'देव' संकल्पना

    दिनांक  04-Apr-2019देवाचा अनुभव किंवा आत्मसाक्षात्काराचा अनुभव हा अतींद्रिय असतो. देव हा काही पंचभूतात्मक पदार्थ नाही की ज्यासाठी खूप श्रम करावे लागतील. देव हा या विश्वाचा आधार आहे. त्याच्या सत्तेवर या विश्वाचे व्यापार चालतात. याचे ज्ञान होणे हे खऱ्या अर्थाने देवदर्शन आहे.


'ब्रह्म सत्यं जगन्मिथ्या' या सूत्राचा समर्थांनी केलेला अन्वयार्थ आपण मागील लेखात पाहिला. हे विश्व निर्माण करण्यासाठी त्यामागे शक्ती हवी, ती शक्ती म्हणजे परब्रह्माच्या ठिकाणी मायोपाधिक असलेली विश्वनिर्मितीची इच्छा. यालाच सामान्य जनता 'देव' किंवा 'परमात्मा' म्हणून ओळखते. 'परब्रह्म,' 'परमात्मा,' 'माया' इ. पारमार्थिक संकल्पना तूर्त बाजूला ठेवून एका 'देव'कल्पनेचा विचार करू. तसेच देव सगुण की निर्गुण, याचा ऊहापोह न करता सामान्यांची व्यवहारातील जी 'देव' कल्पना आहे, त्याचे विवेचन करायचे आहे. आपण ज्या लोकात वावरतो, त्याला 'कर्मभूमी' असे म्हटले जाते. या कर्मभूमीत माणसाला काहीतरी मिळवण्यासाठी सतत कष्ट करावे लागतात. सामान्य माणसे नोकरी, धंदा, व्यवसाय, शेती, कारखाने वगैरे ठिकाणी मेहनत करीत असतात. तेथे त्यांना खूप श्रम करावे लागतात. काहीतरी मिळवण्यासाठी हे श्रम आवश्यक असतात. त्यामुळे लोकांची अशी धारणा असते की, देवाचे दर्शन घडावे किंवा आत्मज्ञान व्हावे. असे वाटत असेल, तर त्यासाठी मेहनत करून शरीराला कष्ट दिले पाहिजेत. मग ही माणसे कष्ट करून, देहाला झिजवून, व्रते-उद्यापने-उपासतापास करून, अनवाणी चालून देव भेटेल, अशी इच्छा करीत असतात. परंतु, व्यवहारातील नियम परमार्थात चालत नाही. देवाचा अनुभव किंवा आत्मसाक्षात्काराचा अनुभव हा अतींद्रिय असतो. देव हा काही पंचभूतात्मक पदार्थ नाही की ज्यासाठी खूप श्रम करावे लागतील. देव हा या विश्वाचा आधार आहे. त्याच्या सत्तेवर या विश्वाचे व्यापार चालतात. याचे ज्ञान होणे हे खऱ्या अर्थाने देवदर्शन आहे. लोकांच्या मनात अशा कल्पना असतात की, वेगवेगळे आध्यात्मिक, धार्मिक ग्रंथ वाचून, त्यांची पारायणे करून देवाची प्राप्ती होईल. पण तसे होत नाही. अध्यात्मग्रंथांचा विचार केला, तर त्यात वेद, श्रुती, स्मृती भाष्ये, पुराणे आणि इतर अनेक धार्मिक ग्रंथांचा समावेश करावा लागतो. हे सर्व ग्रंथभांडार एवढे प्रचंड आहे की, ते नुसते चाळायचे म्हटले तरी, आयुष्य पुरणार नाही. शिवाय प्रत्येक धर्मशास्त्रकाराचा दृष्टिकोन वेगवेगळा असल्याने या ग्रंथांच्या वाचनाने संशय मात्र वाढतील, संशय पिशाच्चाने पछाडलेले मन देवापर्यंत पोहोचणार नाही. काही लोकांना असे वाटते की, तीर्थयात्रा करून आपल्याला देवाला प्रसन्न करून घेता येईल किंवा देव सापडेल. तथापि, या सृष्टीमध्ये तीर्थस्थळे अपार आहेत. त्या सर्व तीर्थस्थळांच्या यात्रा करायच्या, तर आयुष्य पुरणार नाही. देवासाठी खूप कष्ट केले पाहिजेत, असेच सर्वजण मानतात.

 

पावावया देवाधिदेवा ।

बहुविध श्रम करावा ।तेणे देव ठायी पाडावा ।

हे सर्वमत ॥ (८.१.१६)

 

देवासाठी भ्रमंती करताना एक लक्षात येते की, लोकांमध्ये प्रचलित अनेक देव, अनेक पंथ आणि तऱ्हेतऱ्हेच्या उपासना आहेत. या सर्वांतून निश्चित काय ते निवडता येत नाही. प्रत्येकाला आपला देव, आपला पंथ, आपली उपासना श्रेष्ठ आहे असे वाटत असते. त्याचाच त्यांना गर्व होतो. त्यामुळे समर्थ म्हणतात, 'देव राहिला परता । अहंता गुणे ।' या मतमतांतरात देव बाजूला पडून प्रत्येकाचा अभिमान, गर्व, ताठा मात्र अनुभवाला येतो. या गोंधळात देव सापडत नाही. देवाला कसे ओळखावे, हे समर्थांनी 'दशक-८' या 'ज्ञानदशका'पासून सांगायला सुरुवात केली आहे. देव कसा ओळखावा, हे सांगताना समर्थ म्हणतात,

 

च्यारी खाणी च्यारी वाणी ।

चौऱ्यांसि लक्ष जीवयोनी ।

जेणे निर्मिले लोक तिनी ।

तया नाव देव ॥ब्रह्मा विष्णु आणी हर ।

हे जयाचे अवतार ।तोचि देव हा निर्धार ।

निश्चयेसी ॥

 

याचा अर्थ खरा देव हा आपण मानतो, समजतो, त्या देवांचाही निर्माणकर्ता आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे ज्याचे अवतार आहेत तो 'थोरला देव' त्याला ओळखले पाहिजे. ही अनुभूती अतींद्रिय असल्याने तिचे शब्दांत वर्णन करता येत नाही. देवाने ही सृष्टी निर्माण केली. परंतु, लोक दगडालाच देव मानू लागले आहेत.

 

देवे निर्मिली हे क्षिती ।

तिचे पोटी पाषाण होती ।तयासचि देव म्हणती । विवेकहीन ॥

 

अशा रीतीने लोक अशाश्वतामध्ये देव पाहू लागतात. समर्थांचे निरीक्षण असे आहे की, पुष्कळ माणसे गप्पा मारताना शाश्वताबद्दल बोलत असतात. ब्रह्म शाश्वत, निर्मळ, सत्य आहे. ते येत नाही, जात नाही. या विश्वात भरून उरले आहे... वगैरे गप्पा मारतात. पण, त्यांच्या ठिकाणी प्रचितीचा अभाव असल्याने प्रत्यक्षात मात्र अशाश्वत चंचळामागे धावत असतात. त्यातून वेगवेगळे मतप्रवाह निर्माण होतात. त्यांना अनुयायी मिळतात. प्रत्येकाला आपल्या देवाचा, पंथाचा अभिमान उत्पन्न होतो. त्यामुळे असे कितीतरी देव तयार होऊन त्यांचे महत्त्व वाढले आहे.

 

देव जाले उदंड । देवांचे माजले भंड ।

भूतदेवांचे थोतांड । येकचि जाले ॥ (११.२.२०)

 

भूत, देव, देवता सारे एकमेकांत मिसळून गेले. ही सामाजिक दुरवस्था रामदासकालीन असली तरी, आजही ती थोड्या फार प्रमाणात टिकून आहे आणि पुढेही राहणार आहे. त्यामुळे 'थोरल्या देवा'चा विचार करायला कोणाला वेळ नाही. या गोंधळात अशी परिस्थिती झाली आहे की,

 

मुख्य देव तो कळेना ।

कशास काही मिळेना ।

येकास येक वळेना । अनावर ॥ (११.२.२१)

 

अशा प्रकारे समाज विचारभ्रष्ट झाला. तशात लोक आपल्या पंथावर, उपासना-विधीवर, आपल्या देवाच्या सामर्थ्यावर शास्त्रे निर्माण करू लागली. लोक आपल्या ऐहिक इच्छा तृप्त करणारी व्रते करू लागली. थोडक्यात-

 

शास्त्रांचा बाजार भरला ।

देवांचा गल्बला जाला ।

लोक कामनेच्या व्रताला ।

झोंबोन पडती ॥

 

कोण कोणाला विचारीना. जो ज्या मतप्रवाहात सापडला तो त्याचाच गर्व करू लागला. सामान्य माणसे अशाश्वताच्या मागे धावत असतात. पण त्यांना समाधान मिळत नाही. या समासात समर्थ पुढे सांगतात, ही माणसे कोणता पंथ अनुसरतात, कोणत्या देवाला भजतात, यासंबंधी माझा प्रत्यक्ष अनुभव सांगतो. स्वामींनी १२ वर्षे पायी हिंडून देशभरातील लोकांचे अवलोकन केले होते. स्वामी सांगतात की, बऱ्याच लोकांना वाटत असते की, धातू, दगड इत्यादींपासून तयार केलेल्या देवांच्या प्रतिमा खऱ्या आहेत. दुसऱ्या प्रकारचे लोक देवाच्या अवतारांना मानतात. त्यांची चरित्रे ऐकतात. त्यांची पूजा करतात. त्यांच्या नावाचा जप करतात. तसेच त्यांचे ध्यान करतात. काही लोक अंतरात्मा देव असे मानतात, तर काही विश्वात्म्याला देव मानतात. तथापि निर्मळ शाश्वत ब्रह्मवस्तूशी तदाकार होऊन स्वतः ब्रह्मरूप झालेले फार थोडे असतात. स्वामींच्या या निरीक्षणावरून त्यांनी चत्वार देवांची संकल्पना मांडलेली दिसून येते. हे चार प्रकारचे देव थोडक्यात पुढीलप्रमाणे मांडता येतील.

 

. नाना प्रकारच्या प्रतिमा असणारे प्रतिमादेव.

 

. अवतारांचा महिमा ज्यांच्यामुळे कळतो ते अवतार देव.

 

. सर्वांचा अंतरात्मा असणारा विश्वात्मा देव आणि

 

. निर्मळ निश्चल परब्रह्म. समर्थ यापुढे सांगतात, जे प्रकृतीमधील देव त्या प्रकृतीच्या स्वभावाचा म्हणजे चंचल आणि अशाश्वतच असणार. कल्पनेपलीकडे असणाऱ्या देवाचे अस्तित्व विवेकाने ओळखावे लागते.

 

अरे जो चंचळास ध्याईल ।

तो सहजचि चळेल ।

जो निश्चळास भजेल । तो निश्चळचि ॥

ज्याने शाश्वत ब्रह्म ओळखले त्याची व्यवहारात वागताना पंचाईत होते. म्हणून समर्थ शेवटी सांगतात की, जाणत्या माणसाने या अशाश्वत प्रकृती प्रमाणेच लोकांसारखे समाजात वावरावे, पण अंतरात मात्र शाश्वत ब्रह्म ओळखून असावे.

प्रकृतीसारिखे चालावें ।

परी अंतरी शाश्वत ओळखावे ।

सत्य होऊन वर्तावे । लोकांऐसे ॥

 

- सुरेश जाखडी

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat