ ‘पुणे शहर हिंदू खाटीक समाज,’ ‘हिंदू मातंग क्रांती सेना,’ ‘केतय्या स्वामी प्रतिष्ठान,’ ‘हराळे वैष्णव समाज’ या सहा ज्ञातिसंस्थांची निवड त्यांच्या समाजातला बंधुभाव वाढवण्यासाठी, जातिभेदाचे विष नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी केली गेली आहे, जेणेकरून इतर ज्ञातिसंस्थांनादेखील प्रेरणा मिळेल आणि लवकरच भारतात एक जातिभेद विरहित समाजाची निर्मिती होऊ शकेल. अशा या ज्ञातिसंस्थांच्या कार्याचा थोडक्यात आढावा इथे घेता येऊ शकेल असे मला वाटते

 

नाभिक समाजाला संघटीत करण्यासाठी सभापती शंकरराव जगताप, नारायण संगमवार आणि शशिकांत चव्हाण यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या या संस्थेचे राज्यव्यापी संघटन आहे. नाभिक समाजाच्या सर्वकश उन्नतीबरोबरच जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी ही संस्था नेहमी पुढाकार घेत असते. जेव्हा महात्मा फुलेंनी विधवा महिलांच्या समस्यांवर आवाज उठवला आणि कोणत्याही विधवा महिलेने केशवपन करू नये, असा क्रांतिकारी विचार मांडला तेव्हा याच समाजाने पुढे येऊनआम्ही यापुढे कोणत्याही विधवा महिलेचे केस कापणार नाही,’ असा निर्णय घेऊन क्रांतिसूर्याचे तेज वाढवले होते आणि एक सामाजिक क्रांती घडवून आणली होती. या समाजाचे हे योगदान कोणताही समाज विसरू शकणार नाही. त्याप्रमाणेच पंढरपूरच्या वारीत येणार्‍या सर्व जातीधर्माच्या वारकर्यांची मोफत दाढी करण्याची सेवा देण्याबरोबरच त्यांच्यासाठी अन्नदान, आरोग्य शिबीर अशा अनेक समाज जोडणार्‍या योजना वरील सर्वच ज्ञातिसंस्थांमार्फत राबवल्या जातात. अरुण घोलप यांनी स्थापन केलेल्या ‘पुणे शहर हिंदू खाटीक समाजया ज्ञातिसंस्थेमार्फत इतर समाजाबरोबर घेऊनच सर्व उपक्रम राबवले जातात. हराळे वैष्णव समाजाची स्वत:ची धर्मशाळा आहे. या धर्मशाळेत अनेक उपक्रम राबवले जातात. त्याचा लाभ सर्व जातिधर्मातले वारकरी प्रतिवर्षी घेत असतात. सुरेश(नाना) पवार यांनी स्थापन केलेल्या ‘हिंदू मातंग क्रांतिसेना’ आपल्या समाजातल्या लोकांचा स्वाभिमान जागवण्यासोबतचआपण सारे प्रथम भारतीय आहोत’ हे ब्रीदवाक्य समाजाच्या मनात कोरायला शिकवतो. महिलांना स्वरक्षण करता यावे म्हणून सर्वच समाजातील महिलांना आत्मरक्षणाचे प्रशिक्षण प्रतिवर्षी दिले जाते.

 

दरवर्षी ‘सामाजिक समता सन्मान सोहळ्या’चे आयोजन केले जाते. समाजातील जातिभेद नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या गणेश मंडळालादेखील या संस्थेत़र्फे सन्मानित केले जाते. बुरूड समाजाची ‘केतय्या स्वामी प्रतिष्ठानइतर ज्ञातिसंस्थांबरोबर एकत्रितपणे अनेक सामाजिक उपक्रम राबवित असते आणि ‘अखिल भारतीय होलार समाज संघटना’ ही ज्ञातिसंस्था तर देशपातळीवर काम करते. अ‍ॅड. एकनाथ जावीर हे या संघटनेचे आणि होलार समाजाचे राष्ट्रीय नेतृत्व करतात. परंपरेने मंगलकार्यात ‘वाजाप’ म्हणजे वाजंत्र्यांचे काम करणारा होलार समाज विदर्भात ‘होलिया’ नावाने ओळखला जातो. या समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी ही संस्थाज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळा’च्या माध्यमातून मदत करत असते. समाजातील अनिष्ट रुढी व परंपरा यांच्याविरोधात संघटना सातत्याने जनजागृती करत आलेली आहे. अनेक ठिकाणी या समाजाला मंदिरप्रवेश नाकारण्यात आला होता. त्या विरोधात खरसुंडी, सांगोला, पुसद येथील कार्ला येथे मंदिरप्रवेशासाठी या ज्ञातिसंस्थेने विधायक संघर्ष करत एक नवा विचार समाजाला दिला आहे. या संघर्षातून सामाजिक तेढ निर्माण होण्याऐवजी अन्य समाजाबरोबर एकोपा निर्माण होण्यात मदत झाली आहे. म्हणूनच अशा एकात्मता साधणार्‍या या ज्ञातिसंस्था हिंदुस्थानाची संपत्ती आहे, असे मी मानतो. जातिभेद विरहित समाजाची निर्मिती व्हावी, एकूण सारा समाज भेदभाव विसरून समरस व्हावा यासाठी १९८४ पासूनसामाजिक समरसता मंच’ काम करत आहे. सर्व जातिधर्मातील महान विभुती हे कोण्या एका समाजाचे वा जातीचे नसून संपूर्ण राष्ट्राचे आहेत. त्यांचे विचार हे कोणत्या एका समाजासाठी नसून सर्वांसाठी आहे, हे कधीतरी आपल्या सर्वांना कळले पाहिजे. यासाठी ‘सामाजिक समरसता मंच’ अनेक सामाजिक उपक्रम राबवत आला आहे.

 

या सहा ज्ञातिसंस्थांना समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक म्हणून गुरुवार, दि. ११ एप्रिल रोजी महात्मा जोतीराव फुले यांच्या १९२ व्या जयंतीप्रसंगी समताभूमी फुलेवाडा, पुणे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळ्कर यांच्या हस्ते तसेच डॉ. सुवर्णाताई रावळ (अध्यक्ष, भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र) यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महात्मा जोतीराव फुले समरसता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. जातिभेद विरहित समाज हे आपल्या सर्वांचेच पहाटस्वप्न आहे. चल, मग उठून कामाला लागूया, एक नवा समाज, एक सशक्त समाज, एक नवा समर्थ भारत घडवण्यासाठी... महात्मा जोतीराव फुले यांना त्यांच्या १९२व्या जयंतीनिमित्त नमन करण्याचा यापेक्षा अधिक चांगला मार्ग कोणता असू शकतो.

 

- काशीनाथ पवार
 

लेखक समरसता साहित्य परिषद,

पश्चिम महाराष्ट्राचे संयोजक आहेत.

९७६५६33७७९, ९४२3४६९3२९



माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0