विजूमानिया

05 Apr 2019 20:11:08



रेशनच्या दुकानात सांडलेल्या धान्यावर ज्याच्या जेवणाची थाळी सजायची, जन्मापूर्वीच ज्याने पितृछत्र हरपलेले पाहिले, अकरावीत दोनदा नापास झाल्यानंतर सावरलेला हा अवलिया तरुण पुढे मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चे अढळ स्थान प्राप्त करतो. आयुष्यात ‘टर्निंग पॉईंट’ असतात, मात्र ते समजण्याची कुवत असावी लागते. एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी विजू माने यांची ही कर्तृत्वगाथा...

 

खिशातली गांधी टोपी बाहेर काढली आणि डोक्यावर ठेवत फोटोग्राफरला सांगितले,“एकदम डिट्टो डॅडी वाटला पाहिजे.” फोटोग्राफरनेही टोपी थोडीशी तिरकस करत फ्लॅश पाडला. दोन दिवसांत प्रिंट येणार होती. हे दोन दिवस विजूला दोन वर्षांसारखे भासत होते. अखेर तो दिवस उजाडला. डॅडीच्या लूकचा फोटो घेण्यासाठी आज जायचे होते, पण मध्येच दुकानावरही जायचे होते. आज रेशनच्या दुकानावर सांडलेले धान्य मिळणार होते. तसे विजूचे हे नेहमीचे काम. महिन्यातून चार-पाच वेळा सांडलेले धान्य विकले जात असे. डॅडीवाला फोटो की सांडलेले धान्य अशा द्वंद्वात विजू होता. अखेर, कुटुंबाची जबाबदारी लक्षात घेता अवघ्या १५-१६ वर्षांचा हा कोवळा पोरगा रेशनच्या दुकानात गेला. धान्य विकत घेऊन त्या पिशवीसकट डॅडी स्टाईल स्वत:चा फोटो आणण्यासाठी पठ्ठ्या फोटो स्टुडिओत धडकला. स्वत:च्या बाबाला केवळ भिंतीवरच्या फोटोतच पाहिलेल्या या पोराला विविध कारणांनी डॅडी अरुण गवळी आपलासा वाटत होता. विजू आईच्या पोटात असतानाच त्याचे बाबा स्वर्गवासी झाले. खरे तर पहिल्या आईला मूलबाळ होत नसे म्हणून बाबांनी दुसरे लग्न केले. मात्र, जन्माला येणाऱ्या मुलाचे मुखदर्शन करण्याअगोदर बाबा अंतर्धान पावला आणि सोबत विजूची आई, मोठी आई आणि स्वत: विजू यांच्यासाठी संघर्षाची एक भलीमोठी पोकळी निर्माण करून गेला. मोठी आई लाकडाची वखार चालवत असे. त्याच वखारीत पुढे पिठाची चक्की सुरू केली. आयुक्त चंद्रशेखर यांच्या काळात रस्ता रुंदीकरणात ती चक्कीदेखील तुटली आणि विजू आणि विजूच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली. त्याचवेळेस आनंद दिघे यांच्या जनता दरबारात विजूला न्याय मिळाला आणि चक्की पुन्हा सुरू झाली. रोखणारे आणि टोकणारे कुणीही नसल्याने दिवसभर क्रिकेट, हाणामाऱ्या, नाक्यावर टवाळखोरी असे दिवस जात होते. यात एकच आशेचा किरण होता तो म्हणजे गुरुनाथ पाटकर गुरुजींच्या भजनी मंडळात विजू जात असे. पेटी-तबला वाजवणे, थोडीफार देवाधर्माची साथसोबत यामुळे होत असे. पाटकर गुरुजीदेखील विजूचे समुपदेशन करत असत. घरी पोटापाण्यासाठी मणी ओवायचे काम केले जात असे. ओवलेले मणी गोण्यात भरायचे. ती गोणी डोक्यावर ठेवली की, कारखान्यात सोडायची आणि तशाच घामेजलेल्या अवस्थेत शाळा गाठायची. अनेकवेळा शिक्षकच विजूचे कपडे, केस ठिक करून त्याला वर्गात बसवत असत. पाटकर गुरुजींमुळे मात्र विजूला वाचनाची आवड लागली. तो पुस्तकात रमू लागला.

 

एकपाठी असलेला विजू दहावीत ८६ टक्क्यांनी उत्तीर्ण झाला. परंतु मित्रमंडळी, आजूबाजूचे वातावरण भाईगिरीचे थ्रिल विजूच्या डोक्यातून काही जाईना. अकरावीत प्रवेश घेतला खरा, पण सलग दोन वर्ष अकरावीत तो नापास झाला. या सगळ्या काळात राजू लोखंडे नावाचा अवलिया गृहस्थ विजूला भेटला. घराबाहेर गोट्या खेळत असलेल्या विजूला राजू लोखंडे भेटला आणि म्हणाला, “गोट्याच खेळायच्या असतील तर सर्वोकृष्ट खेळता आल्या पाहिजेत आणि गुंडच व्हायचं असेल तर मोठा गुंड हो, अध्ये-मध्ये लटकून राहू नकोस.” आणि या सल्ल्याने विजू अंतर्बाह्य हलला. पुढे त्याने पदवी प्राप्त केली. त्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठी विजूने ‘एरिया’ सोडला. मग संध्याकाळ कशी घालवायची? त्यासाठी म्हणून विजू जुन्या नाक्यावरून गडकरीच्या कट्ट्यावर स्थिरावला. आज मराठी चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी नावारूपाला आलेले कलावंत-दिग्दर्शक तेव्हा गडकरीच्या कट्ट्यावर जमत असत. नाटक, चित्रपट, मालिका या सगळ्यांची गोडी विजूला लागू लागली. महाविद्यालयात असतानादेखील विविध एकांकिका स्पर्धांच्या माध्यमातून विजूचे हे नाट्यवेड भागत असे. याच वेळी त्याला त्याच्या जीवनाची अर्धांगिनी अनघा गवसली आणि तिच्यामुळे जीवन अधिक शिस्तबद्ध झाले. विज्ञान शाखेचा पदवीधर झाल्यानंतर एमएस्सीसाठी त्याने प्रवेश घेतला. मात्र, याच काळात ई-टीव्हीच्या गुजराती वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेच्या सहायक दिग्दर्शकपदाची संधी सुभाष फडके यांच्या माध्यमातून चालून आली. ‘कोरी आँखे भिना सपना’ नावाच्या या मालिकेने विजूच्या स्वप्नांना बळ दिले. पुढे सुभाष फडकेंसोबत विजूने जवळपास १४ चित्रपट केले.

 

गुजराती मालिकेचे काम सुरू असताना अल्फा मराठीवर हेमामालिनी प्रोडक्शनच्या दोन मालिका सुरू झाल्या. ‘उंबरठा’ व ‘सोंगटी’ या दोन्ही मालिकांचे दिग्दर्शन करण्याची संधी विजूला मिळाली. हे करत असताना २००५ साली विजूचा पहिला चित्रपट ‘गोजिरी’ आला. ‘गोजिरी’ने विजूला एक वेगळी ओळखी दिली आणि म्हणूनच की काय, आपल्या एकुलत्या एक मुलीचे नामकरण त्याने ‘गोजिरी’ असे केले. या चित्रपटासाठी विजूला बेस्ट फिल्म, बेस्ट दिग्दर्शन, बेस्ट गीतकार, बेस्ट कवी अशी अनेक नामांकने व पुरस्कार प्राप्त झाले. त्यानंतर विजूने प्रसाद ओक व आदिती सारंगधर यांना घेऊन ‘ती रात्र’ नावाचा चित्रपट केला. या चित्रपटासाठी प्रसाद ओक यांना कारकिर्दीतील पहिले पारितोषिक मिळाले. त्याअगोदर प्रसाद ओक यांनी ६९ सिनेमांत काम केले होते. विजू जेव्हा बाबा होणार होता, त्याच कालखंडात मुलगी आणि बाबा यांच्या नात्यावर आधारित ‘खेळ मांडला’ नावाचा एक नितांतसुंदर चित्रपट साकारत होता. आज हा चित्रपट बंगळुरु फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकवला जातो. या चित्रपटाने मंगेश देसाई नावाचा हरहुन्नरी कलाकार चित्रपटसृष्टीला दिला. ज्या कलावंतांना विजू आदर्श मानत होता, अशा कलावंतांना दिग्दर्शित करण्याचे भाग्य विजूला लाभले. सचिन पिळगांवकर, महेश मांजरेकरसारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वांना विजूला दिग्दर्शित करता आले. ‘बायोस्कोप’सारखा एक वेगळा प्रयोग मराठीत झाला. त्यातील चार कथांपैकी एक कथा ‘एक होता काऊ’च्या माध्यमातून विजूच्या आतील सर्वोकृष्ट लेखक-दिग्दर्शक त्यातून व्यक्त झाला. यात गुलजार यांनी आवाज दिला होता. प्रत्यक्ष चित्रपट पाहिल्यानंतर ‘एक होता काऊ’ म्हणजे चित्रपटातून व्यक्त झालेली कविता आहे, असे जेव्हा गुलजार म्हणाले, तेव्हा विजूला ऑस्कर मिळाल्याचे समाधान लाभले.

 

यशाचा मूलमंत्र

 

"शिस्त, परफॉरमन्स आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्याशिवाय यश मिळत नाही, आपण जे जगाला देतो ते उलटून पुन्हा आपल्याला मिळतं, तेव्हा हात नेहमी दात्याचा असा हवा. आपण दिले तर आपल्याला ते पुन्हा मिळते. अनेकवेळा आपल्याला काय येते, यापेक्षा काय येत नाही हे देखील कळण्याची गरज असते आणि जे येत नाही, ते त्यागण्याचा निर्णय घेतला, तर यश तुमचेच आहे असे समजा."

 

पुढे ‘चूक-भूल द्यावी घ्यावी,’ ‘मंकी बात’ हेही चित्रपट विजूने आणले. मात्र, महेश मांजरेकर असलेल्या ‘शिकारी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कामगिरी बजावली. निर्माता, लेखन, दिग्दर्शन यातील निर्माता या भूमिकेने काही प्रमाणात विजूला हादरे बसले आणि मग विजू चित्रपटाच्या निर्मितीपासून थोडा लांब गेला. मराठी चित्रपट हे उत्पन्न कमावण्याचे साधन होऊ शकत नाही, अशा निष्कर्षापर्यंत विजू पोहोचला. चित्रमाध्यम हाताळण्याचे अनोखे कौशल्य असलेल्या या लेखक- दिग्दर्शकाला जाहिरात क्षेत्रातून मात्र प्रचंड मागणी येऊ लागली. रेमण्ड, आयसीआयसीआयसारख्या शंभराहून अधिक जाहिराती विजूने केल्या. गंमत म्हणून संतोष जुवेकर, कुशल बद्रिके यांना घेऊन केलेला एक यु-ट्यूब व्हिडिओे इतका गाजला की त्यातून आजची ‘स्ट्रगलर साला’ ही वेबसीरिज जन्माला आली. ती इतकी गाजली की विजूला ‘स्ट्रगलरवाला दिग्दर्शक’ म्हणून एक वेगळी ओळख त्यातून मिळालीमालिका हे माध्यम आपल्याला फारसे झेपत नाही किंवा त्यातून आपल्या कलात्मक गरजा भागत नाही, हे हेरल्याने विजू त्यापासून लांब राहिला. शिस्त, परफॉर्मन्स आणि कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल्याशिवाय यश मिळतं, यावर विजूची ठाम श्रद्धा आहे. आपण जे जगाला देतो, ते उलटून पुन्हा आपल्याला मिळते असे मानणारा विजू सिग्नल शाळा, वर्षा परचुरेच्या जव्हार-मोखाड्यातील सामाजिक कामांत रमताना दिसतो. आपल्या अनेक हातांनी तो देता होतो म्हणून ईश्वर त्याची झोळी रिक्त ठेवत नसावा. भविष्यात ‘जिंकून हरलेली लढाई’ नावाचा एक अभूतपूर्व रंगमंचीय आविष्कार विजू साकारत आहे. ‘पप्पाची पप्पी’ नावाचा विनोदी चित्रपट त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील भव्यदिव्य चित्रपट आगामी काळात विजू प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. सध्या ‘टॅग’ नावाच्या साडेसहाशे कलावंतांच्या भल्यामोठ्या संस्थेच्या कामात विजूने स्वत:ला गाडून घेतले आहे. भविष्यात निवृत्त व्हायचे झाल्यास त्या कालखंडात स्वत:साठी लिखाण करायचे आहे आणि दमदार शेती करायची मनीषा विजू व्यक्त करतो. एखाद्या चित्रपटाला साजेल अशी विजूच्या जीवनप्रवासाची ही कहाणी अनेकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

 

- भटू सावंत

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0