लाज कशी वाटत नाही?

    दिनांक  06-Apr-2019

निवडणूक हा खरंच उत्सव असतो आपल्या देशात. इंग्रजांशी संघर्ष करून महत्प्रयासाने प्राप्त केलेल्या स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीतला किंवा आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने लादलेल्या हुकूमशाहीविरुद्ध मैदानात उतरून रणिंशग फुंकले गेल्यानंतरच्या निवडणुकीत लोकांचा हा उत्साह ओसंडून वाहणे स्वाभाविकच होते. पण, नंतरच्या काळातही ग्रामपंचायतीपासून तर लोकसभेपर्यंतच्या अन् जिल्हा परिषदेपासून तर विधानसभेपर्यंतच्या प्रत्येकच निवडणुकीतली लोकांची रुची दखलपात्रच म्हटली पाहिजे. मतदान करोत वा न करोत, राष्ट्रपतिसारख्या पदासाठी होणार्या निवडणुकीशी थेट संबंध असो वा नसो, पण त्याच्या निकालापासून तर त्यातील राजकारणापर्यंत प्रत्येक बाबतीत लोकांचे स्वारस्य वाखाणण्याजोगेच. अपवादात्मक परिस्थितीत उमेदवार कोण, यावरून मतदानाचा निर्णय ठरतो मतदारांचा. पण, बहुतांशी, राजकीय पक्षाशी ईमान राखत मतदान करण्याची तर्हा अनुसरतात लोक इथे. राष्ट्रीय पातळीवरील मुद्यांवर स्थानिक पातळीवर भांडण्याची, त्यावरून आपसात वाद घालण्याची रीतही नवीन नाही या देशात.
बरं, राजकीय पक्षांनी त्यांचे त्यांचे मुद्दे लोकांना पटवून देण्याची पद्धतही लय भारी असते इथे. अमेरिकेसारखे, उमेदवारांनी विविध मुद्यांवरची त्यांची मतं मांडायची, लोकांनी घरात टीव्ही, इंटरनेटवरून त्याचे अवलोकन करायचे आणि प्राप्त परिस्थितीत देशहितार्थ कोण योग्य राहील, याचा सखोल विचार करून मतदान करायचे, असे सहसा घडत नाही आपल्याकडे. अमेरिकेसारख्या बलाढ्य, श्रीमंत देशाचा डोलारा कर्जातून उभारलेल्या पैशातनं चालला असल्याच्या निष्कर्षाप्रत येण्याइतकी आणि त्यावरचा उपाय म्हणून आता कुणाच्या हातात सत्ता सोपवली पाहिजे, याबाबत निर्णय घेण्याइतकी सुज्ञ आहे तिथली जनता. आपल्याकडे लोकांनी त्यांच्या पातळीवर कुठल्याशा मुद्यावर स्वत: अवलोकन, अभ्यास करून निर्णयाप्रत येण्याची शक्यता दुरापास्तच. इथे तर ‘अमुक अमुक आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं...’ असं म्हणणारी माणसंच अधिक. गर्दीसोबत वाहात आणि वाहवत जाणारी... त्यामुळे, स्वत:ची अशी खास मतं नसणार्या या जनतेची विचार करण्याची पद्धती निश्चित करणारी, त्यांना आपल्यानुरूप स्वत:ची मतं तयार करायला लावणारी, किंबहुना ते स्वत:च्या स्तरावर भल्याबुर्याचा विचारच करू शकणार नाही इतके त्यांना पांगळे करून ठेवणारी तर्हा स्वातंत्र्योत्तर काळात या देशात अंमलात आणली गेली. त्याचे परिणाम-दुष्परिणाम समोर आहेत... कालपर्यंतच्या समाजव्यवस्थेत कुठेही नसलेले कन्हय्याकुमार किंवा हार्दिक पटेल आदी लोक जनतेचे मतपरिवर्तन करण्याचा दावा करू शकतात, हे कशाचे द्योतक मानायचे?
लोकांना जागृत होऊच द्यायचे नाही. त्यांना त्यांच्या बुद्धीने विचार करूच द्यायचा नाही. त्यांना भलत्याच विषयांभोवती गुंतवून ठेवायचे. त्यांच्यातली निर्णयक्षमता कुंठित करून ठेवायची. मेहनतीचे महत्त्व विशद करण्याऐवजी फुकटात काहीतरी मिळवण्याची सवय लावून त्यांना मिंधे बनवून ठेवायचे. सरकारी तिजोरीतून त्यांच्यावर योजनांचा पाऊस पाडायचा, त्यांची गरिबी सरकार दूर करणार असल्याचे सांगून आशा पल्लवित करायच्या. एखाद्यात स्वबळावर उभे राहण्याची ताकद निर्माण करण्याऐवजी त्याला पंगू करून ठेवायचे. निवडणुकीच्या काळात दारू, पैसा ओतायचा. लाखमोलाचे ‘मत’ कवडीमोलाच्या बदल्यात मिळविण्याचे राजकारण करायचे... हाच तमाशा तर चालला इतकी वर्षं. आधीच गुलामगिरीच्या मानसिकतेत जगणारी लाखोंच्या घरातली माणसंही स्वत:चं अस्तित्व विसरून कुणाचातरी जयघोष करण्यातच धन्यता मानून टाळ्या पिटत राहिली आजवर. अंगावर वेगाने धुराळा उडवून निघून गेलेल्या आपल्याच नेत्याच्या वाहनांच्या ताफ्याकडे बघून हात हलवीत राहिली. राजकारणात गेलेली माणसं कुठलाही व्यवसाय-उद्योग न करता इतकी झटपट श्रीमंत कशी होतात, आपल्या एका मताच्या भरवशावर ज्यांना अधिकार बहाल झालेत ते लोकप्रतिनिधी, मंत्री नंतर आपल्याच बाबतीत असे अचानक मुजोर कसे होतात, असा प्रश्नही कुणाच्या मनात निर्माण होत नाही. कारण, निवडणूक जिंकणार्याने अल्पावधीत श्रीमंत होणे आणि नंतर त्याला माज चढणे, हा राजकारणाचा स्वाभाविक परिणाम असल्याचे इथल्या सामान्यजनांनी आपल्या मनाशी कधीचेच मान्य करून टाकले आहे.
इथली जनता विचारच करीत नाही, तिला स्वत:ची मतं नाही, ती कुठल्याही मुद्याच्या मागे नेले तसे वाहवत जाते, ती जाब विचारण्याची हिंमतदेखील करीत नाही म्हटल्यावर तिला मूर्ख बनविण्याच्या नाना क्लृप्त्या खेळल्या गेल्या नसत्या तरच नवल! कॉंग्रेसने आजवर तेच केले. विरोधकांना सत्तेवर येण्याची संधी कधी प्राप्तच होणार नाही, या पद्धतीचे राजकारण त्या पक्षाच्या नेत्यांनी अंमलात आणले. बरं, जनताही इतकी भोळी की, इंदिराहत्येचा क्षोभ व्यक्त करण्याच्या नादात, राजीव यांची पंतप्रधानपदी झालेली निवडही तिच्या सहज पचनी पडली. राजानंतर त्याच्या मुलाने राज्यकारभार बघायला इथे काही राजेशाही अस्तित्वात नव्हती. पण, एरवी लोकशाहीचा गवगवा करणार्या भल्याभल्यांनी इंदिरानंतर राजीव यांचा ‘राजतिलक’ विनासायास मान्य केला. आक्षेपाचा चकार शब्द काढला नाही कुणीच त्या वेळी. अशा भोळ्या जनतेला मूर्ख बनवणे फार सोपे असल्याची बाब अगदी व्यवस्थितपणे जाणली ती कॉंग्रेस नेत्यांनी. त्या पक्षाच्या नेत्यांनी इथल्या जनतेवर सत्ता गाजवली. जातिपातीचे राजकारण करत धर्मनिरपेक्षतेचा गवगवा मोठ्या दिमाखाने केला. सारा सरकारी कारभार स्वत:च्या घराण्याभोवती फिरत राहील, याची तजवीज केली. सरकारी तिजोरीतून राबवल्या जाणार्या योजनांना जवाहर, इंदिरा, राजीव, संजय अशी नावं देण्यात आलीत. कॉंग्रेस आहे म्हणून तुमचे अस्तित्व आहे, अशी भावना निर्माण करीत लोकांवर राज्य करण्याचा प्रयोग तब्बल सहाहून अधिक दशकं चालला. लोकलज्जा खुंटीवर टांगून लोकांना फसवण्याचा त्यांचा धंदा मात्र आजही सुरूच आहे.
येत्या काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लाज कशी वाटत नाही?’ ही टॅगलाईन असलेल्या जाहिराती या पक्षाद्वारे प्रसुत होताहेत. वेगवेगळी उदाहरणं अन् समाजातील वेगवेगळ्या घटकांचा उपयोग करून, केंद्र सरकारमधील नेत्यांना मतं मागण्याची लाज कशी वाटत नाही, या सवालाने त्या जाहिरातीचा शेवट होतो. गंमत बघा! ज्यांनी या देशावर आणिबाणी लादली ते निर्लज्जपणे लोकशाहीरक्षणाच्या बाता हाकताहेत. ज्यांनी बोफोर्सपासून कोळशापर्यंतचे झाडून सारे घोटाळे केलेत, ते आता ‘चौकीदार’ चोर असल्याच्या आरोळ्या ठोकताहेत. ज्यांनी आजवर बेशरमपणे वागण्यात अन् या देशातील जनतेला मूर्ख बनवण्यात धन्यता मानली ते आता विद्यमान सरकारची लाज काढायला सरसावले आहेत... खरंतर, लाज कुणाला वाटली पाहिजे? भ्रष्टाचार कुणी केला? नेत्रदीपक विकास कुणाच्या कार्यकाळात होतोय्? कॉंग्रेस आणि भाजपाच्या सत्ताकाळातला फरक नेमका काय आहे? शासकीय योजनांचा लाभ देताना मधली दलाली कुणी हटवली? त्या योजनांना नावं देताना घराण्यातल्या कुणाची नावं न देण्याचे औदार्य कुणाला दाखवता आले? टुजी, कॉमनवेल्थचे घोटाळे करणारी मंडळी चोर आहे की साव? मग ती कोणत्या तोंडाने इतरांना चोर ठरवायला निघाली आहे? असे करताना जराशीही लाज वाटत नाही का त्या मंडळीला...
 
 
 
 
असले बोचरे प्रश्न तर खूपसारे आहेत. पण करता काय, आपल्या देशातली जनता लय भारी आहे. ती भावुक आहे. जाती-धर्माचा विचार करणारी आहे. दूरवरचा विचार न करता क्षणिक मुद्यांवर वाहवत जाणारी आहे. पाचशेची एक नोट अन् दारूच्या एका बाटलीच्या बळावर शेकड्याने मतं पालटता येत असल्याचा अनुभव गाठीशी आहे. म्हणूनच इथे निर्लज्जांना दुसर्याची लाज काढण्याची हिंमत होते. म्हणूनच इथे भ्रष्टाचारी लोक इतरांना चोर ठरवायला निघाले आहेत. खंबीरपणे पाठीशी कुणाच्या उभं राहायचं, आपलं मत विकायचं की सदसद्विवेकबुद्धी शाबूत ठेवून मतदान करायचं, हेतर मतदारांनाच ठरवावं लागणार आहे. नाहीतर लाज कशी वाटत नाही, असा सवाल विचारणार्या कॉंग्रेसजनांचीही कमी नाही अन् ऐन निवडणुकीच्या तोंडावर छत्रपतींचे स्मरण करणार्या पवारांचीही वानवा नाही इथे...