‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’

    दिनांक  06-Apr-2019    


मुंबईचा समुद्रकिनारा हा प्रत्येक मुंबईकरासाठी आणि देशविदेशातून भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय. पण, प्लास्टिक कचरा व जलप्रदूषणामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांची रयाच गेली आहे. अशा या मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांना स्वच्छ करणाऱ्या काही हातांपैकी एक म्हणजे अ‍ॅड. अफरोज शाह. सनदशीर मार्गाने याविरोधात लढण्याऐवजी महात्मा गांधींच्या मार्गावर चालत त्यांनी ‘वर्सोवा बिच क्लिन अप’ ही समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम उभी केली आणि बघता बघता या मोहिमेला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. या मोहिमेची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील घेण्यात आली आणि एक मुंबईकर ठरला ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ.’


अफरोज शाह हे काही वर्षांपूर्वीच वर्सोव्याला स्थायिक झाले. त्यांच्या इमारतीच्या खिडकीतून वर्सोवा समुद्रकिनारा दिसायचा. ही जरी सुखद गोष्ट वाटत असली तरीही लाटांबरोबर वाहून येणाऱ्या कचऱ्यामुळे आणि त्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे अफरोज कायम अस्वस्थ असायचे. व्यवसायाने वकील असल्याने व्यवस्थेविरोधात सनदशीर मार्गाने लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. परंतु, अशा मार्गाने लढून हा कचरा उचलला जाईल का? आपल्या घरातल्या खिडकीतून कधी स्वच्छ हवा येईल का? घराच्या खिडकीत बसून कॉफीचे घोट घेत समुद्राच्या स्वच्छ लाटांचे कधी दर्शन होईल का? हे विचार त्यांच्या मनात येऊन गेले. ’चांगल्या कामाची सुरुवात आधी स्वतःपासून करा,’ या गांधीजींच्या विचारसरणीने प्रेरित होऊन मग स्वच्छतेचा वसाही स्वतःपासूनच घेण्याचा निर्णय अफरोज शाह यांनी घेतला. त्यांच्या या कामाला काही मित्रमंडळींनीही पाठिंबा दिला. अखेर ऑक्टोबर 2015 मध्ये त्यांनी ‘वर्सोवा बिच क्लिन अप’ ही मोहीम सुरू करत कालांतराने अवघ्या जगाचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. त्यांच्या या कार्याला आधी बॉलीवूडच्या मंडळींनी पाठिंबा दिला. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संयुक्त राष्ट्रानेही त्यांच्या या मोहिमेला कौतुकाची थाप दिली.

 

आज जगाच्या पटलावर समाजकार्यातील प्रमुख चेहरा म्हणून ओळख प्रस्थापित केलेले अफरोज शाह हे मूळचे मुंबईकरच. पवईसारख्या भागात त्यांचे बालपण गेले. मुंबई महापालिकेतील शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या अफरोज शाह यांचा मुंबई उच्च न्यायालयातील वकील होण्यापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे. वकिलीची सनद आणि सुवर्णपदक घेऊन ते महाविद्यालयातून बाहेर पडले. अफरोज यांचे वडील लतीफ शाह मुलाला घेऊन पवई तलाव येथे छंद म्हणून मासेमारीसाठी जात. त्यांना गळ टाकून कित्येक तास बसावे लागे. तेव्हा जाऊन कुठे तरी एखाद् दुसरा मासा गळाला लागे. अफरोज मात्र मासे लगेच का मिळत नाहीत, म्हणून वडिलांना भंडावून सोडत. मग वडीलही मुलाला त्या वयात संयमाचे चार धडे देत. “स्थिर गळ धरून राहिलास, तर मासा नक्कीच मिळेल,” असे समजावत. बालपणातच अफरोज यांच्यावर चांगले संस्कार झाले. वडिलांच्या अकाली निधनानंतर अफरोजला हेच संस्कार आयुष्यभराची शिदोरी म्हणून उपयोगास आले. वडिलांसोबत मासेमारी, वृक्षारोपण आदी छंद जोपासल्याने बालपणापासूनच पर्यावरणाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळेच आकर्षण निर्माण झाले. वडिलांच्या निधनानंतर आपसूकच घरची जबाबदारी अफरोज यांना सांभाळायची होती. शिक्षणही पालिकेच्या शाळेतले. त्यातूनच त्यांना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यावेळी शाळेत मिळणारा पोषण आहार आणि खाऊ अफरोजला खूप आवडायचा, अभ्यासातही ते तितकेच हुशार असल्याने या मुलाने वकिलीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि त्यावेळच्या बॅचचे ते सर्वोत्कृष्ट विद्यार्थी ठरले. मुंबई विद्यापीठातर्फे ‘गोल्ड मेडल’ देऊन त्याचा गौरव करण्यात आला. सारं काही सुरळीत सुरू होते. वांद्रे न्यायालयात वकिली करत असताना अंधेरी पश्चिमेला वर्सोवा गावात एक घर त्यांनी खरेदी केले होते. जागाही मोक्याची असल्याने खरेदी करण्याचा निर्णय ठरला. मात्र, घराबाहेर दिसणारा समुद्राबाहेरील कचरा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. बाहेर इतका सुंदर समुद्रकिनारा, मात्र किनाऱ्यावर गोळा होणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोलमुळे सारं चित्रचं विद्रुप झालं होतं.

 

यशाचा मूलमंत्र

 

निसर्गाकडून आपल्याला भरभरून मिळाले आहे. त्याची परतफेड करणे शक्यच नाही. त्यामुळे किमान आहे त्या नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करून ती आपण सर्वांनी जोपासायला हवी. त्यासाठी बाकी लोकं काय करतील याची वाट न बघता स्वतः दोन पावले पुढे या. मग बघा, तुमच्यापाठी हळूहळू अवघं जग उभे राहील...

 

व्यवसायाने वकील असणाऱ्या अफरोज यांना या विरोधात कायदेशीर लढाईही लढता आली असती. मात्र, त्यांनी गांधीजींच्या तत्त्वानुसार स्वतःपासून सुरुवात करण्याचा विचार केला. मित्रांनाही बोलून दाखवले. मग स्वच्छतेचे दिवस ठरले. आठवड्याच्या शनिवार आणि रविवारी अफरोज शाह आणि त्यांची टीम किनाऱ्याची स्वच्छता करू लागली. बघता बघता त्यांच्या या मोहिमेत लाखो हात जोडले गेले. बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक अभिनेते आणि इतर सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना पाठिंबा दर्शवला. आदित्य ठाकरे यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. ’मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चळवळीचे कौतुकही केले. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या कार्याची दखल घेण्यात आली. संयुक्त राष्ट्रातर्फे देण्यात येणारा ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार अफरोज यांना बहाल करण्यात आला. ’सीएनएन’तर्फे दिला जाणारा ’इंडियन ऑफ द इयर’ या पुरस्काराचेही ते मानकरी ठरले. अफरोज यांनी आता ही मोहीम आणखी व्यापक केली आहे. त्यांच्या स्वयंसेवकांच्या फौजेने मुंबईसह इतर महानगरातील किनारपट्टीवर स्वच्छता मोहीम सुरू केली. मिठी नदीचे पात्र स्वच्छ करण्याकडे ते सध्या लक्ष देत आहेत. मिठी नदीचे पात्र स्वच्छ करण्यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, फिल्टर पाडा, क्रांती नगर, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, साकीनाका, वांद्रे-कुर्ला संकुल, वांद्रे-माहिम भागातील कांदळवने आदी क्षेत्रातील नागरिकांसोबत स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. प्लास्टिक वर्गीकरणाचे प्रशिक्षणही त्यांनी झोपडपट्ट्यांमध्ये देण्यास सुरुवात केली आणि किनारा स्वच्छता मोहिमेला व्यापक स्वरूप प्राप्त झाले.

 

सध्या मिठी नदीच्या पात्रातल्या स्वच्छतेकडे अफरोज यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सद्यस्थितीला मिठी नदी किनाऱ्याचा दीड किमीचा परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. अजून लढाई मोठी आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी अफरोज शाह यांनी समाजमाध्यमे, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ‘प्रत्येकाने अफरोज शाह व्हायला हवे’ अशी मोहीम उभी केली आहे. स्वच्छतेसह कार्बन उत्सर्जनावरही जनजागृती करण्याची गरज असल्याचे अफरोज यांना वाटू लागले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी या मोहिमेलाही चळवळीचे स्वरूप देण्याचे ठरवले आहे. विजेच्या उपकरणांचा कमीतकमी वापर, सार्वजनिक वाहनांच्या वापरावर भर, अन्नाची नासाडी टाळणे यांसारख्या सवयी त्यांनी अंगी बाणल्या. कार्बन उत्सर्जन करणारी प्रमुख उपकरणे म्हणजे फ्रीज आणि वातानुकूलित यंत्रणा (एसी) ते वापरत नाहीत. त्यांनीच स्वच्छ केलेल्या त्यांच्या घराबाहेरील समुद्रकिनाऱ्यावरून मिळणाऱ्या नैसर्गिक हवेचा आस्वाद आता त्यांना घेता येतो. प्रत्येकाने मी किती कार्बन उत्सर्जनाला कारणीभूत ठरतो आहे, याचा विचार करून किमान दोन झाडे वर्षाला तरी लावायला हवीत, असे ते आवर्जून भेटणाऱ्याला सांगतात. पर्यावरण संवर्धनाचा वसा घेतलेल्या या अवलियाच्या आभाळभर कर्तृत्वाला त्यांच्यासारख्याच विचारांची आणि स्वतःची जबाबदारी समजून काम करण्याची गरज आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat