‘इक्विटी’ संलग्न बचत योजना

    दिनांक  04-Apr-2019   १ एप्रिल, २०१९ पासून २०१९-२०२० हे आर्थिक वर्ष सुरू झाले. वर्षाच्या सुरुवातीलाच गुंतवणुकीचे नियोजन करणे नेहमी चांगले असते. वर्षाच्या सुरुवातीलाच ‘इक्विटी लिन्कड सेव्हिंगज स्कीम’ (ईएलएसएस) म्हणजेच ‘इक्विटी संलग्न बचत योजनां’त गुंतवणूक करणे चांगले. ‘इक्विटी’ म्हणजे कंपनीचे शेअर भागभांडवल यांच्याशी ही गुंतवणूक योजना संलग्न आहे. ही गुंतवणूक म्युच्युअल फंड प्रकारात मोडते. प्राप्तीकर वाचविण्यासाठी यामध्ये तरतूद आहे.

या योजनेत गुंतवणूकदारांकडून जमा झालेला निधी ‘इक्विटी म्युच्युअल फंड’मध्ये गुंतविला जातो. एकूण जमा झालेल्या निधीपैकी निदान ६५ टक्के रक्कम तरी ‘इक्विटी म्युच्युअल फंड’मध्ये गुंतविली जाते. १ एप्रिल रोजी शेअर बाजाराला ४० वषर्र्े पूर्ण झाली व त्या दिवशी शेअर बाजाराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. हे वातावरण जर असेच टिकून राहिले, तर या योजनेतील गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना निश्चित चांगला परतावा मिळेल. शेअर बाजराची पुढील दिशा ही लोकसभेच्या निकालांवर अवलंबून आहे.

 

सध्या ३७ अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांची ‘ओपन एन्डेड’ (ईएलएसएस) योजना कार्यरत आहेत, तर सहा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांची ‘क्लोज एन्डेड’ (ईएलएसएस) योजना म्हणजे ती कायमची चालू राहते. या योजना म्हणजे ‘ऑन-गोईंग’ प्रक्रिया असतात. ‘क्लोज एन्डेड’ योजनांची निश्चित कालावधीनंतर मुदतपूर्ती होते. सध्या भांडवली बाजारपेठेत गुंतवणूकदारांसाठी ४२ ‘ओपन एन्डेड’ व २६ ‘क्लोज एन्डेड’ योजना उपलब्ध आहेत. या योजनांमधून त्यांच्याकडे जमा होणारा निधी लघुउद्योगातील कंपन्यांत किंवा मध्यम आकारातील कंपन्यांत किंवा मोठ्या आकाराच्या कंपन्यांत गुंतवितात. काही योजनांत एकाच आकाराच्या कंपन्यांत गुंतवणूक केली जाऊ शकते. काही योजनांत वेगवेगळ्या आकाराच्या कंपन्यांत निश्चित टक्केवारीने गुंतवूणक केली जाते. गुंतवूणक कुठे करावी, हा निर्णय पूर्णत: ‘ईएलएसएस’ योजना राबविणार्‍या व्यावसायिकांचा आहे व उपलब्ध असणार्‍या अनेक ‘ईएलएसएस’ योजनांपैकी कोणती योजना निवडावी, याचे पूर्ण स्वातंत्र्य गुंतवूणकदाराला असते.

 

यात गुंतवूणकदारांना दोन पर्याय उपलब्ध असतात. एक ‘वृद्धी’ व दुसरा ‘लाभांश.’ जर तुम्ही वृद्धीचा पर्याय स्वीकारला, तर योजनेत तुमचा निधी वाढत जातो व मुदतीअंती तुमच्या हाती मोठी रक्कम येते. जर लाभांश पर्याय निवडला, तर या योजनेला जितका फायदा होईल, त्या फायद्याच्या प्रमाणात गुंतवणूकदारांना लाभांश वाटण्यात येतो. मध्ये मध्ये लाभांशाची रक्कम स्वीकारल्यामुळे साहजिकच मुदतीअंती वृद्धी योजनेच्या तुलनेत कमी रक्कम हातात पडते.

 

परतावा चांगला मिळणारी ग्रोथ म्हणजेच वाढ किंवा वृद्धी पर्याय कधीही चांगला. तुम्हाला अन्य मार्गे महिन्याला निश्चित उत्पन्न मिळत आहे, अशांनी वृद्धी पर्याय निवडावा. तसेच लाभांश किती मिळेल? तुम्ही निवडलेला ‘ईएलएसएस फंड’ किती फायदा मिळवेल? शेअर बाजारात काय परिस्थिती असेल? या सर्व बाबींवर लाभांश देणे अवलंबून असते.गेल्या काही वर्षांत फक्त दोन ते तीन टक्के दराने लाभांश देण्यात आलेली उदाहरणे आहेत. त्यामुळे शक्यतो वृद्धीचा पर्याय निवडावा. यातील दीड लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूकप्राप्ती ‘कर कायदा १९६१’च्या ‘८० क’ कलमानुसार प्राप्तीकर सवलतीस पात्र आहे.


 
 
 

यात गुंतवणूक करण्यापूर्वी या योजनेने पूर्वी केलेली कामगिरी, यातील गुंतवणूकदारांना आतापर्यंत मिळालेला परतावा, या योजनेतील गुंतविण्यात येणार्‍या कंपन्या, फंड व्यवस्थापकांची कामगिरी या योजनेच्या खर्चाचे प्रमाण या सर्व बाबी जाणून घ्याव्यात. या सर्व बाबी समाधानकारक वाटल्यासच गुंतवणूक करावी. कोणीतरी एजंट येऊन तुम्हाला त्याच्या फायद्यासाठी गुलाबी चित्र रंगवेल, अशा भुलथापांना आमिषाला भुलून गुंतवणूक करू नका. तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला पटेल तेव्हाच व तेथेच गुंतवणूक करा.कोणीही गुंतवणूकदाराने दोनपेक्षा अधिक ‘ईएलएसएस’ योजनांत गुंतवणूक करू नये, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. तुमचे वय आणि तुमची जोखीम घेण्याची क्षमता यावर तुम्ही कोणत्या ‘ईएलएसएस’ योजनेत गुंतवणूक करायची हे ठरले पाहिजे. या योजनेला तीन वर्षांचा ‘लॉक-इन-पिरियड’ आहे. या ‘लॉक-इन-पिरियड’ कालावधीत कोणत्याही कारणाने व कोणत्याही परिस्थितीत यात गुंतविलेली रक्कम पूर्ण किंवा अंशत:देखील तुम्हाला परत मिळणार नाही, हा नियम प्रथम जाणून घ्या. जर ‘लॉक इन पिरियड’ संपेपर्यंत तुम्ही गुंतविलेली योजना फायदा मिळवत नसेल, तर त्या योजनेतून ‘लॉक इन पिरियड ’ संपताच बाहेर या. यात कदाचित तुमचे नुकसान होईल. पण, याच योजनेला चिकटून राहिल्यास भविष्यात जास्त नुकसान होऊ शकते. एखाद्या योजनेअगोदर चांगला परतावा दिला आहे म्हणजे ती भविष्यातही चांगलाच परतावा देईल असे नाही. कदाचित देईल, कदाचित देणारही नाही.


 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat