संघर्षाचीही नौका पार करणारा नौकानयनपटू

    दिनांक  05-Apr-2019   


 


सामान्य कुटुंबात जन्माला येऊन आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या, जीवनातील संकटे ही संधी समजून त्या संकटांवर मात करत आपले कर्तृत्व सिद्ध करणारा, नौकेत बसून पाण्याला जसे झपाझप कापावे, तसे जीवनध्येय गाठताना वाटेतील अडचणी कापणारा आणि मनातील भीतीवर मात करण्यासाठी खास करून नौकानयन क्रीडा प्रकार निवडणारा भारताचा नौकानयन प्रकारातील एकमेव ऑलिम्पिकपटू दत्तू भोकनळ याचा हा जीवनप्रवाह...

 

नाशिक जिल्हा तसा कृषिआधारित असला तरी, येथील क्रीडापटूंनी भारताचे नाव जगाच्या नकाशावर नेहमीच कोरले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे दत्तू भोकनळ. दत्तूची एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा नौकानयनपटू म्हणून ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातल्या तळेगाव या छोट्या गावात एका कामगार कुटुंबात दत्तू भोकनळचा जन्म झाला. वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बीड जिल्ह्यात झालेल्या चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होऊन तो लष्करात दाखल झाला.पुण्यातल्या खडकी येथील ‘बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपया लष्कराच्या शाखेत काम करताना दत्तूने मनातील पाण्याची भीती जाण्यासाठी विशेषत्वाने ‘नौकानयन’ या क्रीडाप्रकाराची निवड केली. हा क्रीडाप्रकार शिकविण्यासाठी त्याला कुदरत अली हे गुरु म्हणून लाभले. दत्तूमधील नैसर्गिक क्रीडा कौशल्य हेरून त्याला या खेळातील पुढील शिक्षण घेण्यासाठी पुण्यातीलच ‘आर्मी रोविंग नोड्स’मध्ये बदली करून पाठविण्यात आले. तेथे नौकानयनचे राष्ट्रीय प्रशिक्षक इस्माईल बेग यांनी त्याला मार्गदर्शन केले. दत्तूने आपल्यातील उपजत गुण, सराव आणि प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या जोरावर 2014 मधील ‘राष्ट्रीय नौकानयन स्पर्धे’त भाग घेऊन दोन सुवर्णपदके पटकाविली. तसेच, 2014 मध्येच चीनमध्ये झालेल्या ‘आशियाई क्रीडास्पर्धे’त त्याने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते.

 

दत्तूचे तळेगाव रोही हे गाव सेवासुविधांच्याबाबतीत तसे मागेच. येथेच दत्तू लहानचा मोठा झाला. शेतात मजुरी, मग गुरे राखायची, या दत्तूच्या कामांमध्ये सर्वात महत्त्वाचे काम होते ते पाणी मिळवण्यासाठीची भटकंती. कारण, विहिरीही कोरड्या पडलेल्या असायच्या. पाण्यासाठी दाहीदिशा फिरताना पाण्याचे महत्त्व तर दत्तूने जाणलेच होते. मात्र, त्याच पाण्याला त्याने आपल्या कर्तृत्वाचे माध्यमदेखील बनविले. वडिलांचे निधन आणि गावातील अशी स्थिती यामुळे “जीवनातील संघर्ष हा मला जन्माचे गिफ्ट म्हणून मिळाला,” या शब्दात दत्तू आपल्या भावना व्यक्त करतो. आर्थिक चणचणीसह जीवनात दत्तूला आप्तस्वकीयांचा दुरावा यामुळे भावनिक संघर्ष व खेळामुळे झालेल्या व्याधींमुळे शारीरिक संघर्षालाही सामोरे जावे लागले. सैन्याच्या लेखी परीक्षेत मागे पडू, या शक्यतेने अथक मेहनत घेत दत्तूने शारीरिक परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करत सैन्यात प्रवेश मिळविला आणि दत्तू भोकनळ हा ‘हवालदार दत्तू भोकनळ’ झाला. सहा फूट चार इंच उंची असलेल्या दत्तूच्या शिरावर राजमुद्रा असलेली टोपी आता विराजमान झाली होती. सैन्यात पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये सहभागी झाल्यावर दत्तूने एखादा खेळ गांभीर्याने खेळायचा, असे मनी ठरवले. यासाठी त्याने नौकानयन या क्रीडाप्रकाराची निवड केली. जलतरण येत नसतानाही केवळ मनातील पाण्याची भीती घालवण्यासाठी आपल्या संघर्षमय स्वभावाला हाताशी धरून त्याने नौकानयन खेळात उतरण्याचे ठरवले. खेळासाठीचा आर्थिक भार सैन्याने उचलला होताच. मात्र, जे करायचे ते मनापासून आणि सर्वश्रेष्ठ असा स्वभाव धर्म असणाऱ्या दत्तूने रिओ ऑलिम्पिकमध्ये आपला प्रवेश निश्चित केला. क्रीडाक्षेत्रात सर्वात शेवटची स्पर्धा आणि या क्षेत्रातील ‘एव्हरेस्ट’ म्हणून ऑलिम्पिक ही स्पर्धा ओळखली जाते. ऑलिम्पिकसारख्या महान स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व आपण करणार, या भावनेने कणखर असणारा दत्तू पहिल्यांदा भावनिक झाला. दरम्यान, कोरियातील आशियाई प्राथमिक नौकानयन शर्यतीला जाण्याच्या आदल्या दिवशी त्याच्या आईचा अपघात झाला व त्यात तिची स्मृती गेली. कालांतराने त्याचे मातृछत्रदेखील हरपले. दत्तूच्या जीवनाचा संघर्ष हा अविभाज्य घटक ठरतो, तो त्याच्या जीवनात आलेल्या अशाच प्रसंगांमुळे. मात्र, या विपरित परिस्थितीत ही दत्तूने आपले संतुलन बिघडू न देता त्यावर मात करत आपले कणखर व्यक्तिमत्त्व साकारले आहे आणि त्याने नौकानयन क्रीडाप्रकारामध्ये आपल्या कर्तृत्वाची गुढी साता समुद्रापार उभारली आहे. “कदाचित सुखाचे जास्त क्षण मला घाबरवतील...,” असे दत्तू म्हणतो. परिस्थितीने त्याला कणखर बनवले आहे हे खरे, पण यात त्याने हसणे, आनंद घेणे विसरू नये, असे मनोमन वाटते.

 

यशाचा मूलमंत्र

 

जीवन हे संघर्षमय आहेच. मात्र, जीवनातील संकटे ही आपल्याला मिळालेली संधी आहे, असे आपण समजायला हवे. कशाचीही भीती न बाळगता जे काम करू त्यात स्वत:ला झोकून दिले, तर यश नक्कीच प्राप्त होते. कठोर मेहनत, ध्येयासक्ती आणि योग्य नियोजन हेच खरेतर यशाचे मूलमंत्र आहेत. पराभव आणि संकट यात खचून न जाता ‘जिना इसी का नाम’ हे असे म्हणत आपण कायम पुढे जाणे हेच हितकारक असते.

 

जीवनाच्या वाटेवर असणारी संघर्षाची स्थानके आजवर दत्तूने ‘लीलया’ ओलांडली आहेत. ‘लीलया’ हा शब्द जरी सहज वाटत असला तरी, त्यामागील व्यथा आणि मानसिकरित्या होणारी ओढाताण ही निश्चितच शब्दातीत आहे. बालपणापासून सभोवताली असणारी हलाखीची परिस्थिती, वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी हरपलेले पितृछत्र, तारुण्याच्या उंबरठ्यावर प्रवेश करताना कौटुंबिक जबाबदारीचे आलेली पोक्तता... या सगळ्यातूनही मार्ग काढत आपला सहज साधा व्यवहार दत्तूने जपला आहे. स्वकर्तृत्व गाजून स्वतःची ओळख निर्माण करूनही दत्तूला ‘अहंपणा’ जराही शिवलेला नाही. आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाची, गावाची, राज्याची, आपल्या सैन्यदलाची आणि देशाची ओळख निर्माण करूनही दत्तूचे पाय आजही जमिनीवर आहेत, हे त्याच्याशी बोलताना सहज जाणविते. कोणत्याही क्षेत्रात कर्तृत्ववान होण्यासाठी कौटुंबिक वारसा किंवा धनशक्ती यांचाच आधार असावा, अशा मान्यतेला संजीवनी मानणाऱ्या वर्गासाठी दत्तूचे कर्तृत्व हे आदर्श उदाहरण आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही.

 

क्रीडाक्षेत्र हेदेखील ‘करिअर’ असू शकते, असा मानणारा वर्ग आज जरी समाजात असला तरी, त्यांची संख्या तुलनेने कमीच आहे. प्रस्थापित क्रीडाप्रकारांना प्राधान्य देणारे लोकही जास्त आहेत. अशा सर्वांसाठी ‘नौकानयन’सारख्या हटके क्रीडाप्रकारातील दत्तूचे कर्तृत्व हे निश्चितच एक प्रेरणादायी उदाहरण आहे.

 

असे आहे दत्तूचे कर्तृत्व...

 

* ऑलिम्पिकमधील ‘पुरुष एकेरी स्कल्स’च्या शर्यतीत प्रवेश मिळवणारा पहिला क्रीडापटू म्हणून दत्तूची ओळख आहे.

 

* 2014च्या आपल्या कारकिर्दीतील पहिल्याच ‘इन्चिऑन आशियाई स्पर्धे’मध्ये दत्तूने पाचवा क्रमांक पटकाविला होता.

 

* 2015च्या बीजिंगमध्ये पार पडलेल्या 16 व्या ‘आशियाई रोविंग चॅम्पियनशिप’मध्ये दत्तूने रौप्यपदकाची कमाई केली होती.

 

* ‘इन्चिऑन आशियाई प्राथमिक स्पर्धे’त 7.09.49 अशी वेळ नोंदवत रौप्यपदक संपादित केले आणि ‘रिओ’मध्ये प्रवेश केला.

 

अशी आहे दत्तूची कारकिर्द

 

* 2014 मधील ‘राष्ट्रीय नौकानयन स्पर्धे’त दोन सुवर्णपदके

 

* 2015 मध्ये ‘आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धे’त (चीन) रौप्यपदक

 

* 2016 साली चीनमध्ये झालेल्या 16 व्या ‘आशियाई नौकानयन स्पर्धे’त दत्तू भोकनळने रौप्यपदक मिळवले. ऑलिम्पिक पात्रता रीगाज येथे सुवर्णपदक, ‘अमेरिकन नॅशनल चॅम्पियनशिप’मध्ये सुवर्णपदक, रिओ ऑलिम्पिकमध्ये जागतिकस्तरावर 13 वा क्रमांक पटकावून आशिया खंडात पहिला भारताकडून नौकानयनसाठी पात्र ठरलेला तो एकमेव खेळाडू होता.

 

* 2015 दक्षिण कोरियातल्या चुंग जू येथील ‘फिबा आशियाई अ‍ॅन्डओशॅनिक ऑलिम्पिक क्वॉलिफिकेशन’ या नौकानयनाच्या स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी सामन्यात रौप्यपदक पटकाविले.

 

* 2017 मध्ये इंदोर नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक.

 

* 2018 सालच्या इंडोनेशियामध्ये भरलेल्या आशियाई क्रीडास्पर्धेत रोविंग क्वाड्रापल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघात दत्तूचा समावेश होता.

 

पुरस्कार : 2016 ला ‘छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार,’ सैन्यदलाचा ‘बेस्ट स्पोर्ट्समॅन ऑल इंडिया पुरस्कार’- 2016

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat