तीर्थयात्रेचा प्रमुख उद्देश

    दिनांक  03-Apr-2019हजारो वर्षांपासून चालत आलेल्या यात्रा आजच्या कलियुगातदेखील परमार्थप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. देवभावाच्या स्निग्ध प्रकाशानं मनामनाचा गाभारा उजळून जाईल, यात शंका नाही.


सध्या प्रवास, प्रवासी आणि पर्यटन यांचे गणित चांगले जमले आहे. प्रवासात उपयोगी ठरणारी सगळी साधने प्रवाशांकडे उपलब्ध असतात. त्यातून पैसा, वेळ आणि आवड यांची सुयोग्य सांगड घालून देणाऱ्या कंपन्या भरपूर पैसा कमवत आहेत. आपल्या देशात धार्मिक स्थळी जाणारेही अनेकजण आहेत, स्थानात, वातावरणात बदल होतो. हा बदल देहाला भावतो. त्यामुळे मनाला थोडीशी उभारी येते. परंतु, मन पूर्णपणे प्रसन्न होतेच, असे नाही. कारण, प्रवासाचा हेतू मौज...मजा हाच असतो. अशा सहली वारंवार होऊ लागल्या की, त्यातील नाविन्य संपतं. खरेदी, फोटो, खाणं आणि चंगळवाद फोफावतो. या सगळ्याचा परिणाम म्हणजे मनाला हवी असणारी शांती आणि समाधान यांचा ताळमेळ होत नाही. सर्वच प्रवासांमधून मनाला संपूर्ण समाधान प्राप्त होत नाही. म्हणूनच संतांनी यात्रा कराव्यात, असं सांगितले आहे. तीर्थक्षेत्र आणि तीर्थयात्रा यांना त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. यात्रा म्हणजे देव. देवतांच्या पवित्र स्थानी तीन दिवस तरी वास्तव्य करावं. तीन दिवसांच्या मुक्कामात एकाच स्थानावरील पावित्र्य संपादन करून त्या पवित्रतेचा अनुभव घ्यावा. हरिनामाचा गजर करावा, अर्चन करावे, दर्शन घेऊन त्या क्षेत्रांच्या स्पंदनांची अनुभूती घ्यावी. देहाला थोडेतरी कष्ट देणाऱ्या यात्रा केल्याने त्याचे महत्त्व वाटते. त्याचप्रमाणे देहबुद्धी कमी करण्याचा तो मार्ग आहे. दर्शनासाठी रांगेत उभं राहणं, अभिषेकासाठी तिष्ठत राहणे गरजेचे आहे. कुठेही वशिला लावून भगवंताचे पूजन करू नये. पैसे देऊन ‘स्पेशल दर्शन’ न घेणंच चांगलं! देवाच्या द्वारी कोणाचाही वशिला भक्तिसाठी आणि पुण्यप्राप्तीसाठी उपयोगी पडत नाही. दर्शनासाठी काया कष्टविली की, देहबुद्धीचा क्षय होण्यास प्रारंभ होतो.त्याचप्रमाणे पैशांनी देव, भक्ती, पुण्य कधी विकत घेता येत नाही.

 

पैसे देऊन भक्तीची श्रीमंती लाभली असती, तर सगळेच धनवान श्रेष्ठ भक्त झाले असते. सगळे श्रीमंत पुण्यवान झाले असते. देव हा भावाचा भुकेला आहे. त्याला शुद्ध भाव भावतो. भगवंताला सुवर्ण, चांदी, पैसा अजिबात नको असतो. तुमचं श्रद्धायुक्त मन त्याला मनापासून आवडतं. अशा भक्तिभावाने भरलेल्या आणि श्रद्धेने भारलेल्या मनाचा तो अंकित होतो. भक्तीचं कर्ज त्यांच्यावर झालं की, तो सदैव भक्ताच्या सेवेस तप्तर असतो. अशा श्रद्धा, भक्ती असणाऱ्या भक्तांची तो प्रत्येक क्षेत्रावर वाट बघत असतो. भक्तांना हे आकलन झालं की, त्यांचं मन आगळ्या आनंदाने भरून जातं. पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य आणि अनेक सुखसोयी असलेल्या यात्रा कंपन्या आपला खूप धंदा करून घेतात. परंतु, त्यामुळे मनाची तृष्णा तृप्त होत नाही. मनाची अतृप्ती संपतेच असे नाही. असमाधान, अशांती तशीच राहते. मनाची व्यग्रता, व्याधी नष्ट होतेचअसे नाही. त्याच्या मनाच्या सुदृढतेसाठी उपयोग होत नाही. आपल्या तीर्थयात्रांची प्रसिद्धी आणि भक्तीचा डांगोरा पिटून मन प्रशांत कसं होईल? देवाला आर्ततेने साद घातली की तस्व तो प्रतिसाद देतो. दर्शनाची ओढ लागल्यावर तो खरं दर्शन देतो. पवित्र सरितांमध्ये भक्तियुक्त अंत:करणाने स्नान केले की पापांचा लय करतो. जलाच्या अभिषेकाने मनाला थंडावा लाभतो. म्हणूनच पायी वारी करण्याची परंपरा माऊलींनी जतन केली. सर्वसमावेशक, साधी, सात्त्विक अशी वारी स्वत: संतांनी करून सामान्य लोकांसमोर आदर्श प्रस्थापित केला.

 

दत्तसंप्रदायातील थोर संत प. पू. विष्णुदासमहाराज काशीक्षेत्रापासून, विदर्भातील भांबेरी स्थानापर्यंत पायी आले. त्यामुळेच आज भांबेरी हे शुभस्पंदनांनी भरलेलं तीर्थक्षेत्र निर्माण झालं. शेकडो भक्त या क्षेत्री येऊन साधना करतात. त्याचप्रमाणे प. प. वासुदेवानंद सरस्वतीस्वामींनी पायीच संपूर्ण भारतभर तीर्थयात्रा केल्या. गोदावरी, वैनगंगा, कृष्णाकाठी वास्तव्य करून जलयात्रा, साधना करून लोकांना देह कष्टवून यात्रा करण्याचे महत्त्व अधोरेखित करून सांगितले. त्यांच्यासमवेत यात्रा करणाऱ्यांना समाधान, शांती आणि पुण्याचा लाभ झाला. समर्थ रामदास स्वामींनीदेखील एक तप पायी तीर्थयात्रा करून सर्वत्र भ्रमण केलं. प्राचीन काळापासून ते आतापर्यंत समस्त संतांनी देहाला कष्ट देऊन यात्रा केल्या. त्यामुळे देव श्रेष्ठ असल्याची जाणीव तीव्र झाली. ‘मी’पणा संपून आम्ही, आपण आणि विश्व हा विशाल भाव रूजण्यास साहाय्य झाले. देवाचे श्रेष्ठत्त्व जाणवल्यावर देहाचे महत्त्व आपोआप संपून जाते. गर्व, अहंकार अत्यंत त्रस्त करणारा असतो. यात्रेचे फलित प्राप्त होण्यामध्ये बाधा आणणारा हा अहंकार वाईट असतो. सगळी साधना वाया जाण्याचा धोका अहंकरामुळे उद्भवतो. देवाच्या द्वारी ‘मी’ कोणीतरी मोठा आहे, हा भाव देवापर्यंत पोहोचू देत नाही. ‘दास्य’भाव रूजण्यासाठी तीर्थयात्रा करायच्या असतात. देव, ईश्वर, परमेश्वर यांच्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. परमात्मा परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे आणि त्याचे स्थान सर्वोच्चआहे, हे आकलन होण्यासाठी तीर्थयात्रा साधेपणाने करणे अत्यावश्यक आहे. त्याची श्रीमंती, वैभव, संपन्नता जाणवली की, जीवनातमनाच्या श्रीमंतीचा लाभ होतो. मनाचे दारिद्—य नष्ट होतं. मन भक्तीने, श्रद्धेने वैभवशाली होतं. मनाचे रोग दूर होतात. सावधपणा आला की विवेकाचे वैभव झळाळते. वैराग्याचे तेज संपूर्ण मनात, जीवनात पसरते. ते अलौकिक तेज मनाला सुदृढता, सतेजता प्रदान करते. मग देहभान केव्हाचे नष्ट होतेआणि देवभाव जागृत होऊन स्थिर होतो.हेच साध्य करण्यासाठी तीर्थयात्रेचे प्रयोजन असते. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या यात्रा आजच्या कलियुगातदेखील परमार्थप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. देवभावाच्या स्निग्ध प्रकाशानं मनामनाचा गाभारा उजळून जाईल, यात शंका नाही. म्हणूनचं शुभ्र, शांत आणि पवित्र अशा हिमालयाची हिमशिखरं समस्त साधकांना साद घालतात.

 

- कौमुदी गोडबोले

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat