
साधे डोकेदुखी असली किंवा इतर मोठा काही आजार, बहुतांश रुग्णांची पावलं आधी अॅलोपॅथी डॉक्टरांकडे वळतात. त्यात हल्ली ग्रामीण भागामध्येही दवाखान्यांमध्ये खूप वाढ झाली आहे. डॉक्टरकडे गेले की, साधारण १० मिनिटांमध्ये निदान-प्राथमिक उपचार होत असले तरी आयुर्वेदिक उपचाराला बराच वेळ लागतो. शिवाय, ते खूप खर्चिक आहेत, असाही अनेकांचा समज. परंतु, आयुर्वेदीक उपचार हे अॅलोपॅथीपेक्षा स्वस्त असून त्याद्वारे थंडीतापापासून कॅन्सरसारख्या आजारांवरील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. आयुर्वेदाबाबत जनजागृती करून आयुर्वेदाचे कार्यक्षेत्र विस्तारण्याचा वैद्य नितीन थोरात यांनी ध्यास घेतला आहे.
नितीन थोरात बारावीनंतर एमबीबीएस(अॅलोपॅथी)साठी ते प्रयत्नशील होते. परंतु, काही कारणास्तव त्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी बीएएमएस (आयुर्वेद) चा कोर्स केला. शिक्षणानंतर अॅलोपॅथी प्रॅक्टिस सुरू करण्याचा त्यांचा विचार होता. त्यादृष्टीने त्यांनी महाविद्यालयात प्रवेशही घेतला. परंतु, शिक्षकांनी आयुर्वेदाविषयी त्यांच्या मनात प्रेम निर्माण केलं. आयुर्वेदाचे ग्रंथ वाचताना नकळत आयुर्वेदाची आवड त्यांच्यामध्ये निर्माण झाली. त्यामुळे आयुर्वेदाच्या सखोल अभ्यासावर त्यांनी भर दिला. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी वैद्य समीर जमदग्नी यांच्याकडे प्रॅक्टिस सुरू केली. त्यामुळे एकीकडे शिक्षण आणि जमदग्नी सरांकडे प्रॅक्टिस आणि त्यासोबतच रुग्णालयातील प्रॅक्टिस अशी नितीन यांची तारेवरची कसरत सुरू झाली. नितीन यांचे पदव्युत्तर शिक्षण औषध निर्माणशास्त्रमध्ये झाले आहे. त्याचाही त्यांना चांगला फायदा झाला.
पुण्यात आयुर्वेद संस्कृतीचा चांगला प्रभाव आहे. तसेच लोकांनी ही संस्कृती आत्मसात केल्याचे ते सांगतात. आयुर्वेदाचे ज्ञान संकलन सुरूच होते. अशातच त्यांनी स्वत: अकलूज येथे प्रॅक्टिस सुरू केली. प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर बरेच जण अगदी सावधपणे पुढची पावलं टाकतात. पण, एखादी घटना अशी घडते की, आपला आत्मविश्वास दुणावतो. असेच एका किस्सा डॉ. नितीन थोरात यांच्याबाबतीतही घडला. एका पुरुषाच्या पोटात वारंवार पाणी जमा व्हायचे. त्याला रुग्णालयात दाखल होऊन पाणी टॅपिंग करून काढावे लागायचे. दर तीन महिन्यांनी हे करावे लागायचे. परंतु, पुन्हा पोटात पाणी तयार व्हायचे. त्यामुळे तो या त्रासाने ग्रासला होता. एका रुग्णाने त्याला आयुर्वेदिक उपचारांचा सल्ला दिला. तो रुग्ण आयुर्वेदिक उपचारांमुळे पोटातील पाणी न काढता आठ दिवसांत बरा झाला. पुढील सहा महिने त्याच्या पोटात पाणी झाले नाही आणि तो कायमचा बरा झाला. त्या रुग्णाच्या सल्ल्यानुसार या महिलेनेही डॉ. नितीन थोरात यांच्याकडून आयुर्वेदिक उपचारांचा मार्ग स्वीकारला. तिचे उपचारही यशस्वी झाल्याने आयुर्वेदिक उपचारांतून जलद दिलासा मिळाल्याचे तिने अनेकांना सांगितले. तसेच तिच्या अॅलोपॅथीच्या डॉक्टरांनाही तशी कल्पना दिली. तिच्या डॉक्टरांनीही आयुर्वेदाची प्रशंसा केली. त्यांच्यामध्येही आयुर्वेदाविषयी विश्वास निर्माण झाला. पूर्वी त्यांच्याकडे रोज दोन ते तीन रुग्ण येत असत. परंतु, या महिलेने ही गोष्ट इतरांना सांगितल्यानंतर दररोज आठ ते दहा रुग्ण डॉ. नितीन थोरात यांच्याकडे उपचाराला यायला लागले.
खरं तर, आयुर्वेदामध्ये रुग्णाला जास्त वेळ द्यावा लागतो. त्याचा पूर्ण वैद्यकीय इतिहास तपासावा लागतो. आजाराचे मूळ कुठे आहे, ते शोधावे लागते. रुग्णाचे खानपान, वागणूक कशी आहे, हेही पाहावे लागते. त्यामुळे रुग्णाला तपासण्यास अर्धा ते पाऊण तास लागतो, असे ते सांगतात. ग्रामीण भागात काम करण्याचा अनुभव मिळाल्यानंतर डॉ. नितीन थोरात यांना शहराची ओढ लागली. पुढील काम शहरात करण्याचा निर्णय घेऊन ते नवी मुंबईला स्थलांतरित झाले. आज ते गेल्या १२ वर्षांपासून आयुर्वेदाच्या माध्यमातून शेकडो रुग्णांवर उपचार करत आहेत. या प्रवासामध्ये त्यांना अनेकांची प्रेरणा मिळाली. वैद्य दातारशास्त्री, वैद्य समीर जमदग्नी, वैद्य कोल्हटकर, वैद्य संजय पेंडसे यांच्याकडून प्रेरणा घेत आयुर्वेद प्रॅक्टिसचा विचार आपण पक्का केल्याचे डॉ. नितीन थोरात सांगतात. लोकांमध्ये आयुर्वेदाबाबत पुरेशी माहिती नसल्याने डॉ. थोरात यांना याबाबत सर्वप्रथम जनजागृती करावी लागली. त्यांनी पंढरपूर, माढा, मोहोळ, सांगोला, माळशिरस या ग्रामीण भागांमध्ये आयुर्वेदिक शिबिरे आयोजित केली. लोकांना एकत्र करून व्याख्याने दिली. एवढेच नव्हे तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी केली. गावागावांतील सरपंचांना आयुर्वेदाचे महत्त्व पटवून दिले. महिलागटांना याबाबत माहिती दिली. एकीकडे ते आयुर्वेदाच्या प्रसारासाठी जनजागृती करत असताना, त्यांच्यासमोर अॅलोपॅथिक डॉक्टरांच्या नकारात्मक भूमिकेचे आव्हान उभे राहिले होते. आयुर्वेदाविषयी बरेचदा अॅलोपॅथिक डॉक्टर रुग्णांना नकारात्मक माहिती देतात. त्यामुळे रुग्णांचा आयुर्वेदावर विश्वास बसत नाही. परंतु, त्यांनी हार न मानता आपले काम सुरूच ठेवले. त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांवर उपचार केल्यानंतर त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले. त्यामुळे आयुर्वेदिक उपचारांकडे रुग्णांचा ओघ वाढल्याचे ते सांगतात.
यशाचा मूलमंत्र
"पूर्वी लोकांचा आयुर्वेदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. आयुर्वेद म्हणजे काय तर झाडपाला हाच लोकांचा समज होता. पण, त्यामागेही रसायनशास्त्र आहे, जे कित्येकांना माहितीही नाही. यामध्ये वेगवेगळ्या धातूंपासून औषधांची निर्मिती होते. त्यात सुवर्ण धातू आहे, चांदी आहे, लोह, पाषाण, शिसे, ताम्र आदी धातूंचा समावेश होतो. त्यापासून रुग्णाला तत्काळ दिलासा मिळतो."
डॉ. नितीन थोरात यांनी मुंबईच्या अशाच एका रुग्णाच्या समस्येचे आयुर्वेदाने निदान केले. त्या मुलीला काहीही खाल्ल्या-पिल्ल्यानंतर जुलाब व्हायचे. अॅलोपॅथी डॉक्टरांनी तिला सांगितले होते की, हा आजार कायमस्वरूपी आहे. त्यामुळे ती मुलगी आणि तिचे कुटुंब भीतीच्या छायेत होते. मुलीच्या भविष्याची चिंता पालकांना सतावत होती. मात्र, डॉ. थोरात यांनी आयुर्वेदिक उपचार केल्यानंतर फक्त १५ दिवसांमध्ये फरक दिसू लागला. तिला भूक लागत नव्हती. भूक लागायला लागली की अन्न पचत नव्हते. उपचारानंतर तिला अन्नाचे पचनही होऊ लागले आणि तिचे जुलाबही थांबले. वजन वाढले आणि पोट दुखीही कायमची थांबली. आयुर्वेदाबाबत वृत्तवाहिन्यांमधूनडी डॉ. नितीन थोरात सातत्याने जनजागृती करत असतात आणि मासिकांमधूनही त्यांचे लिखाण सुरू असते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे मधुमेहाचा आजार जडतो. कामाच्या तणावातून साखरेचे प्रमाण वाढते. याबाबत डॉ. थोरात यांनी मार्गदर्शनपर लिखाण केले. थोरात यांनी सध्या पाच बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. भविष्यात ५० बेडचे रुग्णालय सुरू करायचा त्यांचा मानस असून, त्यामध्ये सर्व आजारांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात येतील. पंचकर्म, वमन, केरळ पद्धतीचे शिरोधारा, रस औषधी इत्यादी. उपचार करण्यात येतील. एखादा आजार झाला आणि पथ्य पाळले नाही तर तो आजार पुन्हा डोके वर काढतो. तो आजार पुन्हा होऊ नये म्हणून ‘अपुनर्भव’ पद्धत वापरली जाते. आयुर्वेदामध्ये नावांवरून नव्हे, तर लक्षणांवरून रोगनिदान केले जाते. आयुर्वेदिक उपचारांमुळे कॅन्सरचा रुग्ण जो दोन वर्ष जगणार होता, तो १४ वर्ष जगला आहे. आयुर्वेदिक उपचारांत कॅन्सरचं पहिल्या टप्प्यापासून दुसर्या टप्प्याला पोहोचण्याचे जे अंतर आहे, ते वाढवलं जातं. त्यामुळे रुग्णाला सुखमय आयुष्य जगता येतं. म्हणूनच आयुर्वेदामध्ये खूप चांगले उपचार असून ते करून घेणे गरजेचे असल्याचे आवाहन डॉ. नितीन थोरात आवर्जून करतात.
- नितीन जगताप
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat