विद्यार्थीसेवेचे व्रत

06 Apr 2019 18:22:01



आजच्या जगात काहीच मोफत मिळत नाही. दहावी, बारावीच्या क्लाससाठीही लाखोंची फी उकळली जाते. त्यातच जर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शिक्षणाचे क्लासेस असतील, तर फी ऐकूनच धक्का बसतो. पण, असा एक अवलिया आहे, जो वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर यांना मोफत ज्ञानाचे भांडार खुले व्हावे, यासाठी धडपडत आहे. विद्यार्थीसेवेचे व्रत घेतलेले डॉ. विवेक नळगीरकर...

 

डॉ. विवेक नळगीरकर अगदी लहानपणापासून संघाच्या शाखेत जायचे. त्यामुळे त्यांच्यावर आपसुकच समाजसेवेचे संस्कार झाले. समाजाचे आपल्यावर ऋण असते. ते आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात समाजसेवा करुन फेडायची त्यांनी शिकवण मिळाली. त्यांचे वडील खूप गरिबीतून उस्मानाबाद, नांदेडहून मुंबईत आले. विवेकसह चार भावंडे होती. हळूहळू आर्थिक परिस्थिती सुधारली होती. त्यांनी राजा शिवाजी विद्यालय आणि रुपारेल महाविद्यालयामध्ये शिक्षण घेतले. १९८६ साली उच्च शिक्षण म्हणजे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अशा दोनच शाखा होत्या. परंतु, यापैकी वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून समाजसेवेच्या व्यापक संधी मिळतील म्हणून विवेक यांनी वैद्यकीय क्षेत्राचा पर्याय निवडला. कमीतकमी मूल्यात किंवा मोफत रुग्णसेवा करता यावी, ही त्यांच्या आईवडिलांची इच्छा होती. त्यामुळे विवेक यांनी समाजसेवेसाठी रुग्णसेवेचा मार्ग निवडला. वैद्यकीय क्षेत्रात ते डॉ. अशोक कुकडे आणि अकॅडमिकमध्ये ओ. पी. कपूर यांना आदर्श मानतात. ओ. पी. कपूर हे सात ते आठ दिवस व्याख्यानमाला घेतात. यामध्ये विद्यार्थी, प्रशिक्षणार्थी डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्याचे कारण म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये ते डॉक्टरांना विविध क्लुप्त्या सांगतात. त्यांचा त्यांना खूप फायदा होतो. बरेचदा पुस्तकी ज्ञानाशिवाय काही बाबी अनुभवांतून शिकता येतात. याबाबत व्याख्यानात मार्गदर्शन केले जाते. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन डॉ. विवेक नळगीरकर यांनीही व्याख्याने द्यायला सुरुवात केली असून आतापर्यंत त्यांनी देशभरात शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांच्या व्याख्यानालाही वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, डॉक्टर मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात. बहुतांश ठिकाणी त्यांचे व्याख्यान हे मोफत आयोजित केले जाते. या व्याख्यानात त्यांचा ‘एमडी’ आणि ‘एमडीची प्रवेशपरीक्षा’ या दोन विषयांवर प्रामुख्याने भर असतो. हैदराबाद येथे व्याख्यान दिल्यानंतर एका विद्यार्थ्याने व्याख्यानामुळे आणि पुस्तकामुळे आपल्याला प्रवेशपरीक्षेत फायदा झाला, असे सांगून पत्राद्वारे विवेक यांचे विशेष आभार मानले होते.

 

 
 

वैद्यकीय क्षेत्रात कमीत कमी पैशांत किंवा मोफत शिक्षण देता आले पाहिजे आणि केव्हाही डॉक्टर म्हणून रुग्णांना वेळ देता आला पाहिजे, हे त्यांचे विचार होते. डॉ हेडगेवार रुग्णालय आणि विवेकानंद रुग्णालयाच्या महत् कार्याची प्रेरणा घेत डॉ. विवेक यांनीही पुढील वाटचाल याच दिशेने करायचे ठरविले. नळगीरकर यांनी पाच वर्षे क्लिनिकल प्रॅक्टिस केली. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आपले की, आपला कल शिक्षणाकडे जास्त आहे. त्यामुळे त्यांनी गेली १५ वर्षं या क्षेत्रात स्वतःला अगदी वाहून घेतले आहे. त्यांनी तीन पुस्तके लिहिली, तसेच ’फिजिओलॉजी गुरू’ मोबाईल अ‍ॅपही सुरू केले आहे. हे अ‍ॅप विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध आहे. यामध्ये नोट्स, व्हिडिओ व्याख्यान आदी बाबींचा समावेश आहे. अ‍ॅपसाठी त्यांनी सात ते लाख रुपये खर्च केले आहेत. त्याचे कारण म्हणजे ‘फिजिओलॉजी’ या विषयासवर त्यांनी दहा पुस्तके लिहिली आहेत. त्यामधील कोणते पुस्तक अभ्यासावे, हे मुलांना कळत नाही. म्हणून त्यांना एकाच ठिकाणी सर्व बाबी सोप्या भाषेत उपलब्ध व्हाव्यात, तसेच सर्व ठिकाणी पुस्तक सोबत घेता येत नसले तरी मोबाईल सोबत असतो. त्यामुळे हे अ‍ॅप विकसित करुन विद्यार्थ्यांना मोबाईलवरुनही अभ्यास करता येतो. विद्यार्थ्यांना या विषयाच्या संकल्पना पटकन कळाव्यात आणि परीक्षेत त्यांना फायदा व्हावा, हा यामागचा उद्देश.

 

यशाचा मूलमंत्र

 

आयुष्याला कलाटणी मिळाली

 

"बारावीनंतर त्यांना १ टक्का कमी मिळाला तर खाजगी महाविद्यालयात त्यांना प्रवेश घ्यावा लागला. ते प्रवेश घेत असताना त्यांचे वडीलही त्यांच्यासोबत होते. त्यावेळी तिथे जी मुले आली होती, ती सर्व चांगल्या घरातील होती. सर्व गोष्टी उपलब्ध असतानाही त्यांना कमी टक्के मिळाले होते. त्यामुळे त्यांना खाजगी महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला. तेव्हा विवेक यांचे वडील त्यांना म्हणाले की, “ही सर्व यशस्वी पालकांची अयशस्वी मुले आहेत.” तेव्हा त्यांनी निश्चय केला की, खूप चांगला अभ्यास करायचा आणि नाव कमवायचे. त्या एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली."

 

या क्षेत्रात काम करत असताना डॉ. विवेक यांना इतर काही अडचणी आल्या नाहीत. पण, शारीरिक अडचण आली ती म्हणजे त्यांना लहानपणापासून असलेला पोटाचा विकार. त्यामुळे त्यांची पचनशक्ती कमी झाली. त्यांना अनेकदा रुग्णालयामध्ये अ‍ॅडमिट करावे लागले होते. तरीही ते स्वस्थ बसले नाही. गेल्या दहा वर्षांपासून देशातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फिजिओलॉजीवर त्यांनी मार्गदर्शन केले. “यश हे सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी तुम्हाला स्वतःची हाडे झिजवावी लागतात,” हा वडिलांनी दिलेला कानमंत्र सदैव ध्यानात ठेवूनच कार्यरत असल्याचे ते सांगतात. ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन’च्या पॅनलमध्ये त्यांचा समावेश आहे. त्यांना या विद्यापीठाकडून गेल्यावर्षी ‘सर्वोत्कृष्ट शिक्षक’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. ‘एम्स’च्या ‘बेस्ट फॅकल्टी इन इंडिया’ या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. भविष्यात डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना ‘डिजिटल कॉन्टेन्ट’ मोफत उपलब्ध करून द्यायचा त्यांचा मानस आहे. पहिल्या वर्षाचा विद्यार्थी असेल तर त्याला ती माहिती, डॉक्टर असेल तर त्याला त्याच्या प्रॅक्टिसशी संबंधित ज्ञान, संशोधन करणारा असेल तर त्याच्याशी संबंधित ज्ञान मिळावे, हा त्यांचा प्रयत्न आहे. फिजिओलॉजीला (शरीरक्रिया शास्त्र) ग्लॅमर नाही. त्याला ते मिळवून देण्याचा डॉ. विवेक यांचा उद्देश आहे. त्यामुळे ते डी.वाय.पाटीलमध्ये दरवर्षी प्रश्नमंजुषा स्पर्धाही आयोजित केली जाते. त्यांनी येथे ‘स्पोर्ट्स फिजिओलॉजी’ हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. ‘स्पोर्ट्स सायंटिस्ट’ घडविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. भारतामध्ये स्पोर्ट्स सायन्स एवढे विकसित झाले नाही. स्पोर्ट्स फिजिओ हल्ली व्यवसाय म्हणून करतात. तसेच त्यांना डीआरडीओसोबत काम करण्याची इच्छा आहे. कारण, जे अंतराळात जातात त्यांची शरीर कार्यप्रणाली बदलते. असे बदल झाल्यानंतर कसे काम करावे, हा दुर्लक्षित विषय आहे, असे ते सांगतात. येत्या पाच वर्षांमध्ये तीन विषयांवर ते काम करणार आहेत. स्पोर्ट्स फिजिओलॉजी, एव्हिएशन फिजिओलॉजी, रिप्रोड्यूसिव्ह फिजिओलॉजीबद्दल माहिती कमी आहे.

 

- नितीन जगताप

  
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0