रुग्णसेवेसोबत समाजसेवेचा वसा

    दिनांक  06-Apr-2019   रुग्णसेवा हीच ईश्वरसेवाया व्रताला सर्वस्व मानून समाजसेवेमध्ये सक्रिय असलेले वसईच्या आशीर्वाद नर्सिंग होमचे डॉ. जयश्री आणि रवींद्र देशपांडे हे डॉक्टर दाम्पत्य. मुंबईतील मोठ्या रुग्णालयांमध्ये काम करून गडगंज पैसे कमावण्यापेक्षा या दाम्पत्याने नालासोपारा, वसई, या तुलनेने अविकसित, वनवासीबहुल भागाची आपले वैद्यकीय कार्यक्षेत्र म्हणून स्वखुशीने निवड केली. आज देशपांडे दाम्पत्यासोबतच सामाजिक भान जपणाऱ्या त्यांच्या काही मित्रमंडळींनी मिळून सुरू केलेल्या ‘सावित्रीच्या लेकी’ या सामाजिक संस्थेअंतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. तेव्हा, रुग्णसेवेसोबत समाजसेवेचा वसा घेतलेल्या या डॉक्टर दाम्पत्याचा उलगडलेला हा जीवनप्रवास...

 

जयश्री देशपांडे या मूळच्या विदर्भातील अकोल्याच्या. त्यांचे संपूर्ण शालेय शिक्षण आणि बारावीपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण याच छोट्याशा अकोल्यात पार पडले. बारावीनंतर पुढे नागपूर मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एम. डी. (बालरोग) केले आणि लग्न होऊन पुण्याच्या देशपांडे कुटुंबात त्या दाखल झाल्या. सुरुवातीला पुण्यालाच प्रॅक्टिस करण्याचे देशपांडे दामप्त्याने ठरवले होते. पण, डॉ. रवींद्र देशपांडे स्वत: जसलोक रुग्णालयात त्यावेळी कामाचा अनुभव घेत होते. पण, त्यानंतर केलेल्या एका सर्वेक्षणातून डॉक्टरांना कळले की, मुंबईजवळच्याच वसई-नालासोपारा भागात आयसीयूची सुविधा असलेले एकही रुग्णालय नाही. त्यादृष्टीने या परिसरात वैद्यकीय सोयीसुविधांचा अभाव आणि भविष्यातील संधींचा विचार करता, 1990 साली नालासोपाऱ्याला आशीर्वाद नर्सिंग होमचा शुभारंभ झाला. खरंतर देशपांडेंच्या घरात कोणीही डॉक्टर नाही. त्यामुळे रुग्णालय कसे सुरू करायचे, त्याचे व्यवस्थापन कसे हाताळायचे, याचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना केवळ इच्छाशक्ती आणि परस्पर सहकार्याच्या जोरावर त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. सुदैवाने, चांगला बांधकाम व्यावसायिक भेटल्याने रुग्णालयाचेही काम काहीशा सवलतीच्या दरात आणि डॉक्टरांच्या मनासारखे पार पडले. पण, सुरुवातीला प्रशिक्षित परिचारिकांची कमतरता, वैद्यकीय चाचण्यांसाठी लागणाऱ्या मशीन्सची अनुपलब्धता, रुग्णांमधील आरोग्य, स्वच्छता याबाबतच्या प्राथमिक ज्ञानाचा अभाव यांसारख्या आवाहनांचा डॉक्टरांना सामना करावा. पण, त्यातूनही त्यांनी न डगमगता अगदी आत्मविश्वासाने मार्ग काढला. रुग्णांवर उपचार करताना या डॉक्टर दाम्पत्याने दिवस-रात्र असा कधीही भेद केला नाही. डॉ. देशपांडेंच्या या रुग्णालयात आयसीयू आणि डॉक्टरांच्या घरामध्ये केवळ एका भिंतीचे अंतर होते. त्यामुळे रात्रीअपरात्री रुग्ण साधे खोकले तरीही डॉक्टरांचे त्यांच्याकडे बारीक लक्ष असे. त्या काळात नाईटकॉल्सचेही प्रमाण भरपूर होते. पण, म्हणून डॉक्टरांनी कधीही कोणालाही उपचार नाकारले नाहीत. इतकेच नाही तर औषधोपचारांसाठी आर्थिक परिस्थिती बिकट असणाऱ्या रुग्णांसोबत डॉ. देशपांडे दाम्पत्याने दुजाभाव केला नाही. रुग्णालयाच्या उद्घाटनाच्याच दिवशी अशाच एका वाटसरूला छातीत दुखण्याच्या त्रासामुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. 48 तासांत त्या रुग्णाचे छातीचे दुखणे कमी झाले. त्याच्यावर वेळीच योग्य उपचार करून मग मुंबईला हलविण्यात आले. म्हणजे, अगदी पहिल्या दिवसापासून ते आजतागायत या डॉक्टर दाम्पत्याने रुग्णसेवेचा हा वसा अविरतपणे सुरूच ठेवला.

 

डॉ. जयश्री देशपांडे या बालरोगतज्ज्ञ, तर डॉ. रवींद्र देशपांडे हे हृदयरोगतज्ज्ञ. त्यांची दोन मुलंही डॉक्टरी पेशातच. मुलगा दंतशल्यविशारद तर मुलगी सध्या एमबीबीएसचे शिक्षण घेते आहे. दोघांनीही आपापल्या आवडीनेच वैद्यकीय क्षेत्र करिअर म्हणून निवडले. नृत्य आणि वाचनाबरोबरच डॉ. जयश्री यांना अगदी सुरुवातीपासूनच लहान मुलांची प्रचंड आवड. म्हणूनच, त्यांचे उपचार करतानाही आनंद मिळत असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणतात की, “आजारपणाची सुरुवात झाली की लहान मुलं हसणंच विसरतात आणि आजार बरा झाला की, लगेच हसायला लागतात. म्हणून त्यांच्या पालकांकडून फी घेण्यापेक्षा, त्या मुलांच्या चेहऱ्यावरील हसू बघण्याची मजा वेगळीच असते.” पण, आपल्या आजवरच्या वैद्यकीय कारकिर्दीचं सारं श्रेय ते त्यांच्या पतीसह संपूर्ण टीमला देतात. आज आशीर्वाद नर्सिंग होममधील सर्व परिचारिका आणि इतर कर्मचारीवर्ग हा प्रशिक्षित असून आपत्कालीन स्थितीमध्ये रुग्णांचे जीवही वाचवण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. शिवाय, बालरुग्णांवरील उपचारांचे विशेष प्रशिक्षण परिचारिकांना नर्सिंग होममध्येच देण्यात आले. त्याचबरोबर कर्मचार्‍यांचे वाढदिवस साजरे करणे, त्यांच्या अडीअडचणींना धावून जाणे अशी सर्वतोपरी मदत नर्सिंग होमतर्फे केली जाते. या सगळ्याचाच परिपाक म्हणजे, आशीर्वाद नर्सिंग होमला ‘एनएबीएच’ अर्थात ‘नॅशनल अक्रेडिशन बोर्ड हॉस्पिटल्स’ हा ‘क्वालिटी कंट्रोल’ चा दर्जा प्राप्त झाला आहे. अशा या अनुभवी डॉ. जयश्री देशपांडे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देतात. त्या सांगतात की, “मुंबईत आणि मुंबईबाहेरच्या वैद्यकीय सेवेत भरपूर फरक आहे. पण, स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी वैद्यकशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणानंतर ग्रामीण भागात यायला हवे आणि जर त्यांना रुग्णालयाची ओळख हवी असेल, तर मुंबईसारख्या शहरातच करिअर करावे. कारण, मुंबईत बहुतांश रुग्ण डॉक्टरांसाठी नव्हे, तर रुग्णालयाच्या नावामुळे उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे ‘जॉब सॅटिसफॅक्शन’ ग्रामीण भागातील रुग्णालयात जास्त मिळतं.”

 

यशाचा मूलमंत्र

 

त्यांच्या यशाचा मूलमंत्र विचारला असता डॉ. जयश्री देशपांडे काही प्रमुख गोष्टींची आवश्यकता अधोरेखित करतात. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रामाणिकपणा. त्यांना मोठमोठ्या रुग्णालयांतून व्यवसायाच्याही संधी चालून आल्या, पण देशपांडे दाम्पत्याने त्या स्वीकारल्या नाहीत आणि आपले रुग्णसेवेतून समाजसेवेचे ध्येयच कायम ठेवले. दुसरे म्हणजे, व्यवसायात सातत्य ठेवणे. त्यांनी रुग्णांच्या, कर्मचार्‍यांच्या हिताचा सदैव विचार केला. “स्वत:च्या विकासाबरोबरच त्यांच्या विकासासाठीही प्रयत्न केला आणि अखेरीस देवाचे आशीर्वाद आमच्यासोबत असल्यामुळेच हे साध्य होऊ शकले,” असे सांगत त्या देवाचेही मनोभावे आभार व्यक्त करतात. 

 

असे हे देशपांडे डॉक्टर दाम्पत्य समाजसेवेच्या क्षेत्रातही तितकेच आघाडीवर. डॉ. जयश्री यांना त्यांच्या आईवडिलांकडूनच सामाजिक कार्याचं बाळकडू मिळालं. आईच्या निधनानंतर त्यांनी ठरवलं की, आपण असं कार्य उभं करायचं की, आईसाठी ते श्रद्धांजलीपर ठरेल आणि त्याच धारणेतून काही समविचारी मित्रमंडळी, डॉक्टर एकत्र आले आणि ‘सावित्रीच्या लेकी’ ही सामाजिक संस्था सुरू झाली. सध्या या आठ जणांच्या समूहात डॉ. सुनीता देशपांडे, डॉ. अरुणा बोरीकर, मृदुला चिपळूणकर, सुषमा कर्णिक, वृषाली, स्वाती सावंत अशा डॉक्टर तसेच शिक्षकांचाही समावेश आहे. खरं तर संस्थेच्या कामाची सुरुवात झाली ती वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वटवृक्षांच्या हानीमुळे. त्यामुळे वडाच्या झाडाच्या फांद्या तोडू नका, झाडे लावा झाडे जगवा, अशा स्वरूपात पॅम्प्लेट्सच्या माध्यमातून, लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली आणि त्याचे दृश्य परिणामही दिसून आले. आज या संस्थेतर्फे पर्यावरण, सामाजिक, वैद्यकीय क्षेत्रात असेच अनेक समाजहितैषी उपक्रम राबविले जातात. यामध्ये अनाथालय, दुर्गम भागातील लहान मुलांना, आदिवासी शाळा, देवळात प्रसाद तयार करणाऱ्या विविध देवस्थाने आणि संस्थेतील स्वयंपाकी यांना मोफत टायफॉईड लसीकरण दिले जाते. कारण, खासकरून वसई, नालासोपारा भागात पाण्यामुळे उद्भवणाऱ्या टायफॉईड, गॅस्ट्रो यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. त्यामुळे इतर आरोग्य तपासणी शिबिरे, दंतचिकित्सा शिबिरेही संस्थेतर्फे राबविली जातात. त्याचबरोबर जुने कपडे, ब्लँकेट, चादरी गोळा करून त्याचे गरजूंना वाटप करणे, वनवासी तसेच दुर्गम भागात आरोग्याच्या, स्वच्छतेच्या चांगल्या सवयींचे प्रौढांसह मुलांना मार्गदर्शन करणे यांसारख्या उपक्रमांचाही समावेश आहे. पण, ‘सावित्रीच्या लेकी’ चे सामाजिक कार्य डॉ. देशपांडेंना इथवरच मर्यादित ठेवायचे नाही. आगामी काळात शाळाशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये चांगला आणि वाईट स्पर्श याबाबतची जागरूकता निर्माण करणे, तसेच इंटरनेटच्या योग्य वापराबाबत विद्यार्थ्यांना अवगत करणे इत्यादी उपक्रम त्यांच्या विचाराधीन आहेत. अशा या डॉक्टर देशपांडे दाम्पत्याचे नालासोपारा, वसईतील वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान अतुलनीय तर आहेच. पण, वैद्यकीय पेशा हा केवळ एक व्यवसाय नाही, तर व्यवस्था परिवर्तनाचा मार्ग आहे, याचा आदर्श या दाम्पत्याने सर्वांसमोर ठेवला आहे. त्यांच्या कर्तृत्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’चा सलाम!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat