संपर्कातून चमत्कार!

    दिनांक  05-Apr-2019   

 
डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी वर्षातील हा प्रसंग असावा. अमरावती महानगर संघशाखेच्या विजयादशमी उत्सवात मूलभूत भारतीय विचारवंत मा. दत्तोपंत ठेंगडी प्रमुख वक्ते होते. योगायोगाने ते भाषण ऐकण्याचे मला भाग्य मिळाले. भाग्य यासाठी की, मा. दत्तोपंतांचा सहवास, त्यांचे भाषण अथवा लेख खूप काही शिकवून जाणारे असत. त्याने आपले विचार परिष्कृत होत असत. हे भाषणही तसेच होते. त्यात त्यांनी, महापुरुषाच्या श्रेष्ठतेचा एक मापदंड सांगितला होता. ते म्हणाले- ज्या महापुरुषाचा प्रभाव जितक्या अधिक भविष्यकाळावर असेल, तो महापुरुष श्रेष्ठ मानावा आणि असे सांगून त्यांनी संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या श्रेष्ठत्वाचे विवेचन केले होते. डॉ. हेडगेवार यांचा जन्म होऊन आता 130 वर्षे झाली आहेत, तसेच त्यांच्या निधनालाही 79 वर्षे होतील. पण, तरीही डॉ. हेडगेवार यांच्या विचारांचा, त्यांच्या कार्याचा प्रभाव आजही आपल्याला दिसून येतो. किंबहुना, तो अधिकाधिक वाढत असलेला आपल्या लक्षात येईल. ज्या व्यक्तीला कधी कुणी मानसन्मान दिला नाही, समाजातील कथित बुद्धिवंतांनी नेहमीच ज्या व्यक्तीचा तिरस्कार केला आणि त्यामुळे समाजाला ज्यांच्या महानतेचा पुरेसा परिचय होऊ शकला नाही, अशा व्यक्तीच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे, हे विलक्षणच म्हटले पाहिजे. आपल्या भारतात असा कुठला महापुरुष आहे की, ज्याने प्रतिपादित केलेल्या विचारांसाठी, त्या विचारांच्या प्रचारासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करणार्या किती व्यक्ती आहेत आणि आजही निघत आहेत? थोडी इकडे तिकडे नजर फिरवून बघा. लक्षात येईल की, अर्वाचीन भारताच्या इतिहासात एक डॉ. हेडगेवार सोडले, तर दुसरे कुणीच नाही. आणि तरीही हा माणूस आमच्या समाजात दुर्लक्षित, उपेक्षित आणि तिरस्कृत राहिला आहे.
 
 
डॉ. हेडगेवार म्हणजे संघ आणि संघ म्हणजे डॉ. हेडगेवार. व्यक्ती आणि कार्याची इतकी विलोपता कुठेच बघायला मिळणार नाही. सोन्याच्या दागिन्यातून जसे सोने वेगळे काढता येत नाही, तसलाच विलक्षण संबंध डॉ. हेडगेवार आणि संघाचा आहे. जी गोष्ट अद्वितीय असते, अतुलनीय असते, ती समजावून सांगणे फारच कठीण काम असते. तुलनात्मक रीतीने समजावून सांगितले की ती गोष्ट समजायला सोपी जाते. संघाच्या बाबतीत तेही शक्य नाही. त्यामुळेच आज संघ स्थापन होऊन 93 वर्षे झालीत, तरीही संघ समजला आहे, असे म्हणण्याचे धाडस कुणी करणार नाही, असे मला वाटते. अगदी आयुष्यभर संघशाखेत नियमित जाणार्यांनाही संघ संपूर्ण समजला आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल. याला काही निश्चितच अपवाद आहेत. स्वयंसेवकांचीच ही स्थिती, तर स्वयंसेवकेतरांची गोष्टच वेगळी. आजही जेव्हा संघ म्हणजे काय, संघाचे काम काय इत्यादी गोष्टींचा विचार करतो, तेव्हा त्याचे नवनवीन पैलू लक्षात यायला लागतात. संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी एका लेखात लिहिले होते की, संघ म्हणजे हळूहळू उन्मीलित होणारे कार्य आहे. त्यामुळे एखाद्याला वाटले की आता आपल्याला संघ समजला, त्याच क्षणी संघकार्याचा एक नवाच पैलू उमलून त्याच्या समक्ष येतो. संघाची ही विलक्षणता त्याला नित्यनूतनत्व तर प्रदान करतेच, शिवाय या संघटनेला सतत प्रवाहीदेखील ठेवत आहे. एखाद्या नदीचा प्रचंड प्रवाह संथपणे वाहत असावा, तसा संघकार्याचा प्रवास सतत वाहत आहे.
 
संघकार्य जसे अजूनही पुरेसे आकळले नाही, तसेच संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांचे व्यक्तिमत्त्वही पूर्णांशाने समजले आहे, अशा फारच थोड्या व्यक्ती असतील. आज सार्या जगाचे औत्सुक्य बनलेल्या संघकार्याचे निर्माते डॉ. हेडगेवार यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकलन करायला बसू म्हटले, तर ते कवेतच येत नाही. कल्पनाशक्ती, प्रतिभा, विचार, बुद्धी सर्व काही थिटे पडल्यासारखे वाटते. डॉ. हेडगेवार यांचे व्यक्तिमत्त्व असामान्य बुद्धिमान, प्रतिभाशाली, कल्पक व्यक्तीच्या विचारविश्वाला व्यापूनही शिल्लक उरते, असाच अनुभव आहे. खरेतर, अशा गुणसंपन्न व्यक्तीला आपल्या समाजात देवस्वरूप मानण्याची प्रथा आहे, परंतु संघाने ते कटाक्षाने टाळले आहे. तरीही, डॉक्टरांवरील एक नितांत सुंदर व त्यांच्या व्यक्तित्वाचे अचूक शब्दचित्र उभे करणार्या एका गीतात, गीतकाराने त्यांना देव म्हणूनच टाकले आहे. ‘लो श्रद्धांजलि राष्ट्रपुरुष, शत कोटी हृदय के कंज खिले हैं।’ या गीतात एक ओळ आहे- ‘देव! तुम्हारी घोर तपस्या के ही तो ये सुफल मिले हैं।’ हिंदू समाजाची मानसिकता बघता आतापर्यंत डॉक्टरजींची मंदिरे, देव्हारे व्हायला काहीच हरकत नव्हती. परंतु, संघाने ते निग्रहपूर्वक टाळले आहे. संघाचे हेही एक फार मोठे वैशिष्ट्य मानायला हवे.
अशा या सतत विकसनशील संघकार्याचा मूलमंत्र कुठला असावा? संघाच्या सतत प्रवाहीपणाचे काय गमक असावे? मला वाटते, संघकार्याचे जे मूळ आहे ते म्हणजे सतत संपर्क. समाजातील जमेल तितक्या व्यक्तींशी सतत, नित्य संपर्क ठेवणे... यामुळेच संघाला आजची स्थिती गाठता आली, असे म्हणता येईल. सततच्या संपर्कातून काय चमत्कार घडू शकतो, याचे साकार रूप म्हणूनही संघकार्याकडे बोट दाखविता येईल. सतत संपर्काबाबत संघस्थापनेच्या काळात जितका आग्रह होता, तितकाच आग्रह आजही आहे. संपर्काला दुसरा पर्याय नाही, हेच आजही सांगितले जाते आणि तसे आचरणातही आणले जाते. त्यामुळेच की काय, संघाच्या रचनेत एक स्वतंत्र संपर्क विभागही आहे.
 
 
 
 
एक घटना आठवली. कार्यकर्त्यांची बैठक सुरू होती. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातील कार्याची माहिती, अडचणी वगैरे सांगत होता. एकाने तक्रारीच्या सुरात सांगितले- माझ्या क्षेत्रात मी खूप प्रयत्न करतो. सर्वांना निरोप देतो, पण शाखेत यायला कुणी तयारच होत नाही. मला तर वाटते की, हे सर्व फ्युज्ड बल्ब आहेत. पेटणारच नाहीत. कालांतराने कार्यकर्त्यांचे अनुभवकथन झाल्यावर बैठक घेणार्या अधिकार्याने समारोप केला. ते म्हणाले- एखादी व्यक्ती खूप प्रयत्न करूनही शाखेत येत नाही म्हणून ती काही फ्युज्ड बल्ब होत नाही. बरेचदा ‘कॉन्टॅक्ट लूज’ही असण्याची शक्यता असते. उपस्थित कार्यकर्ते काय समजायचे ते समजले. संपर्काने एखादे कार्य होत नसेल, तर आपल्या संपर्कातच काहीतरी न्यून असले पाहिजे, अशी संघाची शिकवण आहे.
जे स्वयंसेवक नाहीत त्यांच्यासाठी संघ-शब्दावलीत विरोधक असा शब्द नाही. आजकाल मीडियामध्ये ‘संघविरोधक’ हा शब्द खूप चालतो, परंतु संघाच्या शब्दकोशात हा शब्दच नाही. समाजाचे दोनच भाग- एक स्वयंसेवक आणि दुसरा स्वयंसेवक न झालेले. जे स्वयंसेवक झाले नाहीत, ते आज ना उद्या स्वयंसेवक होतील, असा संघाचा ठाम विश्वास आहे. आपलाच संपर्क कुठेतरी कमी पडला, आपणच तिथे जाण्यास असमर्थ ठरलो म्हणूनच ती व्यक्ती स्वयंसेवक झाली नाही, असे संघ मानतो. यावरून संपर्कावर तसेच संपर्काच्या शक्तीवर संघाचा किती भरवसा आहे, हे लक्षात येईल. सतत नित्य संपर्क ठेवल्यावर समोरच्या व्यक्तीमध्ये असणारे संघविषयक गैरसमज नष्ट होतात, तो संघानुकूल होतो. इतकेच नव्हे, तर संघासाठी तन-मन-धन समर्पित करण्यासही तयार होतो. असे शेकडो नाही, तर करोडो अनुभव संघाजवळ आहेत. केवळ संपर्काने पुढच्याला आपलेसे करण्याची किमया संघाशिवाय कुणाला साधली असेल, असे मला वाटत नाही.
डॉक्टरांनी अनुयायी तयार केले नाहीत. उलट, संपर्कात आलेल्या प्रत्येकाला स्वत:चे तेजोमय प्रतिबिंबच बनवून टाकले. हे असे कोट्यवधी तेजोमय प्रतिबिंब आज भारतासह सार्या जगात तेजस्वी सूर्य बनून तळपत आहेत, असे म्हटल्यास चूक होणार नाही. चैत्र शुद्ध प्रतिपदेला डॉ. हेडगेवार यांचा जन्मदिन आहे. जन्मदिन साजरा करण्याची प्रथा संघात नाही. परंतु, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस उत्सव म्हणून साजरा करण्याची परंपरा संघात घातली गेली. त्या दिवशी डॉक्टरांचा जन्मदिन हा योगायोग. या दिवशी डॉक्टरांचे स्मरण होणे स्वाभाविकच आहे. त्यानिमित्त डॉक्टरजींच्या संपर्काची किमया लेखात मांडण्याचा हा एक धाडसी प्रयत्न आहे.