सुरुवात लोकशाहीच्या नव्या युगाची

    दिनांक  08-Apr-2019   मालदीवमध्ये गेल्या काही काळात अस्थिरता निर्माण झाली होती. वृत्तपत्रे व वाहिन्यांवर बंदी, आणीबाणी, अशा परिस्थितीतून देश जात होता. आता शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नाशीद यांनी जाहीर केले.


मालदीवचे माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशीद यांनी शनिवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केला आहे. भारतापासून अवघ्या ७२० किलोमीटरवरील एका बेटावर वसलेल्या या देशातील हा विजय भारतासाठी सुखद बातमी देणारा आहे. चीन ज्या प्रकारे भारतालगतच्या देशांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करत आहे त्यानुसार नाशीद यांचा विजय भारतासाठी आनंदवार्ता मानली जात आहे. नाशीद हे भारताचे समर्थक आहेत. मालदिविय डेमोक्रेटिक पक्षाला ८७ पैकी एकूण ६० जागांवर विजय मिळाला आहे. एमडीपीने राष्ट्रपतिपदाची निवडणूक जिंकल्यानंतर आता संसदीय निवडणूकही जिंकली आहे. निवडून आल्यावर त्यांनी आता सरकारी भ्रष्टाचार संपवणे आणि सुधारणा करणे आदी प्रमुख मुद्दे जनतेसमोर मांडले. मालदीवमध्ये गेल्या काही काळात अस्थिरता निर्माण झाली होती. वृत्तपत्रे व वाहिन्यांवर बंदी, आणीबाणी, अशा परिस्थितीतून देश जात होता. आता शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नाशीद यांनी जाहीर केले. शनिवारी झालेल्या निवडणुकीत नाशीद यांच्या पक्षाला दोन तृतीयांश जागा मिळाल्या. चीनवर हिंदी महासागरात वचक ठेवण्यासाठी नाशीद यांचा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.

 

भारताच्या दक्षिणेकडील लहानसा देश मालदीव निसर्गसंपन्नतेने समृद्ध आहे. हिंदी महासागरातील एका बेटावरील हा लहानसा देश जगभरातील अनेक पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. मालदीवमध्ये विविध ११९२ लहान द्वीप आहेत. भारतातील अनेक सिनेकलाकारही या ठिकाणी सुट्टी घालवण्यासाठी येतात. समुद्रकिनार्‍यावरील पांढरीशुभ्र वाळू, स्वच्छ निळेशार पाणी आणि विविध जैवविविधतेने संपन्न अशा या लहानशा देशाचे आशियातील राजकारणात महत्त्वाचे स्थान आहे. काही दिवसांपूर्वी हा देश मोठ्या संकटात सापडला होता. तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल्ला यामिन यांनी आणीबाणी लागू केली होती. यावेळी मालदिविय डेमोक्रेटिक पक्षाच्या नऊ नेत्यांना अटक करण्यात आली होती. मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने या नेत्यांच्या सुटकेचे आदेश देऊनही मालदीवच्या मागील सरकारने ते मानले नव्हते. मालदीववरील हे संकट भारत आणि चीनच्या दृष्टिकोनात एकूणच आशियाई राजकारणात महत्त्वाचे मानले जाते. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करत या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली होती. चीनने इतर देशांनी यात लक्ष घालू नये, अशी भूमिका घेतली होती. अखेर मालदीवच्या भूमीवर नव्या विचारांची पहाट उजाडली. या शेजारी देशात समृद्ध होणारी लोकशाही आणि भारताशी मैत्री हा चीनसाठी चिंतेचा विषय आहे.

 

नाशिद यांचा इथवर येईपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. २००८ मध्ये ते पहिल्यांदा मालदीवचे राष्ट्रपती बनले होते. २०१२ मध्ये त्यांच्यावर सैन्याच्या आदेशानुसार, सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांना अटक करण्याचे आरोप लावण्यात आले होते. यामुळे त्यांना खुर्ची सोडावी लागली होती. नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत पीपीएम या पक्षाच्या अब्दुल यामिन यांना यश मिळाले. त्यानंतर त्यांनी नाशीद यांच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली. २०१५ मध्ये नाशीद यांना १३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यात आजारपणामुळे त्यांना ब्रिटनला आणि श्रीलंकेला जावे लागले. यादरम्यान नाशीदवर निवडणूक लढविण्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे पक्षाचे उपाध्यक्ष सोलीह यांना राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत उतरवले. सोलीह यांना यश मिळाल्यानंतर नाशीद यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रपतिपदाच्या या निवडणुकीनंतर नाशीद यांच्याविरोधातील पुरावेही न आढळल्याने त्यांना क्लिन चीट मिळाली. यानंतर त्यांनी देशभर प्रचाराचे काम सुरू केले. एप्रिलमध्ये झालेल्या या निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळाले. या राष्ट्राला चीनने आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी दरम्यानच्या काळात पुरेपूर प्रयत्न केले. मालदीवला नऊ हजार कोटींचे कर्ज देऊन पुन्हा दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. चीनने या देशांमध्ये विकासकामांसाठी कर्ज देऊन मजूरही चीनमधलेच लावले आहेत. परिणामी हा पैसा पुन्हा चीनमध्येच वळता होत आहे. ही बाब तिथल्या राजकारण्यांच्या लक्षात येऊ लागल्याने भारतापासून काही काळ दूर गेलेला हा देश आता पुन्हा मैत्रीचे संबंध प्रस्थापित करू पाहत आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat