महाराष्ट्राच्या कन्येची ‘गुगल’ भरारी

05 Apr 2019 21:45:27



काही काळ अभिनय क्षेत्रात नशीब आजमावतगुगल इंडियामध्ये उच्चपदावर नियुक्त झालेल्या मयुरी कांगो हिने अभिनयाच्या कारकिर्दीनंतर अनेक भूमिका सक्षमपणे निभावल्या आहेत.


‘घर से निकलतेही कुछ दूर चलतेही

रस्ते में है उसका घर

 

हे ‘पापा कहेते है’ या बॉलिवूड चित्रपटातील सुप्रसिद्ध गीत आजही प्रत्येकाच्या मनात घर करून आहे. याच गाण्यातील अभिनेत्री मयुरी कांगो... नव्वदच्या दशकात प्रेक्षकांना भुरळ घालणारी ही सुंदर अभिनेत्री सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या गाण्यानंतर काही काळ चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर ती १६ वर्षे या अभिनय क्षेत्रापासून दूर गेली. याच आठवड्यात तिची ‘गुगल इंडिया’ने एका मोठ्या पदावर नियुक्ती केली आहे. मयुरी कांगो सध्या ‘गुगल इंडिया’च्या इंडस्ट्री हेड-एजन्सी बिझनेसचा पदभार सांभाळत आहे. अभिनय क्षेत्राच्या मोहात न पडता शिक्षण पूर्ण केल्यानंतर अखेर मयुरीला कष्टाचे फळ मिळालेच. गुगलमध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वी तिने ‘परफॉमिक्स रिझल्ट्रिक्स’ या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक, ‘डिजिटास्क’मध्ये माध्यम व्यवस्थापक, ‘जेनिथ’मध्ये डिजिटल ऑफिसर आदी पदांवर काम पाहिले आहे. चित्रपट अभिनेत्री म्हणून फार काळ टिकाव न लागल्याने अखेर शिक्षण पूर्ण करून करिअरकडे लक्ष देण्याचा विचार तिने केला. वयाच्या पंधराव्या वर्षी आयआयटी कानपूरमध्ये मिळालेला प्रवेश नाकारत तिने चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. १९९५ मध्ये चित्रपट ‘नसीम १९९६,’ ‘पापा कहेते है’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. ‘पापा कहेते है’मधील ‘घर से निकलतेही’ हे गाणे त्याकाळी खूप गाजले. त्यानंतर तिचा ‘होगी प्यार की जीत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. काहीकाळ टीव्ही मालिकांमध्येही तिने काम केले. २००० मध्ये ‘नसीम’, २००१ मध्ये ‘थोडी खुशी थोडा गम,’ ‘डॉलर बाबू’ आदी चित्रपटांसह आणि ‘कुसुम,’ ‘किटी पार्टी,’ ‘हादसा क्या हकीगत’मध्ये तिने काम केले. २००३ मध्ये आदित्य ढील्लन यांच्याशी विवाह झाल्यानंतर ती अमेरिकेमध्ये स्थायिक झाली. यानंतर तिने अमेरिकेत खासगी कंपनीत नोकरी करण्याचा विचार केला. नोकरी, घर सांभाळत असताना तिने शिक्षणही पूर्ण केले.

 

न्यूयॉर्क विद्यापीठामधून मार्केटिंग अॅण्ड फायनान्समध्ये एमबीए पूर्ण केले. त्यानंतर ‘३६० आय’ या कंपनीत नोकरी सुरू केली, २००४ ते २०१२ पर्यंत विविध कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर तिने काम पाहिले. नंतर तिला पुत्ररत्न झाले. बाळंतपणानंतर ती भारतात परतली. अभिनय क्षेत्रापासून दूर झाल्यानंतर तिने या साऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. आपल्या अभिनय क्षेत्रापेक्षा तिने पूर्ण केलेल्या शिक्षणाचा आणि लग्नानंतर केलेल्या संघर्षाचा तिला जास्त अभिमान आहे. बॉलिवूडमध्ये येणाऱ्या मुलींना तिने खास संदेश दिला आहे. “तुम्ही या क्षेत्रात या. मात्र, प्रत्येक व्यक्तीचे नशीब इथे चमकेल, असे होत नाही. तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण केले आणि त्याआधारावर मेहनत केली, तर यश तुम्हाला हमखास मिळेल,” असे ती आवर्जून सांगत असते. “चित्रपट-अभिनयात फार काळ एखादा सामान्य कलाकार तग धरत नाही. मात्र, त्यांनी इतर पर्याय म्हणून करिअर तयार ठरवायला हवे,” असा मयुरीचा आग्रह आहे. आपल्या इथवरच्या प्रवासानंतरही ती बालपणीच्या मित्र-मैत्रिणींशी आजही संपर्कात आहे. मयुरीचा जन्म मूळ औरंगाबादमध्ये १५ ऑगस्ट, १९८२ मध्ये झाला. तिचे वडील कामगार नेते भालचंद्र कांगो हे राजकारणी, तर आई सुजाता या अभिनेत्री. औरंगाबाद येथील सेंट झेव्हियर्समधून तिने शिक्षण पूर्ण केले. मुंबईत १९९५ मध्ये पहिल्यांदा आल्यावर सईद अख्तर मिर्झा यांनी तिची ‘नझीम’ चित्रपटासाठी निवड केली. यानंतर जवळपास दहा वर्षे तिने अभिनय क्षेत्रात काम केले. अभिनेत्री ते ‘गुगल इंडिया’मध्ये मोठ्या पदापर्यंतच्या तिच्या या प्रवासाबद्दल अनेकांना कुतूहल आहे. आजवर अनेकांनी तिला हाच प्रश्न विचारतात. ‘अभिनेत्री अभ्यासात हुशार नसतात,’ असा लोकांचा समज तिने मोडून काढला. शिक्षण, नोकरीनिमित्त व्यक्तींना भेटताना तिला भेटणाऱ्यांपैकी फारसे गांभीर्याने घेतले नव्हते. मात्र, आज इथवर पोहोचल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

याशिवाय अभिनय क्षेत्रात कामासाठी येणाऱ्या मुलींनाही यावरच अवलंबून न राहण्याचा सल्ला देते.“बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीचे भवितव्य केवळ दहा वर्षेच असते,” असे ती सांगते. “त्यामुळे याला पर्याय म्हणून तुम्ही दुसरा मार्ग तयार ठेवायला हवा,” असे ती आग्रहाने सांगत असते. मागे वळून पाहण्यापेक्षा मयुरी आता पुढील वाटचालीसाठी उत्सुक आहे. ‘गुगल’सारख्या कंपनीचा घटक होण्याची तिची पूर्वीपासूनच इच्छा होती. या नव्या संधीचे सोने करत नव्या कारकिर्दीसाठी सज्ज आहे. सोशल मीडियाबद्दल तिला प्रचंड प्रेम आहे. डिजिटल मार्केटिंग आणि मीडिया क्षेत्रात नवनवीन आव्हाने स्वीकारण्याची आवड तिला शिक्षणानंतर लागली. सतत काहीतरी नवीन शिकण्याची आवड, नवीन संकल्पना, त्यावर काम करण्याकडे असलेला ओढा आणि याद्वारे व्यवसायवृद्धी या संकल्पनांमुळे आज ‘गुगल’सारख्या कंपनीने तिची दखल घेतली आहे. मयुरीच्या कामामुळे तिचे सहकारीही खूश असतात. तिच्यासह काम करण्याचा अनुभव हा खूप वेगळा असल्याचे ते सांगतात. तिची काम करण्याची पद्धतीही इतरांपेक्षा निराळी आहे. तिच्या नेतृत्व कौशल्यामुळे सहकारी प्रभावित आहेत. मिळालेले काम वेळेच्या नियोजनात, उत्कृष्टरित्या, ग्राहकांशी उत्तम संबंध ठेवत पूर्ण करण्यात ती निपुण आहे. या महाराष्ट्राच्या कन्येला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0