विक्रोळी विद्यालयाची ‘बिना दप्तराची शाळा’

    दिनांक  30-Apr-2019
मुंबई : विक्रोळी येथील ‘बॅ. नाथ पै शिक्षण प्रसारक मंडळा’च्या विक्रोळी विद्यालयात माध्यमिक विभागाने वार्षिक परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांसाठी ‘बिना दप्तराची शाळा’ भरवली होती. शनिवार, दि. १३ एप्रिल रोजी झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध ‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज’ मालिकेतील बाल संभाजीची भूमिका साकारणारा बाल कलाकार कुमार दिवेश यांना शाळेत ‘मान्यवरांबरोबर संवाद’ कार्यक्रमांतर्गत बोलावले होते. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीची भूमिका करताना रक्त कसे सळसळत होते, याचे किस्से सांगितले. त्यावेळी विक्रोळी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आपण आई-वडिलांचे व शाळेतील शिक्षकांचे ऐकावे, असा मोलाचा संदेश बाल कलाकार कुमार दिवेश यांनी दिला. अमरकोर, भांडुप शाळेचे मुख्याध्यापक सुनील वागळे यांनी आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व स्पष्ट केले.

 

दि. १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांनी मनमुराद पुस्तके चाळली. खेळ खेळले. लघुपट पाहिले, तर प्रयोगशाळेत मायक्रोस्कोप हाताळला. दि. १६ एप्रिल रोजी जयवंत पाटील (शारदा नाईट हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक व लेखक) यांच्यांशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. वाचनाचे महत्त्व पटवून दिले. नियमित आपल्याला सुचलेले विचार, चारोळ्या, काव्यलेखन सुरू करा, स्वतःच्याकल्पनेनुसार लेखन कौशल्य विकसित करू शकतात, असे मार्गदर्शन केले.

 

दि. १७ एप्रिल रोजी कवी प्रसाद फर्डे यांनी कविता कशा कराव्यात, ते सांगितले आणि शिवकन्या भक्ती फर्डे यांनी कमी वेळात शिवव्याख्यान मुलांसमोर सादर केले. यात त्यांनी अफजलखान भेटी वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले नियोजन आणि ‘मावळा’ या शब्दाचा अर्थ सांगितला. दि. १८ एप्रिल रोजी ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळविणारे चित्रकार विक्रांत भिसे यांनी विद्यार्थ्यांना चित्रकला आणि करिअरबाबत विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. शनिवार, दि. २० एप्रिल रोजी लोकशाहीर दत्ताराम म्हात्रे यांनी विद्यार्थ्यांना ‘आभाळाची आम्ही लेकरे,’ ‘छोटेसे बहीण-भाऊ,’ ‘खरा तो एकची धर्म,’ ‘स्वातंत्र्याचा पोवाडा’ म्हणून दाखविला आणि विद्यार्थ्यांकडून म्हणवून घेतला. दि.२२ एप्रिल रोजी केशव सृष्टी, भाईंदर यांच्या सहयोगाने सीड्स बॉल बनवण्यात आले. विद्यार्थ्यांनी पाचशे सीड्स बॉल बनवले.

 

मंगळवार, दि. २३ एप्रिल रोजी पत्रकार पवन होण्याळकर यांच्याशी संवाद झाला. ‘बिना दप्तराची शाळा’ उपक्रमांतर्गत दि. २४ एप्रिल रोजी चित्रकार रुषाल कराळे यांनी सुंदर रांगोळी काढली. सिंहयोग यांच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी अनेक उपक्रम राबवले. सेवा सहयोगने मुलांसाठी स्पर्धा घेतल्या. गुरुवार, दि. 25 एप्रिल रोजी ‘बिना दप्तराची शाळा’ उपक्रमाचा निरोप समारंभ संपन्न झाला.त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जनार्दन जंगले (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) हे उपस्थित होते. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून विविध उपक्रम सुरू करीत असल्याचे मुख्याध्यापक भिवा येजरे यंनी जाहीर केले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव गणेश बटा उपस्थित होते.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat