कबुतरांना खाऊ घालताय, सावधान ! पालिका आता दंड वसूल करणार

05 Apr 2019 16:37:26


 

 
मुंबई : तुम्ही जर कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देत असाल, आणि त्याचा इतरांना त्रास होत असेल. तर आता मुंबई महानगरपालिका तुमच्याविरोधात कारवाई करु शकते. कबुतरांसह श्वान आणि मांजरांना सार्वजनिक ठिकाणी खाद्य देणाऱ्यांकडून पालिका ५०० रुपयांपर्यंत दंड वसूल करणार आहे. शहारात कबुतरांच्या वाढत्या संख्येमुळे श्वसनाचे आजार बळावण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पालिका प्रशासनाने स्वच्छता आणि आरोग्य उपविधींची कडक अंमलबजावणी करत यासंबंधीच्या कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.

भूतद्या म्हणून प्राणी आणि पक्ष्यांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घालणे आता महागात पडणार आहे. गेल्या काही वर्षात शहरात कबुतरांची संख्या वाढली आहे. मात्र यामुळे श्वसनाचे आजार होण्याची लक्षणे वाढल्याचे निरीक्षण डाॅक्टरांनी नोंदवले आहे. कबुतरांच्या पिसांसोबत त्यांच्या वाळलेल्या विष्ठेतून 'अॅस्परजिलस' प्रकारची बुरशी निर्माण होते. पाच वर्षांपूर्वी केईएम रुग्णालयाने कबुतरांची विष्ठा आणि पिसं घेऊन त्यांच्या अभ्यास केला होता. त्यात 'अॅस्परजिलस' नावाचा संसर्गजन्य विषाणू आढळून आला. यामुळे संसर्गाचे प्रमाण वाढून 'न्यूमोनिटीस' आजार बळावतो असे सिद्ध झाले होते. कबुतरांच्या विष्ठेमध्ये 'हिस्टोप्लाझ्मा' ही बुरशी वाढते. वारा आला की ती उडत जाते. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांच्या फुफ्फुसामध्ये ही बुरशी जाते, त्यातून आजार निर्माण होतो. या आजारात अचानक खोकल्याची उबळ येणे, छातीत दुखणे, डोकं दुखत राहण्याची लक्षणे जाणवतात. 'कॅलामायडिआ सिटॅकी' हाही संसर्ग कबुतराच्या विष्ठेतून पसरत जाणारा संसर्ग आहे. मुंबईसारख्या शहरात कबुतरांचे प्रमाण वाढले की जंतुसंसर्गही आपसूक वाढतो.

कबुतरांची विष्ठा बंद घरांमध्ये किंवा घरांची साफसाफई न झाल्याने तशीच राहिली तर त्यातून श्वसनमार्गाला धोकादायक असे वायू तयार होऊन त्यातूनही फुफ्फुसांचे संसर्ग वाढतात. कबुतरांच्या विष्ठेतून बाहेर पडलेल्या सीरममधील 'न्यूमोनायट्रेस'चा संसर्ग होऊन सतत थकवा येणे, झोप येणे, निरुत्साह वाटत असल्याच्याही तक्रारीही आहेत. या सर्व कारणांमुळे पालिका आता कबुतरांना खाऊ घालण्यांविरोधात कारवाईचे पाऊल उचलणार आहे.

स्वच्छता आणि आरोग्य उपविधी ४.५ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना आणि प्राण्यांना खाऊ घालण्यांविरोधात कारवाई करण्याचा अधिकार आम्हाला असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अशोक खैरे यांनी दिली. असे कोणी करत असल्याचे दिसून आल्यास आणि त्याच्या त्रास इतरांना त्रास होत असल्यास ५०० रुपयांपर्यत दंड वसूल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठीच्या तक्रार विभाग कार्यालयातील तक्रार अधिकारी आणि क्लीन अप मार्शलजवळ ही नोंदवता येणार असल्याचे, ते म्हणाले. पालिकेच्या के पश्चिम विभागाच्या घन कचरा विभागाने या नियमाविषयीचे फलकच लावले आहेत.

 
वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat
Powered By Sangraha 9.0