कामाचा शंख आणि बोलणारा शंख

    दिनांक  06-Apr-2019   आणखी एक प्रश्न मनात निर्माण होतो, लोकशाहीत प्रजा ही राजा असते. राजाने सेवकांना धन द्यायचे, मानधन द्यायचे, सन्मान द्यायचा असतो. परंतु, गांधी घराण्याचे सर्व उलटे आहे. राहुल गांधी यांनी राजालाच भीक द्यायचे ठरविलेले आहे. राजघराण्याच्या राजपुत्राची लोकराजाला ही भीक आहे. त्याला त्यांनी ‘न्याय’ असे म्हटले आहे.


प्रेमात, युद्धात आणि निवडणूक प्रचारात सर्व काही क्षम्य असते. लोकसभा निवडणुकांचा मोसम सध्या चालू आहे. वर्तमानपत्रात आणि दूरदर्शन वाहिन्यांवर ज्या बातम्या येत राहतात, त्या ऐकायच्या असतात, वाचायच्या असतात. परंतु, फारशा गंभीरपणे घ्यायच्या नाहीत. एखाद्याने जर गंभीरतेने सर्वांचे बोलणे घ्यायचे ठरविले, तर त्याची मोठी पंचाईत होईल. काल-परवापर्यंत उद्धव ठाकरे मोदींवर कठोर टीका करीत होते, पण, आज ते त्यांची स्तुती करतात. पवार-मोदी, मोदी-राहुल गांधी, मोदी-ममता, यांची जुगलबंदी जर आपण फार गंभीरपणे घेत बसलो तर हे नेते काही कामाचे नाहीत, असे मत आपल्याला बनवावे लागेल. पण ते काही खरे नसते. निवडणुकींचा प्रचार म्हणजे शिमगा असतो, कोणाला काहीही बोलण्याचे स्वातंत्र्य असते. शिमग्याच्या शिव्या कोणी लक्षात ठेवत नाहीत. या प्रकारात विविध राजकीय पक्ष जे जाहीरनामे प्रकाशित करतात. त्यांचाही समावेश करावा लागतो. कोणी यांना वचननामे म्हणतात, तर कोणी यांना बांधिलकी म्हणतात. निवडणूक काळातील दिलेली वचने कशी असतात? त्याविषयी म्हटले जाते की, ही वचने कायद्यासारखी असतात, हुशार माणसाला कायदा केव्हा मोडायचा हे उत्तम समजते. या जाहिरनाम्यात गुलाबी चित्र रंगविलेले असते. त्याविषयी म्हटले जाते की, वचननाम्यात गुलाबांचा वर्षाव आणि आश्वासनांची खैरात असते, परंतु ज्यांच्यासाठी या सर्व गोष्टी असतात त्यांना मात्र काट्यांच्या मार्गावरून चालावे लागते. काँग्रेस पक्षाने आपला निवडणूक जाहिरनामा जाहीर केला आहे. त्याचे शीर्षक आहे, ‘हम निभायेगें’ आम्ही पूर्तता करू. कशाची? दर महिन्याला दोन कोटी गरीब कुटुंबांना सहा हजार रुपये देऊ, चार लाख नोकऱ्या निर्माण करू, शेतीचा वेगळा अर्थसंकल्प तयार करू, देशद्रोहाचा कायदा रद्द करू, महिलांसाठी विधानसभेत आणि लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देऊ, सैन्यदलाला विशेष अधिकार देणारा कायदा AFSPA रद्द करू, बदनामी कायद्यात बदल करू, नीति आयोग रद्द करू, इ... इ... या जाहीरनाम्यावर खरोखरच काही लोकांनी गंभीरपणे चर्चा सुरू केली आहे. जाहीरनामा गंभीरपणे घ्यायचा असतो, हे काँग्रेस पक्षाने यावेळी दाखवून दिले, त्याबद्दल काँग्रेसचे अभिनंदन करायला पाहिजे. तो गंभीरपणे घेण्याचा विषय नसता, तर नरेंद्र मोदी, अरुण जेटली, योगी आदित्यनाथ, मायावती इ. राजनेत्यांनी त्याची दखल घेतली नसती आणि त्यावर चर्चादेखील केली नसती. काँग्रेस पक्षाने या सर्व राजनेत्यांना जाहीरनाम्यावर मते व्यक्त करण्यास भाग पाडले. म्हणजे त्यांनी जी विषयसूची ठेवली, त्यावर अभिप्राय देण्यास सर्वांना भाग पाडले आहे.

 
 
राजकीय भाषेत सांगायचे तर काँग्रेस पक्षाने चार पावले पुढे टाकलेली आहेत. राहुल गांधी यांना गंभीरपणे घेतले पाहिजे, अशी चर्चा सध्या सुरू आहे, हे यशदेखील कमी महत्त्वाचे नाहीअसे असले तरी शेवटी हा जाहीरनामा आहे. ट्रम्प यांची अध्यक्षीय निवडणूक असताना तेथे एक कथा सांगण्यात आली, ती अशी, मुलगा आईला विचारतो, “आई, सगळ्या परिकथांची सुरुवात ‘क़ोणे एकेकाळी’ याच शब्दांनी होते का गं?” आई म्हणते, “सगळ्याच कथांची अशी सुरुवात होत नाही. काही परिकथांची सुरुवात ‘जर मी निवडून आलो तर, मी आश्वासन देतो की....’ याने होते.” राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आश्वासने दिली, ‘मेक्सिको सीमेवर भिंत बांधू, बेकायदेशीरपणे घुसलेल्यांना अमेरिकेतून हाकलून लावू, हिलरी क्लिटंन यांची चौकशी करू आणि त्यांना तुरुंगात पाठवू, पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवू, ओबामा यांची आरोग्यविषयक धोरणे रद्द करू, चीनच्या मालावर आयात कर बसवू, जागतिक तापमान करारातून बाहेर पडू, इ. ट्रम्प यांना ‘गादी’वर येऊन आता तीन वर्षे होत आली. ट्रम्प यांची ही सर्व आश्वासने परिकथेप्रमाणे झालेली आहेत. राहुल गांधी यांनी आश्वासने भरपूर दिलेली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी त्यांना लोकसभेत २७२ जागा मिळवाव्या लागतील. आज ४४ जागा आहेत. ४४ वरून २७२ जागा ही झाली ‘हनुमान उडी!’ ती त्यांनी जर मारली, तर त्यांना सलामच करावा लागेल, त्यांचे नेतृत्व मान्य करावे लागेल. परंतु, उडी मारता मारता मध्येच आपटले तर... कोणीही काँग्रेस पक्षाला आज बहुमत मिळेल, असे मानत नाही. पंतप्रधानांच्या शर्यतीत मायावती, ममता, शरद पवार, दक्षिणेतील एखादा राजनेता उभा राहील, तेव्हा काँगे्रस पक्षाचा जाहीरनामा परिकथेसारखा ठरेल. राजकीय निरीक्षकांचे मत असे आहे की, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील. रालोआला बहुमत मिळेल आणि त्यांचेच सरकार पुन्हा येईल. ही वस्तुस्थिती मान्य केली, तर निवडणुकांपूर्वी वाटेल ती आश्वासने देण्यात कोणाचेच काही जात नाही.
 

काँग्रेस जाहीरनाम्यातील आश्वासनासंबंधी आताच काही प्रश्न उत्पन्न झालेले आहेत. २ कोटी गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये कुठून आणणार? गरिबीची व्याख्या काय करणार? त्यांचा शोध कसा घेणार? चार लाख सरकारी नोकऱ्या देऊन बेकारीची समस्या कशी सुटणार? सैन्याला शक्ती देणारा कायदा दूर करून दहशतवाद्यांच्या हातून त्यांना मरू देणार का? देशद्रोहाचा कायदा रद्द करून ‘भारत तेरे टुकडे होंगे’ असे म्हणणारी पलटण वाढविणार का? नक्षलवाद्यांना मोकळे रान देणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे राहुल गांधी, प्रियांका गांधी, आणि सोनिया गांधी यांनी द्यायला पाहिजेत. काय गंमत असते बघा, उमेदवाराने मतदाराला एक हजार रुपये दिले, तर तो भ्रष्टाचार होतो आणि वर्षाला मी ७२ हजार रुपये देतो, असे जाहीरनाम्यात म्हटले, तर तो भ्रष्टाचार होत नाही. पहिला प्रकार लाच देण्याचा होतो आणि दुसरा प्रकार आश्वासन देण्याचा होतो. ‘आश्वासन देणे’ हा ‘भ्रष्टाचार’ नाही. ‘कायदा गाढव असतो’ असे जे म्हणतात, ते असे. आणखी एक प्रश्न मनात निर्माण होतो, लोकशाहीत प्रजा ही राजा असते. राजाने सेवकांना धन द्यायचे, मानधन द्यायचे, सन्मान द्यायचा असतो. परंतु, गांधी घराण्याचे सर्व उलटे आहे. राहुल गांधी यांनी राजालाच भीक द्यायचे ठरविलेले आहे. राजघराण्याच्या राजपुत्राची लोकराजाला ही भीक आहे. त्याला त्यांनी ‘न्याय’ असे म्हटले आहे. ‘न्यूनतम आय योजना’ याची ही छधअधअ इंग्रजी अद्याक्षरे आहेत. ‘न्याय’ याचा अर्थ ‘न्याय’ असाही होतो आणि त्याचा दुसरा ‘नाय’ असाही होतो, म्हणजे काहीच नाही. आपण कोणता अर्थ घ्यायचा? आश्वासनाची एक गोष्ट आठवली.

 

एका गरीब माणसाची दया येऊन देव त्याला एक शंख देतो. देव त्या माणसाला सांगतो की, तू जे मागशील ते हा शंख तुला देईल. शंख घेऊन तो गरीब माणूस आपल्या गावी जायला निघतो. रात्र झाल्यामुळे एका गावात, ओळखीच्या एका मित्राकडे थांबतो. तो भोळा असल्यामुळे देवाने मला काहीही देणारा शंख दिला आहे, असे सांगतो. शंख काढून तो त्या शंखाकडे उत्तम जेवण मागतो. ते त्याला लगेच मिळते. रात्री तो झोपला असता, त्याचा मित्र त्याचा शंख काढून घेतो आणि त्याच्या जागी घरातील साधा शंख ठेवतो. तो गरीब माणूस दुसऱ्या दिवशी आपल्या गावी जातो आणि बायकोला म्हणतो, “बघ, मी काय आणलं आहे?” असे म्हणून तो शंख काढतो आणि त्याची कथा सांगतो. त्या शंखाकडे तो खूप गोष्टी मागतो. त्यातील त्याला काहीच मिळत नाही. ‘देणारा शंख’ त्याच्या मित्राने चोरलेला असतो. बायको वैतागते, रागावते आणि कामाला लागते. तो गरीब माणूस पुन्हा देवाकडे जातो आणि देवाला म्हणतो, “देवा, तू माझी थट्टा का केलीस?, तू दिलेला शंख काहीही देत नाही.” देवाच्या सर्व लक्षात येते. तो त्याला दुसरा शंख देतो आणि सांगतो, हा शंख तुला मागेल त्यापेक्षा दुप्पट देईल. हा शंख घेऊन पुन्हा तो आपल्या मित्राकडे येतो. त्याला शंखाची कथा सांगतो. मित्र रात्री त्याचा शंख चोरतो आणि पहिला शंख तिथे ठेवतो. दुसऱ्या दिवशी लबाड मित्र त्या शंखाकडे दहा हजार रुपये मागतो. शंख म्हणतो, “दहा हजार काय मागतोस, ७२ हजार माग किंवा त्याच्या पटीत माग.” जरा वेळाने तो पुन्हा शंखाकडे मागणी करतो की, माझ्या राज्यात ४० लाख नोकऱ्या निर्माण कर! शंख म्हणतो, “चाळीस लाख कशाला एक कोटी करतो.” जे मागावे त्याच्या दुप्पट-तिप्पट देण्याचे आश्वासन शंख देत राहतो. परंतु, प्रत्यक्षात काही देत नाही. शेवटी वैतागून लबाड मित्र म्हणतो, “अरे, तू तर नुसती आश्वासने देऊन राहिलास, प्रत्यक्षात काही तरी दे.” त्यावर तो शंख म्हणतो, “अरे, माझे काम आश्वासन देण्याचे आहे. देण्याचे काम दुसरा शंख करतो, जो तू तुझ्या मित्राला परत केला आहेस. माझे काम फक्त हे देईन, ते देईन, हेच सांगण्याचे आहे.” राहुल गांधींचा जाहीरनामा कोणत्या शंखाचा आहे?

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat