ट्रक वाहतूक क्षेत्रातील सम्राट : अशोक शाह

    दिनांक  04-Apr-2019   १९६९ साली कुंवरजी शहाचे ज्येष्ठ चिरंजीव अशोक शहा यांनी व्यवसायात पदार्पण केले. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्याकडची मुलं मामाच्या गावाला जात. अशोक मात्र ट्रकमधून माल पोहोचविण्यासाठी गुजरात पालथा घालत असे. अनेकवेळा ट्रकमधल्या मालासोबतच तो ट्रकमध्ये झोपी जाई. ट्रक चालविण्यापासून, ट्रक दुरुस्त करण्यापर्यंत अगदी ऑफिसमधल्या अकाऊंटपर्यंत सर्व काही अशोकने शिकून घेतले. अशोक बोर्डिंगमध्ये शिकल्यामुळे स्वावलंबी होता. दहावीपर्यंत त्याने पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. बारावीनंतर एचआर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, काही कारणास्तव शिकता आले नाही. परंतु, व्यावहारिक विद्यापीठात अशोकने पीएच.डी केली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

कच्छ... गुजरातमधील एक वाळवंटी भाग. अत्यंत प्रतिकूलतेचा परिसर. पूर्वीच्या काळात येथील प्रतिकूल परिस्थितीमुळे येथील तरुण शहरात जाऊन पोटापाण्यासाठी नोकरी- व्यवसाय करत. त्यामुळेच या परिसरातील व्यापारांचे, उद्योजकांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. याच परिसरातला नऊ वर्षांचा एक मुलगा पोटापाण्यासाठी मुंबईत आला. मुंबईत नातेवाईकांच्या किराणा मालाच्या दुकानात काम करू लागला. दिवसभर दुकानात काम करायचा आणि रात्री दुकानाच्या पडवीतच झोपायचा. १५ वर्षांचा होईपर्यंत हाच त्याचा शिरस्ता होता. काही ‘बुकं’ शिकल्यानंतर त्याला एका वाहतूक कंपनीत कारकुनाची नोकरी मिळाली. त्याच वेळेस योगायोगाने त्याचा त्याच व्यवसायात प्रवेश झाला. सचोटीने व्यवसाय करत त्याने आपल्या व्यवसायाची बीजे रुजवली होती. त्याची चांगली वाढ केली. मुलांनी त्याला खतपाणी घालून फुलवलं. आज हा व्यवसाय तब्बल १ हजार कोटी रुपयांच्या उलाढालीचा झालेला आहे. तो नऊ वर्षांचा लहान मुलगा म्हणजेच कुंवरजी खिमजी शाह.

 

१९४६ साली कुंवरजी ‘पदमशी नरशी अ‍ॅण्ड कंपनी’मध्ये कारकून म्हणून काम करू लागले. १९४८ साली कंपनीचे मालक पदमशीभाई काही कारणास्तव कंपनीत ११ महिने आले नाही. यादरम्यान कंपनीची सारी सूत्रे कुंवरजीभाईंकडे होती. त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि प्रामाणिकपणे कंपनी निव्वळ सांभाळलीच नाही, तर कंपनी नफ्यात चालवून तिचा विस्तारदेखील केला. या कामगिरीने पदमशीभाई भलतेच खूश झाले. त्यांनी कुंवरजीला सांगितले की, “तू आता स्वतंत्र व्यवसाय कर, खूप यशस्वी होशील.” १९५० साली आपला मित्र बाळुभाई यांच्या मदतीने अवघ्या एका ट्रकनिशी कुंवरभाईंनीबाळुभाई कुंवरजी अ‍ॅण्ड कंपनी’ सुरू केली. कुंवरजीचं उद्योगातील हे पहिलं पाऊल. पुढच्याच वर्षी आपले भाऊ जगशीभाई आणि विसनजीभाई यांच्या मदतीने ‘कुंवरजी के शाह अ‍ॅण्ड कंपनी’ सुरू केली. मुंबई ते दहिसर आणि पश्चिम उपनगर हे त्यांचं कार्यक्षेत्र.

 

एके दिवशी ट्रक लोडिंग करण्यासाठी वाहतूक कंपन्यांची रांग लागली होती. त्याचवेळी एक कंपनी रांग मोडून मध्येच घुसली. ‘तुम्ही मध्ये कसे काय घुसू शकता,’ असा कुंवरजींनी त्या कंपनीच्या मालकाला जाब विचारला. त्यामुळे चिडून जाऊन त्या कंपनीच्या मालकांनी शाहबंधूंना जातिवाचक शिवीगाळ केली. या प्रकाराने भडकलेल्या शाहबंधूंनी आपल्या नावाच्या आद्याक्षरावरून १९५८ साली ‘विजय ट्रान्सपोर्ट कंपनी’ सुरू केली. लालजी जीवराज शाह आणि मेघजी हंसराज गाला हे अन्य भागीदार होते. गुजरात-मुंबई मार्गावरून त्यांनी ट्रक वाहतूक सुरू केली. थेट टाटा कंपनीतून त्यांनी सुरुवातीला दोन ट्रक खरेदी केले. त्यासाठी जमशेदपूरहून ट्रक मागवला. याकाळात ट्रक वाहतूक व्यवसाय जिकिरीचा होता. खडबडीत रस्ते, घाट-वळणाचा रस्ता, ट्रक अडवून लुटणे हे त्या काळात सर्रास चालत असे. पोलिसांचेदेखील संरक्षण हवे तसे मिळत नसे. त्याचप्रमाणे पेट्रोल पंप, हॉटेल यांची वानवा तर होतीच. अशा काळात या भावांनी एकत्र येऊन हा व्यवसाय भरभराटीस आणला. गोदरेज, बाटा, झंडू फार्मा, जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, एशियन पेण्ट्स, कोलगेट अशा नामांकित कंपन्या ‘विजय ट्रान्सपोर्ट कंपनी’चे ग्राहक होते. शहाबंधू नेहमीच काहीतरी नवीन करत असत. ‘मँगो स्पेशल ट्रक,’ ‘रेडिओ शो ट्रक्स’ ही त्यांनी पहिल्यांदा संकल्पना आणली.

१९६९ साली कुंवरजी शहाचे ज्येष्ठ चिरंजीव अशोक शहा यांनी व्यवसायात पदार्पण केले. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्याकडची मुलं मामाच्या गावाला जात. अशोक मात्र ट्रकमधून माल पोहोचविण्यासाठी गुजरात पालथा घालत असे. अनेकवेळा ट्रकमधल्या मालासोबतच तो ट्रकमध्ये झोपी जाई. ट्रक चालविण्यापासून, ट्रक दुरुस्त करण्यापर्यंत अगदी ऑफिसमधल्या अकाऊंटपर्यंत सर्व काही अशोकने शिकून घेतले. अशोक बोर्डिंगमध्ये शिकल्यामुळे स्वावलंबी होता. दहावीपर्यंत त्याने पहिला क्रमांक कधीच सोडला नाही. बारावीनंतर एचआर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, काही कारणास्तव शिकता आले नाही. परंतु, व्यावहारिक विद्यापीठात अशोकने पीएच.डी केली, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

अशोकने सर्वप्रथमविजय ट्रान्सपोर्ट’मध्ये सिस्टीम आणली. एकदा ‘आयटी रिटर्न्स’ फाईल न केल्याने कंपनीला मजबूत कर भरावा लागला. त्यानंतर अशोक स्वत: आयकर कार्यालयात जायचे तिथल्या अधिकार्‍यांना भेटून कायदे नियम समजून घ्यायचे. इथे एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो. संपूर्ण भारतात पसरलेला कारभार, भागीदार्‍या यामुळे हिशोबाचा ताळमेळ लागत नव्हता. सगळे काका, कंपनीचे वकील, लेखापाल काथ्याकूट करू लागले. काय करावं सुचत नव्हतं. अशोकने सुचवलं की, सगळ्या चोपड्या निकाली काढायच्या अन् अगदी शून्याने सुरुवात करायची. रात्रभर सगळ्यांनी विचार केला आणि सकाळी अशोकच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. आयकर अधिकार्‍यांशी सल्लामसलत करून सगळ्या चोपड्या, हिशेब निकाली काढले गेले आणि १८ जुलै, १९७७ पासून व्यवहाराला नव्याने सुरुवात केली. पै अन् पैचा हिशेब ठेवला जाऊ लागला.

हळूहळू कंपनीचा विस्तार झाला. ‘व्ही-ट्रान्स,’ ‘व्ही-एक्सप्रेस’ आणि ‘व्ही- लॉजिस’ अशा तीन कंपन्या निर्माण झाल्या. ‘व्ही ट्रान्स उद्योगसमूह’ हा आज एक हजार कोटी रुपयांची उलाढाल करत आहे. १६०० हून अधिक कर्मचारी या समूहात कार्यरत असून देशभरात समूहाची ७०० हून अधिक कार्यालये आहेत. अशोक शहा यांना त्यांचे बंधू महेंद्र, हसमुख, राजेश, मुले विरल आणि विशाल, तर पुतण्या आदित्य यांची उत्तम साथ मिळत आहे. कुंवरजी शहांनी वयाच्या ४३व्या वर्षी उद्योगातून निवृत्ती घेऊन स्वत:ला समाजसेवेत वाहून घेतले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांच्या समाजकार्याचा वसा त्यांची मुले आणि नातवंडे हा वसा पुढे नेत आहेत. कोणताही उद्योग फक्त पैशाने मोठा होत नाही. चिकाटी, जिद्द, घरच्यांचा पाठिंबा, प्रचंड मेहनत, नवनवीन तंत्र आत्मसात करण्याची वृत्ती यामुळे तो मोठा होता. अशोक शहा यांची ‘व्ही-ट्रान्स’ यांचं सर्वोत्तम उदाहरण आहे.

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा...facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat