उद्योगविश्वातली रणरागिणी

    दिनांक  06-Apr-2019   रुईया महाविद्यालयातील विद्यार्थिनी. लहानपणापासून चित्रकलेची आवड. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील बालपण. फॅशन डिझायनिंगचे शिक्षण आणि काहीतरी जगावेगळं करून दाखविण्याची मनात असलेली जिद्द या जोरावर महाराष्ट्रातील नामवंत उद्योजक वर्तुळातील एक चेहरा असलेल्या आरती कांबळे यांनी आई, पत्नी, सून, मुलगी या भूमिकाही यशस्वीपणे निभावल्या आहेत. शून्यापासून सुरू केलेल्या या उद्योगिनीचा सहाशे कोटींपर्यंतचा हा प्रवास...

 

एका व्यावसायिक कुटुंबातच बालपण गेल्यामुळे आरती यांना आपल्या चित्रकलेच्या आवडीमुळे फॅशन डिझायनिंगमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा होती. रुईया महाविद्यालयात असताना त्यांनी आपल्या भावाकडे ही इच्छा बोलून दाखवली. वडिलांचा विरोध होईल, या भीतीने घरी काही सांगण्याची सोय नव्हती. महाविद्यालयीन शिक्षणासह त्यांनी एका खासगी शिक्षण संस्थेतून हा अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षणही झाले. काहीतरी करण्याची इच्छा सतत मनात असल्याने त्यांनी वयाच्या १७व्या वर्षी पहिले प्रदर्शन भरवले होते. वडील विठ्ठल शेरखाने यांच्या व्यावसायिक मित्रांना त्यांनी या प्रदर्शनाला निमंत्रित केले. त्यांच्या मित्रांनी प्रदर्शन पाहून शेरखाने यांचे भरभरून कौतुक केले. तोपर्यंत ही सारी संकल्पना आणि प्रदर्शन हे आपल्या मुलीने भरवले असेल, अशी साधी कल्पनाही त्यांना नव्हती. इतक्या लहान वयात आरती यांनी केलेली ही कामगिरी पाहून वडिलांनीही त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात फिरवला. कामे सुरू राहिली, फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात नाव होत गेले. शिक्षण पूर्ण झाल्यावर आणि बऱ्यापैकी काम सुरू झाल्यावर आरती अतिन कांबळे यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. सासरकडचेही पूर्वीपासून उद्योजकच. मात्र, चार वर्षे त्यांनी गृहिणी म्हणून पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली. यानंतर काहीतरी करण्याची तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पतीचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे त्यांनी जुहू एसएनडीटीमधून पुन्हा फॅशन डिझायनिंगमध्ये उर्वरित शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मोठ्या ब्रॅण्डला त्या डिझाईन पुरवू लागल्या. १९९९च्या काळात रविना टंडनसारख्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला त्यांनी आपले डिझाईन पुरवले. सर्व काही पुन्हा मनासारखं सुरू असलं तरीही स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. केवळ नफा मिळवणे, हा उद्देश न ठेवता स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठीची त्यांची धडपड सुरूच होती.

 

व्यावसायिक पार्श्वभूमी असली तरीही नवा व्यवसाय करताना अनेक गोष्टींची माहिती त्यांना नव्याने घ्यावी लागली. अनेक गोष्टींची तोंडओळख करून, नव्याने त्या शिकण्याची तयारी त्यांनी ठेवली आणि यातूनच निर्मिती झाली 'आरती अ‍ॅग्रो फूड्स अ‍ॅण्ड प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीची. खाद्यक्षेत्रात वितरक असलेल्या या कंपनीची सुरुवात केवळ ९० हजार रुपयांपासून सुरू झाली. सुरुवात असल्याने तितकासा जम अजून बसला नव्हता. महिन्याकाठी केवळ १५ हजार रुपये सुटत होते. मात्र, अचूक नियोजन आणि खर्चातील कपात आणि नाविन्यपूर्णता यामुळे व्यवसाय हळूहळू आकार घेऊ लागला. त्यानंतर चितळे प्रोडक्ट बाजारातील विक्रेत्यांकडे पोहोचविण्यासाठी कंपनी काम करू लागली. १५ हजारांपासून सुरू झालेल्या नफ्याचा आकडा आता दीड लाखांवर पोहोचला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत हा आकडा दहापटींनी वाढला. त्याकाळी उत्पादकांनी झपाट्याने वाढलेला व्यवसाय पाहून त्यांना 'सुपरस्टॉकिस्ट' म्हणून नेमले. व्यवसाय वाढला, तसतसा कामाचा व्यापही वाढत गेला. लोकांना काहीतरी वेगळे द्या किंवा इतरांपेक्षा जलदगतीने सेवा द्या, या मंत्रावर त्यांनी आपल्या व्यवसायाची पद्धत अवलंबली. ज्या काळात चितळे बंधूंच्या उत्पादनांसाठी शीव ते भायखळा हा विभाग तितकासा फायदेशीर नव्हता, त्या काळात 'आरती अ‍ॅग्रो फूड्स अ‍ॅण्ड प्रायव्हेट लिमिटेड'ने मुंबईचा पट्टा काबीज केला.

 

२००६ मध्ये आलेल्या एफडीआयमुळे मुंबई आणि लगतच्या शहरांमध्ये मॉल संस्कृती रुजू लागली होती. इनॉर्बिट, डी मार्ट, बिग बाझार, रिलायन्स फ्रेश या मोठमोठ्या मॉल्ससमोर आता किरकोळ व्यापारी टिकाव धरणार का, अशी भीती त्या काळातील उद्योजकांना होती. मात्र, सुरुवातीपासूनच वेगळा विचार करणाऱ्या आरती कांबळे यांनी ही संधी ओळखून मुंबईतील प्रत्येक मॉलमध्ये आपली उत्पादने विक्रीसाठी ठेवली. बाजारात तुम्ही उपलब्ध करून दिलेली कोणतीही गोष्ट विकली जाणार, हा मूलमंत्र माहीत असलेल्या आरती यांच्याकडे आजघडीला २५ कर्मचारी दिवसरात्र सेवा देण्यासाठी तत्पर आहेत. त्यांचे विक्रेते प्रतिनिधी दिवसाला हजारो वितरकांना संपर्क करून मिळालेल्या मागणीनुसार कमी वेळात आपला माल त्यांच्याकडे पोहोचेल याची काळजी घेतात. आम्ही आज आहोत ते आमच्या सेवेमुळेच आहोत, असा विश्वास आरती यांना आहे. याच विश्वासामुळे २००८ पर्यंत त्यांची उलाढाल ८ कोटींपर्यंत पोहोचली. अजूनही स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठीची आरती यांची धडपड संपत नव्हती. स्वतःची उत्पादन निर्मिती करण्यासाठी त्यांनी शोध सुरू केला. मलेशियातील एका प्रदर्शनाबद्दल त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार मलेशियाला गेल्यावर एका जगत्विख्यात ब्रॅण्डची ओळख त्यांना झाली. या ब्रॅण्डचा भारतात विस्तार करण्यासाठीची परवानगी त्यांना मिळाली. कंपनीचे अधिकारी पाहणीही करून गेले. केंद्रातून परवानगी मिळवण्यासाठीच्या प्रक्रियाही सुरू झाल्या. त्यावेळी दिल्लीला अशीच चर्चा करत असताना एका व्यक्तीने स्वतःच्या ब्रॅण्डचे मिनरल वॉटरचे उत्पादन करण्याची कल्पना दिली. आसाम, अरुणाचल प्रदेश या भागात त्याची विक्री करण्याचा सल्ला दिला. यावर विचार करताना त्यांनी उत्तर पूर्व भारतात पाहणी सुरू केली आणि तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करता करता त्यांनी एका वेगळ्याच क्षेत्रात पाऊल ठेवले. या भागात जलविद्युत प्रकल्प सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि लगेचच कामही सुरू केले. २०१२ मध्ये त्यांनी ब्रह्मपुत्रा नदीवरील दोन नद्यांच्या ठिकाणची जागा त्यासाठी मंजूर करून घेतली.

 

यशाचा मूलमंत्र

 

"जगात अशक्यप्राय अशी कोणतीही गोष्ट नाही. तुम्ही ठरवलेल्या ध्येयाच्या मागे स्वतःला झोकून द्या. तुमच्या स्वप्नांविषयी प्रचंड महत्त्वाकांशी राहा. यश तुमचेच आहे."

 

महाराष्ट्रातून अरुणाचलमध्ये काम करणाऱ्या त्या एकमेव उद्योजिका आहेत. सात वर्षे या भागातील विविध मंजुरी मिळवण्यात गेली. गोबूक आणि यामिन या गावांना स्थलांतरित करून त्यांच्यासाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी सुरू केले आहेत. या भागात 'यामिन एनर्जी' या कंपनीची स्थापना आरती यांनी केली. येथील दोन्ही प्रकल्पांची संपूर्ण पायाभरणी आणि जबाबदारी आरती आणि त्यांचे पती सांभाळतात. एका भाषणात, माझ्या कंपनीची उलाढाल सहा कोटींपासून सहाशे कोटींपर्यंत विस्तारण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. 'फोर्ब्स' मासिकात त्यांच्या भाषणाची नोंद करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश येथील या दोन जलविद्युत प्रकल्पांतील गुंतवणूक आज सातशे कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे तुम्ही एकदा ठरवाल तर काहीच अशक्य नाही, हे त्यांनी खरे करून दाखवले. “अभ्यासक्रमात शिकलेल्या बऱ्याच गोष्टींचा वापर व्यवसायात उत्कृष्टपणे करून दाखवला. तुम्ही काहीही शिका, ती गोष्ट नक्कीच कुठेना कुठे उपयोगी पडेल,” असे त्या नेहमी सांगतात. अशीच एकदा व्यवसायातील गाठीभेटी होत असताना त्यांना गिफ्ट हॅम्पर्स आणि पॅकिंग संदर्भात माहिती मिळाली. त्यांच्या उत्पादनांना वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षकरित्या केलेले पॅकिंग ग्राहकांना भावले. महिन्याभरात मुंबईतील प्रमुख व्यावसायिकांकडून त्यांना २५ लाखांची ऑर्डर मिळाली. त्यांच्या या कल्पनेतून जवळपास शंभर मुलामुलींना त्यावेळी थेट रोजगार मिळाला होता. काही दिवसात त्यांच्या हातभारामुळे 'आरती एग्रो फुड्स प्रा.लि.'ने गिफ्ट हॅम्पर्सचा पसारा चार कोटींपर्यंत वाढवला होता. कंपनीतील मुलांनी त्यावेळची दिवाळी केवळ गिफ्ट हॅम्पर्सच्या कल्पनेमुळे आनंदात साजरी केल्याची खास आठवण आरती सांगतात. “तुम्ही जे ठरवाल, त्या मागे झपाटून लागा. तुमचे उत्पादन सर्वोत्कृष्ट बनवा. ग्राहकांना हे छातीठोकपणे सांगा. त्यांच्याशी प्रामाणिक राहा. तुम्हाला परतावा निश्चित मिळेल,” हाच यशाचा मंत्र त्या इतरांनाही देतात.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat