पोकळ आश्वासनांचा खेळ

    दिनांक  09-Apr-2019   शिक्षण म्हणजे भविष्याचा पासपोर्टच. एकदा का माणूस शिकला की, आपसूकच त्याला स्वहिताबरोबरच समाजहिताचीही जाणीव होते. त्याच्यातला विवेक जागृत होतो. महत्त्वाचे म्हणजे माणूस उत्पादनक्षम होतो. देशाच्या जडणघडणीत आपसूकच त्याच्याकडून कुठे तरी खारीचा वाटा उचलला जातो. पण, याच शिक्षण पद्धतीकडे काँग्रेसच्या सत्ताधार्‍यांनी मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. आज तीच काँग्रेस पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याची मोठाली आश्वासने देत ‘हम निभायेंगे’ ची घोषणा देताना दिसते. इतकेच नाही तर २०२३-२४ पर्यंत जीडीपीच्या ६ टक्के रक्कम ही शिक्षणावर खर्च करणार असल्याचेही काँग्रेसने आपल्या यंदाच्या जाहीरनाम्यात नमूद केले आहे. शिवाय, शाळांमध्ये पात्र शिक्षकांची भरती आणि उत्तम सोयीसुविधांचेही आश्वासन देऊन काँग्रेस पक्ष मोकळा झाला. शिक्षणाच्या बाबतीतही असेच फुकट धोरण जाहीर करून काँग्रेसने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांसह पालकांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. विशेष म्हणजे, काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात शिक्षणक्षेत्राशी संबंधित अशाच २५ पोकळ आश्वासनांचा पाऊस पाडला आहे. खरं तर यापैकी बहुतांश बाबींच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत भोगलेला सत्ताकाळही जास्तच म्हणावा लागेल. काँग्रेसच्या २००९ च्या जाहीरनाम्यावर नजर टाकली असता, त्यातील शिक्षणाशी संबंधित जवळपास ९० टक्के आश्वासनांची पूर्तता २०१४ पर्यंत झालेली दिसत नाही. जसे की, राष्ट्रीय महिला आयोगाच्या धरतीवर राष्ट्रीय विद्यार्थी आयोग आणि राष्ट्रीय तरुण आयोगाची स्थापना, राज्य आणि केंद्रातील शिक्षणाच्या दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र नियंत्रण संस्था, ईशान्य भारत तसेच जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांबरोबर होणारी भेदभावपूर्ण वागणूक रोखण्यासाठी प्रयत्न वगैरे वगैरे. फोल आश्वासनांची ही यादी बरीच मोठी आहे. पण, महत्त्वाचं म्हणजे, जी आश्वासने २००९ ते २०१४ मध्येही पूर्ण करता आली नाही, त्याचा यंदाच्या जाहीरनाम्यात साधा उल्लेखही काँग्रेसने जाणीवपूर्वक टाळलेला दिसतो. सध्या राहुल गांधी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतात. शिक्षण, रोजगारसंबंधी विचारलेल्या प्रश्नांचीही ते अगदी घोळून घोळून उत्तरं देतात. पण मोदी म्हणतात तसा, हा जाहीरनामा नाही, तर ‘ढकोसलापत्र’च म्हणावे लागेल, मग मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेचा असो वा शिक्षणाचा...

 

शिक्षणसुधारणेचा ‘संकल्प’

 

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील शिक्षणाची आश्वासनं ही किती पोकळ आणि उथळ आहेत, याचा परिचय भाजपच्या ‘संकल्पपत्रा’मधील शिक्षण विषयाअंतर्गतच्या १५ मुद्द्यांवर नजर टाकताच स्पष्ट होतो. काँग्रेसने एकीकडे मोफत आणि सक्तीच्या शिक्षणावर भर दिला असताना, भाजपने आपल्या संपूर्ण संकल्पपत्रात शिक्षणाच्या आधुनिकीकरणावर, दर्जा सुधारण्यावर अधिक भर दिलेला दिसतो. कारण, स्पष्ट आहे. शिक्षणाविषयी जनजागृतीत मोठा फरक पडला असून ग्रामीण भागातही विद्यार्थी शाळांपर्यंत पोहोचू लागले आहेत. पण, अद्याप उच्च शिक्षणाच्या संधी, शिक्षण कर्जावरील व्याज यांसारख्या समस्या कायम आहेत. या अनुषंगाने भाजपच्या ‘संकल्पपत्रा’त काही महत्त्वाच्या उपाययोजना प्रामुख्याने अधोरेखित केलेल्या दिसतात. यातील पहिला मुद्दा आहे, अध्ययन निष्पत्तीचा किंवा शिक्षणाच्या परिणामांचा. बरेचदा, विद्यार्थी अभ्यास करतात, घोकंपट्टी करून गुणही मिळवतात. पण, त्या अभ्यासक्रमामुळे त्यांच्या ज्ञानात, कौशल्यात काही भर पडली का, याचे उत्तर मात्र मिळत नाही. म्हणूनच, भाजपच्या संकल्पपत्रात विद्यार्थीकेंद्रित ‘अध्ययन निष्पत्ती’ ला प्राधान्य देण्यात आले असून विद्यार्थ्यांना ते शिकत असलेल्या प्रत्येक छोट्या-मोठ्या विषयांचा त्यांच्या दैनंदिन आयुष्यात, अभ्यासक्रमाच्या शेवटी कसा उपयोग होईल, हे पटवून दिले जाते. जेणेकरून विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन हा केवळ गुणसंपादनाचा न राहता कौशल्य-ज्ञानसंपादनाचा राहील. त्याचबरोबर देशभरातील हुशार विद्यार्थ्यांना एका छताखाली आणून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याची योजनाही संकल्पपत्रात नमूद केलेली दिसते. खासकरून असे विद्यार्थी, जे हुशार तर आहेतच, पण आर्थिक, सामाजिक परिस्थितीमुळे त्यांची पुढील वाटचाल खडतर आहे. त्यांना ‘पंतप्रधान कल्पक शिक्षण कार्यक्रमांतर्गत देशभरातून एकत्र आणले जाईल आणि त्यांच्या बुद्धिमत्तेला, विकासाला चालना मिळेल. त्याचबरोबर शिक्षकांचे प्रशिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाचा वर्गांमध्ये वापर, ऑनलाईन कोर्सेसची सोय, वैद्यकीय-अभियांत्रिकी महाविद्यालयांतील जागा पुढील पाच वर्षांमध्ये ५० टक्क्याने वाढविण्याचा प्रयत्न, शिक्षण संस्थांवर नियंत्रण आणि कायद्यामध्ये सुयोग्य बदल यांचाही समावेश या संकल्पपत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे जिथे काँग्रेसचा शिक्षणासंबंधी जाहीरनामा नुसती ‘थिअरी’ वाटतो, तिथे भाजपचे संकल्पपत्र हे ‘प्रॅक्टिकल’च म्हणावे लागेल.

 


माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat