अमूर्त कलासाधक

    दिनांक  05-Apr-2019   


 

 

आपली कला सर्वस्वाने जगणारा तो कलासाधक. ‘सुगो’ जाहिरात एजन्सीचे सुभाष गोंधळे यांचेही आयुष्य असेच कलासंपन्न. ते उत्तम चित्रकार, सुलेखनकार तर आहेतच, पण जाहिरात या ६५व्या कलेतही त्यांनी स्वत:चे कर्तृत्व सिद्ध केले. अशा या वसईच्या कलासाधकाच्या विविधांगी भावनांच्या रंगांनी बहरलेल्या जीवनाचा हा जिवंत कॅनव्हास...
 

जगप्रसिद्ध चित्रकार पाबलो पिकासो म्हणतात, “Every child is an artist. The problem is how to remain an artist once he grows up.” पण, सुभाष गोंधळेंसारखा अवलिया मात्र त्यांच्या लहानपणीही कलाकार होता आणि आजही तो कलासाधक आहे. नांदेडमध्ये जन्मलेल्या सुभाष यांना शाळेत जाण्यापूर्वीपासूनच रंगरेषांनी साद घातली. घरातल्या भिंती याच त्यांचे कॅनव्हास. वडील सरकारी सेवेत वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे संसारही असाच फिरतीचा. पण, वडिलांनी भिंतीवर अधिक रंगरगोटी नको म्हणून चित्रकलेचे साहित्य सुभाषच्या पुढ्यात ठेवले. मग काय, त्यांच्यातील सुप्त कलाकाराला चित्रकलेचे अधिकच स्फुरण चढत गेले. घरासमोरील भिंत, त्यावरील माकडं, चिमण्या-कावळे यांची चित्रं वयाच्या तिसऱ्या-चौथ्या वर्षापासूनच हा पठ्ठ्या गिरवू लागला. अभ्यासातही हुशार. शालेय जीवनातही ‘चित्रकला’ हा विषय केवळ एक सोपस्कार न राहता, सुभाषसाठी नवनिर्मितीचा तो प्रत्येक क्षण मोलाचा होता. चित्रकलेच्या शिक्षकांनी दिलेले प्रोत्साहन, सर्वांची कौतुकाची थाप आणि एलिमेंटरी परीक्षेतही मिळालेला ‘ए’ ग्रेड या सर्व गोष्टी एकप्रकारे सुभाष यांच्या कलामनाला अधिकाधिक समृद्ध करून गेल्या. त्यांच्यातील कलाकाराची ही जडणघडण शालेय जीवनातच खरंतर उज्ज्वल भविष्याचे संकेत देत होती. विशेष म्हणजे, आपल्या वडिलांची चित्रकला आणि आईची रांगोळीही उत्तम असल्याचे कालांतराने सुभाष यांच्या लक्षात आले. म्हणजे, कुठे तरी कला ही गोंधळेंच्या रक्तातच भिनलेली. पण, तरीही सुरुवातीला त्यांच्या कलाशिक्षणाला पालकांचा विरोध होताच.

 

आपला मुलगाही इतर चित्रकारांसारखा दाढी वाढवून, झोळी लटकवून इकडेतिकडे वणवण भटकेल, नोकरी नाही म्हणून मग चांगला पगार नाही, तर लग्नालाही मुलगी मिळेनाशी होईल, म्हणून पालकांच्या इच्छेपोटी दहावीनंतर सुभाष यांनी मनाविरुद्ध ‘विज्ञान’ शाखेत प्रवेश घेतला. तिथे त्यांची चांगलीच कुचंबणा झाली. त्यातल्या त्यात जीवशास्त्राच्या आकृत्यांमधील आकृत्याच काय त्या दिलासा देणाऱ्या. पण, अभ्यासाबरोबरच चित्रकलाही सुरूच होती. असेच एकदा घरी आलेल्या पाहुण्यांनी भिंतीवरील फळीवर मांडलेल्या सुभाष यांच्या चित्रांचे कौतुक केले आणि या क्षेत्रातील करिअरच्या संधींची माहिती दिली. मुलाचे या अभ्यासात मनही रमत नाही, चित्रही चांगली काढतो, तर मग प्रयत्न करायला काय हरकत आहे, असा विचार करत जे. जे. मध्ये सुभाष अखेरीस दाखल झाले. जे. जे मध्ये लँडस्केपिंग, मॉडेल्सची पेटिंग आणि चित्रकलेतील सर्व अंगांशी ते हळूहळू सुपरिचित झाले. जे. जे. मध्ये दुसऱ्याच वर्षी सुभाष यांनी त्यांचे पहिले चित्रप्रदर्शन भरविले आणि त्यांच्या चित्रांना चांगला प्रतिसाद मिळाला. चित्रांवरील प्रतिक्रियेच्या वहीतील रेघेसरांचा शेरा सुभाष यांनाही आजही चांगलाच आठवतो. तो शेरा होता - ‘हार्डवर्क + हार्डवर्क + हार्डवर्क = सक्सेस’ आणि आजही त्याच सूत्रानुसार त्यांची वाटचाल सुरू आहे. याच चित्रप्रदर्शनानंतर श्रीराम खाडिलकर यांनी घेतलेली पहिली मुलाखतही ‘तरुण भारत’ मध्येच प्रसिद्ध झाल्याचे ते आनंदाने सांगतात.

 

यशाचा मूलमंत्र

 

मी व्यवसायातील तत्त्व पाळत गेलो. दिलेला शब्द, कमिटमेंट कधी मोडली नाही. झेपेल तेवढीच कामं स्वीकारली. कुठलाही अवांतर देखावा केला नाही. घरातले, संघाचे आणि जे.जे.चे संस्कार त्याकामी आले. त्यामुळे स्थिरता आणि सातत्य ठेवलं तर कुठल्याही व्यवसायात प्रगती ही निश्चित आहे. 

 

सुभाष यांचा वास्तववादी चित्रांकडील कल पाहता, त्यांची चित्र मारिओ मिरांडा यांच्या चित्रांशी मिळतीजुळती असल्याच्या काही प्रतिक्रिया त्यांना मिळाल्या. पण, हे मिरांडा कोण, याची सुभाषना कल्पनाच नव्हती. माहिती काढल्यावर, मारिओ मिरांडा हे एक वास्तववादी चित्रकलेतील जगप्रसिद्ध नाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग काय, त्यांचा फोन क्रमांक शोधून, रीतसर त्यांची वेळ घेऊन सुभाष आपल्या काही चित्रांसह त्यांच्या घरी थडकले. मिरांडांची अप्रतिम चित्रं पाहून सुभाष पार भारावून गेले. पण, त्यांना खरा धक्का तेव्हा बसला, जेव्हा मिरांडांनी सुभाष यांची चित्रे भिंतीवर फ्रेम करण्यासाठी मागितली आणि तीही त्याची उचित किंमत मोजून. मिरांडांच्या त्या जगप्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांनी भरलेल्या भिंतीवर सुभाष गोंधळेंचीही चित्र स्थानापन्न झाली. त्यासमोर मग त्यांना ‘पद्मश्री’ चाही सन्मान फिका वाटला. जे.जे. मधून उत्तीर्ण झाल्यावर जाहिरात क्षेत्रात त्यांनी पार्टटाईम नोकरी केली. पुढे वृत्तपत्र, मासिक, दिवाळी अंकांमध्येही सुभाष यांची अनेक चित्रे प्रसिद्ध झाली. या दरम्यान व. पु. काळे, गंगाधर गाडगीळ, शांता शेळके, कुसुमाग्रज, मंगेश पाडगावकर यांसारख्या कित्येक साहित्यिकांच्या भेटीगाठी झाल्या, संवाद साधता आला. जाहिरात कंपनीत काम करताना एकदा त्यांची बदली दिल्लीला झाली. पण, दिल्लीचे वातावरण न मानवल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि ते वसईत परतले. पण, त्यानंतर मुंबईला न जाता स्वत:चा व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याचदरम्यान १९९०च्या सुमारास त्यांनी ‘सुगो अ‍ॅडव्हर्टायझिंग’ नावाने घरच्या घरीच वसई गावात जाहिरातीची कामं घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला छपाई, व्हिजिटिंग कार्ड्स डिझाईन करणे यांसारखी कामं मिळत गेली. पण, व्यवसाय गावात असल्यामुळे क्लाएंट आले, तरी कर्मचारी मात्र सहजासहजी उपलब्ध होत नसत. मग १९९५ साली स्टेशनजवळ जागा भाड्याने घेऊन २००२ पर्यंत हा जाहिरात व्यवसाय त्यांनी रात्रंदिवस एक करून स्वकर्तृत्वावर हा डोलारा उभा केला. आऊटडोअर जाहिराती, साईनबोर्ड, होर्डिंग्जची कामं त्यांनी घेतली. वसईतील ‘सुवार्ता’ मासिकाच्या जवळपास सात वर्षं केलेल्या कामाची मदत त्यांना व्यवसायातील जनसंपर्कात झाली.

 

 
 

व्यवसायाच्या भांडवलाविषयी विचारले असता, कल्पकता हेच या व्यवसायाचे भांडवल असल्याचे गोंधळे अभिमानाने सांगतात. त्याचबरोबर ते आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या कुटुंबीयांना, कर्मचार्‍यांना आणि वसईकरांनाही देतात. ते म्हणतात की, “माझी आई हीच माझी पहिली गुरू. ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली म्हणूनच मी समर्थपणे व्यवसाय करू शकलो. संकटांना, अडचणींना पाठ दाखवून पळायचं नाही, तर त्यांना तोंड द्यायचं. जर तुम्ही प्रामाणिक असाल, तर ते संकट कायम राहत नाही, ते निघून जातं, हा धागा पकडूनच मी व्यवसाय करत गेलो.” त्यामुळे साधी राहणी, आयुष्यात थोडी ‘रिस्क’ घेण्याची सवय यामुळे त्यांचा व्यवसाय असाच वाढत गेला. त्याचबरोबर व्यावसायिक, कौटुंबिक जबाबदाऱ्याही वाढल्या. सुरुवातीला काही वर्षं त्यांना थोडं नुकसानही सहन करावं लागलं. पण, प्रत्येक अडचणीतून सातत्याने मार्ग काढून ते शिकत राहिले. आपण केलेली चूक म्हणजे त्या शिकण्याची किंमत आहे, असा विचार करूनच त्यांची वाटचाल सुरू राहिली. आपल्या व्यवसायाचे एक महत्त्वपूर्ण सूत्रही यावेळी सुभाष यांनी सांगितले. ते म्हणजे, सुरुवातीला त्यांनी जे काही कमावलं, ते आधी व्यवसायात गुंतवलं. त्यानंतर कार्यालयाची जागा खरेदी केली आणि मग शेवटी घरं घेतलं. त्यामुळे व्यवसायातून मिळालेला नफा लगोलग वैयक्तिक गोष्टींसाठी न वापरता, त्यांनी सदैव उद्योगकेंद्रित धोरण स्वीकारले. व्यवसायाच्या या धबडग्यात कुठे तरी चित्रकलेकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. २००७ मध्ये त्यांनी भरवलेल्या चित्रप्रदर्शनालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. २०१२ ला आर्टिस्ट सेंटरमध्येही मोठ्या प्रदर्शनाचं त्यांनी आयोजन केलं होतं. आयुष्याच्या या टप्प्यावर ते वैचारिक चित्रकलेकडे वळले. मूर्ताकडून अमूर्ताकडे त्यांचा प्रवास सुरू झाला. अच्युत पालव यांच्या मार्गदर्शनाखाली कॅलिग्राफीमध्येही त्यांनी प्राविण्य मिळवलं. त्यातील नवतंत्रज्ञान आपलसं केलं. आज शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना ते कॅलिग्राफीचे धडेही देतात. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या सुभाष गोंधळे यांना नरवीर चिमाजी आप्पा साहित्य पुरस्कार तसेच इतर अनेक पुरस्कारांनीही गौरविण्यात आले आहे.

 

सुभाष यांचा मोठा मुलगा इंजिनिअर आणि लहान मुलगा एमबीए. आगामी काळात ‘सुगो’ची सूत्रे त्यांच्याच हवाली करण्याचा सुभाष यांचा मानस असल्यामुळे आतापासूनच ते दोन्ही मुलांना व्यवसायातील काही छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्याही देतात. तसेच, सोशल मीडिया, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून क्लाएंटच्या गरजा कशा पूर्ण करता येतील, यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सुभाष गोंधळे यांना ‘सुगो’ची शाखाही सुरू करायची आहे. तेव्हा, एकूणच पुढील वाटचालीसाठी त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’ परिवारातर्फे शुभेच्छा!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat