बेवारस मृतदेहांना मोक्ष देणारी...

    दिनांक  30-Apr-2019   अंत्यसंस्कारानंतर मृतात्म्याला मोक्ष मिळतो, असे म्हणतात. बेवारस मृतदेहांवर माणुसकीच्या भावनेतून अंत्यसंस्कार करुन त्यांना मोक्ष देणाऱ्या मुंबईतील रेल्वे पोलीस कर्मचारी नयना दिवेकर...


मुंबई रेल्वे पोलीस दलात अनेक महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत
. परंतु, एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने आपल्या आगळ्यावेगळ्या कामाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. एवढंच नव्हे, तर असे आगळेवेगळे काम करणारी ती एकमेव महिला पोलीस कर्मचारी आहे. जे काम करायला पुरुषही तयार होत नाही, ते काम ती करत आहे. हे काम आहे, रेल्वे अपघातातील बेवारस मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे. हे काम करणाऱ्या या मर्दानी पोलीस कर्मचारी नयना दिवेकर.

  

मुंबईत रेल्वे अपघातात दररोज अनेक जण मृत्युमुखी पडतात. काहीजणांच्या मृतदेहाची ओळख पटवणेही अवघड. काहीजणांचे वारस भेटतात, तर काहींचे नाही. परंतु, ज्यांच्या वारसांशी संपर्क होत नाही, त्या मृतदेहांवर रेल्वे पोलिसांच्यावतीने अंत्यसंस्कार करण्यात येतात. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बेवारस मृतदेहांवर निर्भयतेने आणि माणुसकीच्या भावनेतून अंत्यसंस्कार करणाऱ्या रेल्वे पोलीस सेवेतील महिला पोलीस शिपाई नयना दिवेकर. त्यांच्या कार्याचा आदर्श इतरांनीदेखील घ्यावा, अशी अपेक्षा पोलीसही व्यक्त करतात. आतापर्यंत नयना दिवेकर यांनी पाचशेहून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

 

२०११ मध्ये नयना पोलीस दलात रुजू झाल्या, तेव्हा ही जबाबदारी देताना ती काम कसे करणार, अपघातातील चित्रविचित्र मृतदेह पाहून त्या घाबरतील, असे मत काही सहकाऱ्यांनी व्यक्त केले. परंतु, तरीही नयना यांनी हे काम करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी सर्वप्रथम त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यांच्या कामाच्या पहिल्याच दिवशी एका मुलीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता. तिचा कोणी वारस नव्हता. त्या मुलीचा निरागस मृतदेह पाहून नयना हेलावल्या आणि त्यांनी या मुलीचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर रुजू झाल्या. सहकाऱ्यांनाही याचे आश्चर्य वाटले. या घटनेनंतर त्या या कामाकडे वळल्या. तेव्हापासून हे ओंगळवाणे वाटणारे काम नित्याने करण्यास त्यांनी सुरुवात केली. या कामाच्या माध्यमातून एक सामाजिक जबाबदारीही पार पाडत असल्याची भावना त्या व्यक्त करतात.

 

३८ वर्षांच्या नयना दिवेकर कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या अपघाती मृत्यू विभागात गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. रेल्वे अपघातात मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काम म्हणजे किळसवाणे आणि भयप्रद. परंतु, नयना हे काम अगदी व्यवस्थित आणि न डगमगता करतात. त्यांच्या या निडर स्वभावामुळेच आतापर्यंत त्यांनी पाचशेहून अधिक रेल्वे अपघातातील मृतदेहांची रीतसर विल्हेवाट लावली आहे. बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे हे पुण्याचे काम आहे. तसेच ते काम आपल्या हातून होत असल्याने नयना यांनी ते आनंदाने स्वीकारले.

 

कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्षाला रेल्वे अपघातात दगावलेल्या ५०० मृतदेहांची नोंद होते. त्यापैकी साधारण ३०० जणांचे वारस मृतदेह ताब्यात घ्यायचे, तर २०० जणांचे मृतदेह बेवारस ठरवले जायचे.त्यात काही वेळेला चक्क स्वत:च्या पदरचे पैसे घालून मृतदेहांवर पूर्णपणे विधीवत अंत्यसंस्कार केल्याचे नयना दिवेकर सांगतात. रेल्वे अपघातात दगावलेल्यांचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात आल्यावर सुरुवातीला आठ दिवस त्या मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध पोलिसांकडून घेतला जातो. त्यानंतर कोणीही वारसदार पुढे आला नाही, तर अशा मृतदेहांना ‘बेवारस’ जाहीर करण्यात येते व त्याच्यावर पोलिसांकडूनच अंत्यसंस्कार केले जातात. रेल्वे अपघातात मृत पावलेल्या बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रेल्वेकडून फक्त एक हजार रुपये दिले जातात. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याचे नयना सांगतात.

 

रेल्वे अपघातानंतर उपलब्ध माहितीच्या आधारे मृतदेहाच्या वारसाशी संपर्क साधला जातो. काही जणांचे नातेवाईक हे दुसऱ्या राज्यात स्थायिक असतात. त्यांना मग त्यांच्या नातेवाईकांच्या मृत्यूची सूचना दिली जाते आणि मृतदेह ताब्यात घेण्यास सांगितले जाते. परंतु, काही नातेवाईकांची परिस्थिती अत्यंत हलाखीची असते. त्यांची मुंबईत आल्यानंतरही राहण्याची सोय नसते. एवढेच नव्हे, तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करायलाही त्यांच्याकडे पैसे नसतात. त्यात स्वत:च्या पदरचे पैसे घालून मृतदेहावर पूर्णपणे विधीवत अंत्यसंस्कार करण्यावर नयना दिवेकर यांचा भर असतो. मोक्ष देण्याचे हे काम नयना दिवेकर या पोलीस सेवेत रूजू झाल्यापासून आजपर्यंत कर्तव्य म्हणून प्रामाणिकपणे करीत आहेत.

 

बऱ्याचवेळा काहीजण उशीर झाला म्हणून किंवा अन्य कारणांसाठी रेल्वे रुळ ओलांडतात. परंतु, हीच चूक त्यांच्या जीवावर बेतते. त्यामुळे रेल्वेचा रूळ ओलांडू नका, स्वत:चा जीव धोक्यात घालू नका. रेल्वेच्या पुलाचा वापर करा,” असे आवाहन नयना रेल्वे प्रवाशांना करतात. अशा पद्धतीने आपल्यातील माणुसकीचे दर्शन इतरांना देणाऱ्या रेल्वे पोलीस शिपाई नयना दिवेकर यांच्या कार्याला सलाम...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat