संपूर्ण काश्मीर भारताचेच : अमित शाह

06 Apr 2019 21:24:54


 


कलम ३७० व ३५ ए रद्द करणारच


अहमदाबाद : गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी काढलेल्या ‘रोड शो’ला नागरिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. यावेळी त्यांनी उपस्थित एक लाखावर जनतेला संबोधित करताना, ‘संपूर्ण काश्मीर भारताचेच आहे,’ असे जाहीरपणे सांगितले.

 

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात येईल, असे अमित शाह यांनी अलीकडेच सांगितले होते. त्यावर राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी, अमित शाह दिवास्वप्न पाहात आहेत, अशी टीका केली होती. याच अनुषंगाने अमित शाह यांनी या रोड शोमध्ये, केवळ जम्मू-काश्मीरच नाही, तर गुलाम काश्मीरही भारताचेच आहे आणि ते आम्ही परत मिळविणार आहोत, असे ठणकावून सांगितले.

 

अहमदाबादच्या सारखेज भागातून आज सकाळी नऊ वाजतारोड शोसुरुवात करण्यापूर्वी अमित शाह यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य दीनदयाल उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमांना माल्यार्पण केले. यावेळी संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, ‘जिथे मुखर्जी यांनी प्राणाहुती दिली, ते काश्मीर आपलेच आहे, संपूर्णच काश्मीर आपलेच आहे.’ यावेळी त्यांच्या सभेत उपस्थित नागरिकांनीही, संपूर्ण काश्मीर भारताचेच असून, ते कुणीही हिरावू शकत नाही, अशा घोषणा दिल्या.

 

यानंतर अमित शाह यांनी खुल्या वाहनातून रोड शो केला. त्यांच्या वाहनात गुजरात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी आणि अन्य काही नेते उपस्थित होते. गांधीनगर मतदारसंघात येणाऱ्या अहमदाबाद शहरातील अनेक भाग त्यांनी रोड शोच्या काळात व्यापला. दुपारी एक वाजता वस्त्रपूर भागातील हवेली येथे या रोड शोचा समारोप झाला. सायंकाळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांसोबतही संवाद साधला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0