तृप्तराजची तालतृप्ती

    दिनांक  06-Apr-2019   कला कोणतीही असो, त्याची साधना केल्यानंतरच सिद्धता प्राप्त होते. मोठमोठ्या कलाकारांनाही कलेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी अथक साधना करावी लागते. पण, जर एखादा लहान मुलगा ऐन खेळण्या-बागडण्याच्या वयात एखाद्या कलेत प्राविण्य संपादित करत असेल तर त्याला लाभलेली ही निसर्गाची देणगी आहे, असेच म्हणावे लागेल. तबल्यावर अगदी तन्मयतेने चालणाऱ्या तृप्तराज पंड्याची बोटे पाहिली कीयाची जाणीव होते.

 

जेव्हा तृप्तराज केवळ 15 महिन्यांचा होता, तेव्हा त्याची आजी स्वयंपाकघरात भजन गायची. ते स्वर कानावर पडले की, तृप्तराजची चिमुकली पावलं आपसूकच स्वयंपाकघराकडे धाव घ्यायची. गाणे ऐकण्यासाठीच नव्हे, तर आजीला संगीताची साथ देण्यासाठी. तृप्तराज स्वयंपाकघरात जाऊन चक्क तिथले डबे वाजवायला घेत असे. त्याच्या वडिलांनाही तशी संगीताची आवड होती. त्यांनी तृप्तराजला भजनाच्या तालावर डबे वाजविताना पाहिले. त्यावरून त्यांच्या लक्षात आले की, एवढ्या कमी वयात तृप्तराजला लयतालाची समज आहे. त्यानंतर त्यांनी तृप्तराजचे निरीक्षण करायला सुरुवात केली. याच दरम्यान तृप्तराजच्या आत्यालाही त्याच्या आवडीबद्दल कळले. त्याच्या आत्याने तृप्तराज 18 महिन्यांचा असताना त्याला ढोलकी भेट दिली होती. मग स्वारी अजूनच खुश झाली. डब्यावर सुरू असणारा ताल आता ढोलकीवर सुरू झाला. तो ती ढोलकी योग्य रीतीने वाजवायला लागला. ढोलकीवर सराव सुरू असताना एके दिवशी अचानक तृप्तराजने तबला वाजवण्यासाठी मागितला. वयाची जेमतेम दोन वर्षही पूर्ण झाली नसताना एक दिवस रात्री 1.30 वाजता तृप्तराजने आईला उठवले. तबल्याकडे बोट दाखवून त्याने ‘तबला पाहिजे,’ असा आईकडे हट्ट केला. आईवडिलांनाही वाटले, जरा वेळ तबला वाजवेल आणि ठेवून देईल. पण, कसले काय, तृप्तराजने हातातला तबला सोडला नाही तो आजतागायत. त्याच काळात तृप्तराजने गुजराती गरब्याचा तालही असाच तबल्यावर वाजवून दाखवला होता. त्याचे वडील अतुल पंड्या यांनी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि आपल्या मित्रांना दाखविला. परंतु, “एवढा लहान मुलगा कसा काय तबला वाजवू शकतो?” अशी शंका उपस्थित करत तृप्तराजच्या वडिलांच्या मित्रांनी त्यांच्या सांगण्यावर विश्वासच ठेवला नाही. त्यानंतर अतुल पंड्या यांना वाटले की, कदाचित कोणत्याही मुलाने इतक्या कमी वयात तबला वाजविला नसेल. त्यामुळे तृप्तराजचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंदविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

 

मग तबलावादक तृप्तराजचा तोच व्हिडिओ त्यांनी ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ च्या अधिकाऱ्यांना पाठवला. एवढेच काय, तर ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’नेही तो व्हिडिओ पाहून अवघ्या तीन दिवसांत तो मंजूर केला. मात्र, तृप्तराजच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद झाली नव्हती. कारण, त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया ही वेगळी होती. पण, जेव्हा या व्हिडिओला केवळ मंजुरी मिळाल्याची बातमी पसरली, तेव्हा आकाशवाणीच्या कार्यक्रमात तृप्तराजला आमंत्रित करण्यात आले. जेव्हा ते आकाशवाणीच्या रेकॉर्डिंगला जात होते, तेव्हा तेथील निवेदक तृप्तराजच्या आईला म्हणाली की, “जा, तुमच्या मुलाला घेऊन या.” तेव्हा तो आईच्या कुशीत बसला होता. पण, त्याच्या आईने निवेदकाला सांगितले,”अहो, हाच मुलगा तबला वाजविणार आहे.” ते ऐकून त्या निवेदकालाही आश्चर्याचा धक्का बसला. एवढा लहान मुलगा तबला वाजवायला आला? त्यांना वाटले होते की, आठ ते दहा वर्षांचा मुलगा असेल. ते म्हणाले की, “ठीक आहे, वाजवू दे त्याला तबला.” आकाशवाणीच्या कार्यक्रमात तीन वर्षांचा असताना तृप्तराजने आठ ते दहा मिनिटे तबला वाजविला, तर चार वर्षांचा असताना ‘वा रे वा’ या कार्यक्रमात आपली तबलावादन कला सादर केली. सहा वर्षांचा असताना, तृप्तराजचे जवळपास 50 ते 60 तबलावादनाचे कार्यक्रम झाल्याचे त्याचे वडील अतुल पंड्या सांगतात आणि अखेरीस 2013 साली या अवलिया तबलावादकाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली. पण, म्हणून लहानग्या तृप्तराजचा सराव कधी थांबला नाही. आजही नित्यनेमाने तृप्तराज तबलावाजनाचा सराव करतो. म्हणजे, तबलावादन ही तृप्तराजची केवळ आवड किंवा छंदच राहिलेला नाही, तर तृप्तराजच्या जगण्याचा आता तो अविभाज्य घटक झाला आहे.

 

यशाचा मूलमंत्र

जेव्हा पुरस्कार मिळाला तेव्हा खूप चांगले वाटले. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटता आले. त्याबद्दल स्वतःचा अभिमान वाटतो. यापुढेही माझ्या कलेत उत्तमोत्तम प्रगतीसाठी मी प्रयत्नशील असेन. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली म्हणजे काय हे तेव्हा कळत नव्हते, पण आता खूप काही उमजले आहे.

 

नुकताचपंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्काराने तृप्तराजच्या या तबलावादनाचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्रातही तृप्तराजला ‘बाल शक्ती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. नाविन्यपूर्ण प्रयोग, समाजकार्य, अभ्यासू, क्रीडा, कला आणि संस्कृती तसेच शौर्य दाखविणाऱ्या बालकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तृप्तराजला ‘कला आणि संस्कृती’ या विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. सुरुवातीच्या काळात त्याला ज्ञानेश्वर कोपलगड यांनी तबल्याचे धडे दिले. आता तो पंडित नयन घोष यांच्याकडे तालीम घेत आहे. रोज 2 तास तो तालीम करतो. उस्ताद झाकीर हुसेन आणि पंडित नयन घोष यांना तृप्तराज आपल्या आदर्शस्थानी मानतो. उस्ताद झाकीर हुसेन तर तृप्तराजला ‘रुद्राक्ष’ नावाने संबोधित करतात. तृप्तराजने तो अवघ्या तीन वर्षांचा असताना साडेतीन तास बसून झाकीर हुसेन यांच्या तबलावादन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. अशा या तृप्तराजची आवड केवळ तबल्यापुरती मर्यादित नाही, तर तो एक उत्तम खेळाडूही आहे. क्रिकेटबरोबरच बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळायलाही तृप्तराजला आवडतं. जर तो या क्षेत्रात नसता, तर कदाचित तो खेळाडूच झाला असता.

 

तबल्याची साधना करताना तृप्तराजला फारशा अडचणी आल्या नाहीत. तो आजही आपला शालेय अभ्यास, खेळ व कलासाधना यांचा छान समन्वय साधतो. तृप्तराजला भारतीय शास्त्रीय संगीताबरोबरच ‘वेस्टर्न फ्यूजन’ मध्येही तितकाच रस आहे. म्हणूनच मग तृप्तराज पाश्चिमात्त्य गीतांचे शास्त्रीय संगीताबरोबर ‘फ्यूजन’ करून तबलावादन करतो. त्याला असे वाटते की, भारतीय शास्त्रीय संगीत परदेशात प्रसिद्ध करायचे असेल, तर त्यासोबत ‘फ्यूजन’ करायला हवे. ते परदेशातील नागरिकांनाही चांगले आवडेल, असे त्याचे मत आहे. तृप्तराजला एक चांगले भारतीय शास्त्रीय संगीतकार तर व्हायची इच्छा आहेच, पण बॉलिवूडमध्येही आपले नाव व्हावे, असेही त्याला मनोमन वाटते. तेव्हा, तृप्तराजच्या या सर्व इच्छा-आकांशा पूर्ण होवोत, ही सदिच्छा आणि पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat