ग्रॅफाईटचा गणपती

    दिनांक  06-Apr-2019   



गणपती... 64 कलांचा अधिपती. ज्ञानाची ही देवता... पालघरमधील ‘परफेक्ट ग्रॅफाईट अ‍ॅण्ड इलेक्ट्रिकल्स’ कंपनीचे उद्योजक ‘एस. गणपती’ हे त्यांच्या नावाला अगदी पुरून उरणारे. प्रचंड हुशारी, चिकित्सक व्यवहारी स्वभाव, तरीही संस्कृतीशी नाळ जोडलेला आणि वयाची साठी ओलांडलेला हा ऊर्जावान उद्योजक. सोने वितळविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्रॅफाईटचे साचे-सामग्रीच्या निर्मितीचा त्यांचा व्यवसाय. तेव्हा, अशा या सर्जनशील आणि उद्यमशील ग्रॅफाईटच्या गणपतींचा हा जीवनप्रवास...


मुंबईतील गोरेगावमध्येच घरातल्या स्वयंपाकघरातच 24 सप्टेंबर, 1957 रोजी एस. गणपती यांचा एका तामिळ ब्राह्मण अय्यर कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील यजुर्वेद विद्वान होते आणि विशेषत: अय्यर समाजबांधवांच्या पूजा ते विधीवत पार पाडत. आयुष्य होम, मुंजीपासून ते मृत्यूपर्यंत, अगदी भक्तिभावाने आणि दक्षिणेच्या रकमेची कुठलीही अपेक्षा न करता. अशा परिस्थितीतही त्यांनी पाच मुलं आणि दोन मुलींचा सांभाळ केला. त्यांच्या शिक्षणाची आबाळ होऊ दिली नाही. गोरेगावमध्येच साऊथ इंडियन स्कूलमध्ये गणपती यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. त्यांची वृत्ती अगदी लहानपणापासून चिकित्सक. कुठलीही गोष्ट जशी दिसते, त्यावर त्यांचा विश्वास नसे. प्रत्येक गोष्टीच्या खोलात जाऊन ‘हे नेमके असेच का’ हे तपासण्याची जुनी सवय आज त्यांच्या व्यवसायाची एक मुख्य गरजच म्हणता येईल. गणपतींची चित्रकलाही अगदी सुरेख. त्यांना लहानपणी कमर्शियल आर्टिस्ट व्हायची इच्छा होती. पण, आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या वडिलांना या क्षेत्राबाबत मिळालेला काहीसा नकारात्मक सूर पाहता, ती संधीही हुकली. त्यानंतर एअर फोर्समध्येही एअरमन पदासाठीच्या भरती प्रक्रियेतही केवळ एका निकषामुळे ते मेडिकली ‘अनफिट’ ठरले. पण, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मात्र अगदी ‘फिट अ‍ॅण्ड फाईन.’ संघशाखेतील शारीरिक आणि बौद्धिकाच्या संस्कारांचाच तो परिणाम. त्यामुळे देशभक्ती, राष्ट्रप्रेमाची भावना अगदी त्यांच्या ओतप्रोत भरलेली. त्यांच्या वयाची मुले जेव्हा चित्रपटांच्या गीतांमध्ये हरवून जायची, तेव्हा गणपती मात्र देशभक्तीपर गीतांमध्येच रमायचे. आणीबाणीच्या विरोधात त्यांनी अभाविपतर्फे निघालेल्या मोर्च्यात पोलिसांच्या लाठ्याही अंगावर झेलल्या. पण, उलट त्यामुळे त्यांचे महाविद्यालयात जाणेच बंद झाले. खरं तर त्यांच्या मनात तेव्हापासूनच कुठे तरी व्यवसायाचा विचार घोळत होता. जर रस्त्यावर बसलेला भाजीपाला, चहाचा टपरीवाला व्यवसाय करू शकतो, तर मी का नाही, हा प्रश्न त्यांना सतावत असे. पण, उद्योग-व्यवसाय म्हणजे केवळ गुजराती-मारवाड्यांचे काम, आपण टायपिंग शिकायचे, नोकरी करून चांगला पगार कमवायचा आणि घरगृहस्थी थाटून सुखी संसारी राहायचे, हा सर्वसामान्य दक्षिण भारतीय कुटुंबातील विचार गणपतींना मान्य नव्हता. पण, शेवटी कुटुंबीयांसमोर त्यांचे काहीएक चालले नाही. त्यांना टायपिंग शिकावे लागले. इंग्रजीचीही बऱ्यापैकी समज होती. मराठी, हिंदी, गुजरातीही ते अगदी अस्खलितपणे बोलतात.

 
 
कॉलेज सुटल्यामुळे वडिलांच्या ओळखीने मग गणपती 150 रुपये महिना या पगारात एका केबल तयार करणाऱ्या फॅक्टरीत लागणाऱ्या लेबलच्या टायपिंग कामासाठी रुजू झाले. लहानपणापासूनच त्यांना नवनिर्मिती, वेगवेगळी उत्पादने याबद्दल एक सुप्त आकर्षण होते. त्यांच्या घरामागे असणाऱ्या फॅक्टरीमध्ये ते असाच फेरफटका मारत. मशिनरी, कच्चा माल, कामगारांच्या हालचाली अगदी बारकाईने टिपून घेत. त्यांच्या याच चिकित्सक, संशोधक वृत्तीमुळे जिथे टाईपराईटवर एक लेबल तयार करता यायचे, तिथे त्यांनी चार लेबल्स एकाचवेळी तयार करण्याची किमया साधली. हे पाहून त्यांचे मालकही खुश झाले. त्यांची व्यावसायिक समज, कामातील उरक आणि संशोधकवृत्ती पाहता, त्यांची कंपनीमध्ये उत्तरोत्तर प्रगती होत गेली. टंकमुद्रणापासून सुरू केलेल्या गणपतींची स्टोर मॅनेजर पदापर्यंत बढती झाली. अर्थार्जन सुरूच होते. मग ब्रह्मचर्यातून गृहस्थाश्रमात 1986 साली त्यांचा प्रवेश झाला. पण, कंपनीच्या मालकाच्या निधनानंतर व्यवस्थापनातील बदल आणि कामाचे स्वरूप न पटल्यामुळे त्यांनी तिथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. कालांतराने मुलंही झाली. मग काही काळ एक्सटिरियर पेंटच्या मार्केटिंगचेही काम त्यांनी केले. पुढे कर्मधर्मसंयोगानेच त्यांना ठाण्यातील मानपाडानजीकच्या एका कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कास्टिंग कंपनीमध्ये काम मिळाले. कर्मधर्मसंयोग यासाठी की, प्लेसमेंट एजन्सीकडून त्यांना स्वत: नोकरीसाठी कार्यालयात भेट देण्याचे पत्र आले होतेच, शिवाय त्या एजन्सीत या नवीन नोकरीची माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव होते पार्थसारथी. सारथी म्हणजे कृष्ण आणि पार्थसारथी म्हणजे अर्जुन. त्यामुळे रोज भगवद्गीतेचे 1 ते 18 अध्याय वाचून, पूजा करून घराबाहेर पडणाऱ्या गणपतींना ‘ना जाने किस रूप मे नारायण मिल जाए’ याची साक्षात अनुभूती मिळाल्याचे ते सांगतात.
 
 

यशाचा मूलमंत्र

एस. गणपती यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकला असता, मेहनत, जिद्द, चिकाटी, संस्कार आणि सर्जनशीलता यांच्या जोरावर माणूस काय करू शकतो आणि कुठून कुठपर्यंत झेप घेतो, याची प्रचिती येते. ते जाता जाता म्हणतात, “मी जीवन जगत गेलो, व्यवसायात जीव ओतला आणि कधीही श्रीमंतीचा विचार केला नाही.” 

 

या नव्या कंपनीमध्ये ‘असिस्टंट पर्चेस ऑफिसर’ म्हणून ते रुजू झाले. कंपनीच्या प्लांटमध्ये लागणारी महागडी मशीनरी, त्याचे पार्ट्स, कच्चा माल आयात करण्यापेक्षा भारतातच ते कसे तयार करता येईल, याकडे गणपती यांनी आपले सगळे लक्ष केंद्रित केले. 'if you pay less , quality is in doubt, if you pay more, your intergrity is in dobut' या व्यवसायातील कानमंत्राचे ते आजही तितक्याच गांभीर्याने पालन करतात. म्हणूनच, आयात केले जाणारे तंत्रज्ञान भारतात स्वस्तात उपलब्ध करून देता येईल का, याचा त्यांनी प्रत्येकवेळी विचार केला. यावर गणपती म्हणतात की, “आयात केलेल्या तंत्रज्ञान तसेच कच्च्या मालावर शंका उपस्थित केली जात नाही, पण देशातच बनवलेले माल, तंत्रज्ञान असेल तर त्यावर लगेच प्रश्न उपस्थित केले जातात.” अशा या इन्व्हेस्टमेंट कास्टिंग कंपनीत त्यांनी 14 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव घेतला. याचदरम्यान 1996 साली ‘धनलक्ष्मी एंटरप्रायजेस’ ही स्वत:ची ट्रेडिंग कंपनीही सुरू केली. नोकरीही सुरू होतीच. त्या कंपनीच्या माध्यमातूनही अशाचप्रकारे बाहेरचे तंत्रज्ञान देशांतर्गत गणपती यांनी विकसित केले. या दरम्यान त्यांना मराठी भाषकांमध्ये मद्रासी म्हणून तसेच कपाळावर दक्षिण भारतीय पद्धतीचे भस्म लावत असल्यामुळे ‘फोर स्केव्हर’ म्हणून खिजवण्याचे काही सहकर्मचाऱ्यांकडून भरपूर प्रयत्न झाले. पण, अशाच एका नाठाळाला चोप देऊन त्यांनी कायमची सगळ्यांचीच तोंडं बंद केली. याच काळात 1992 च्या रामजन्मभूमी आंदोलनातही ते हिरीरीने उतरले आणि मनोभावे कारसेवा केली. असा हा बाहेरून तितकाच कठोर आणि आतून मृदू गणपती...

 

असेच एकदा त्यांच्या कंपनीतील संशोधन आणि विकास विभागातील एका बुद्धिमान अधिकाऱ्याने त्यांना व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. एवढेच नाही, तर तंत्रज्ञान माझे, बाकी उत्पादन यंत्रणा तुझी या नियमाला धरून इन्व्हेस्टमेंट पावडर निर्मितीचे काम डोंबिवलीतील एका तबेल्याच्या मागे छोट्याशा ठिकाणी सुरू झाले. पण, त्या पावडरच्या गुणवत्तेसंबंधी काही समस्या उद्भवल्याने तेही काही काळाने बंद पडले. पण, त्यांच्या धनलक्ष्मी एंटरप्रायझेसतर्फे एरवी आयात केल्या जाणाऱ्या स्पेक्ट्रो मीटर, हीटर, हीटिंग फर्नेससारख्या उपकरणांच्या विशिष्ट भागांचे मुंबईतल्या मुंबईत निर्मितीचे काम सुरू होतेच. याच दरम्यान त्यांनी ज्वेलरी क्षेत्रातील इन्व्हेस्टमेंट कास्टिंगमध्ये (consumable चे उत्पादन) आपले नशीब आजमाविण्याचे ठरवले. आज गणपती यांच्या फॅक्टरीत उच्च तापमानावर सोनं वितळविण्यासाठी लागणाऱ्या ग्रॅफाईट या उष्णतारोधक आणि विद्युतवाहक ग्रॅफाईट क्रूसिबल तयार केले जातात. ही प्रक्रिया करताना सोन्यामध्ये ग्रॅफाईटच्या कार्बनचा अंश अजिबात मिसळू नये म्हणून उच्च गुणवत्तेचे ग्रॅफाईट खास जपानच्या टोकाई कार्बन लि. या कंपनीमधून आयात केले जाते. आज मोठमोठ्या दागिने तयार करणाऱ्या कंपन्यांसोबत इस्रो, डीआरडीओ, भेलच्या उपकरणांमध्येही ग्रॅफाईटचा वापर केला जातो. आज 120 मोठ्या ग्राहक आणि मेहनती, पण मोजक्या कामगारांच्या जोरावर गणपतींचे वार्षिक उत्पन्न हे दोन कोटींच्या घरात आहे. त्यांचा मुलगा सीए, आयसीडब्ल्यू आणि सीएस असून गणपतींनी विश्रांतीचा निर्णय घेतल्यावर तो हा व्यवसाय जबाबदारीने हाताळण्यासाठी समर्थ असल्याचे ते सांगतात. असे हे वाचनाची आणि अध्यात्माची आवड असलेले गणपती नागरी समस्या शासनदरबारी मांडणे, त्यांचा पाठपुरावा करणे यांसारख्या सामाजिक कामांमध्येही सक्रिय आहेत. या वयातही त्यांचा दांडगा उत्साह पाहिला की, उद्योजक आपला उद्योग अक्षरश: जगतो म्हणतात ना, त्याचे साक्षात दर्शन होते...

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat