माळशिरसचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे निधन

    दिनांक  30-Apr-2019 

सोलापूर : माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंतराव डोळस यांचे आज निधन झाले. मुंबईतील सैफी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पोटाच्या कर्करोगाने त्रस्त असलेल्या डोळस यांच्यावर गेल्या काही महिन्यांपासून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. डोळस यांच्या अकाली निधनाने सोलापुर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून व विधानसभेतील एक अभ्यासू आमदार अशी त्यांची ओळख होती. २००९ साली माळशिरस मतदारसंघ राखीव झाल्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या जागी डोळस यांनी राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१४ सालीही त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर पुन्हा विजय मिळवला होता. यासोबतच त्यांनी चर्मकार महामंडळ आणि म्हाडाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पहिले होते. डोळस यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

 

डोळस हे मागील सहा ते सात महिन्यांपासून पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्रीपासून त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावर पसरवली जात होती. दुर्दैवाने आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, डोळस यांच्या पार्थिवावर माळशिरस तालुक्यातील दसुर या गावी बुधवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat