भारताची हेलिकॉप्टर खरेदी ; शत्रूंच्या पाणबुड्यांच्या चिंधड्या उडणार

03 Apr 2019 12:25:56



रोमियो एमएच-६०आर हे जगातील सर्वात शक्तिशाली मैरीटाइम हेलिकॉप्टर


वाशिंग्टन : भारत आणि अमेरिकेमध्ये २४ एमएच-६० आर रोमियो सीहॉक हेलिकॉप्टर खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला आहे. यामुळे भारताच्या समुद्री सीमा आणखीन मजबूत होणार आहेत, कारण रोमियो एमएच-६०आर हे जगातील सर्वात शक्तिशाली मैरीटाइम हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते. ही हेलिकॉप्टर शत्रूंच्या पाणबुड्या, जहाजे नष्ट करू शकतात, यासोबतच समुद्रातील बचाव कार्यात या हेलिकॉप्टरचा मोठा उपयोग होतो.

 

समुद्री सुरक्षेसाठी भारत सध्या ब्रिटिश सी किंग हेलिकॉप्टर वापरतो. त्यामुळे आता रोमियो एमएच-६०आर ब्रिटिश सी किंगची जागा घेणार आहेत. रोमियो सीहॉक हेलिकॉप्टर अमेरिकेच्या लॉकहीड-मार्टिन या कंपनीने तयार केली आहेत. मंगळवारी अमेरिकेने याबाबत अध्यादेश काढत भारताला २४ रोमियो एमएच-६०आर हेलिकॉप्टर विकत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, हा व्यवहार १६ हजार करोड रुपयांचा असून लवकरच ही हेलिकॉप्टर भारताला मिळणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली.

 

अमेरिकेने काढलेल्या अध्यादेशानुसार, भारत अमेरिकेचा सर्वात मोठा संरक्षण भागीदार आहे. या हेलिकॉप्टरच्या खरेदी-विक्री व्यवहारामुळे भारत आणि अमेरिकेचे राजनैतिक संबंध आणखीन दृढ होणार आहेत. या व्यवहारामुळे भारतचे लष्करी सामर्थ्य वाढणार असून इंडो-पॅसिफिक व दक्षिण आशियामध्ये शांती निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. अर्थातच यामुळे भारतीय नौदलाची ताकद आणखीन वाढणार आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0