राज्यात शेवटच्या टप्प्यामध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान

    दिनांक  29-Apr-2019
 


चार टप्प्यात एकूण सरासरी ६०.६८ टक्के मतदान

मुंबई : महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यांतील मतदान आज शांततेत पार पडले. अशा रितीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व ४८ जागांसाठी मतदानाचा कार्यक्रम सुरळीतपणे पुर्ण झाला. आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये १७ लोकसभा मतदरासंघांकरिता अंदाजे ५७ टक्के इतके मतदान झाले असून राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी ६०.६८ टक्के इतके मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये एकूण ८ कोटी ८५ लाख ६४ हजार ९८ इतक्या मतदारांपैकी ५ कोटी ३७ लाख ४१ हजार २०४ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी दिली. राज्यात चारही टप्प्यात वाढते तापमान असतानाही मतदारांचा उत्साह दिसून आल्याचे कुमार यांनी सांगितले.

सन २०१४ च्या तुलनेत विचार केल्यास मतदानाचे प्रमाण सारखेच राहीले असल्याचे श्री. अश्वनी कुमार यांनी यावेळी सांगितले. मंत्रालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, आबासाहेब कवळे उपस्थित होते. कुमार म्हणाले, "पहिल्या टप्प्यात ७ मतदारसंघासाठी ६३.४६ टक्के, दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघांसाठी ६२.८८ टक्के, तिसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांसाठी ६२.३६ टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील १७ मतदारसंघांमध्ये अंदाजे ५७ टक्के मतदान झाले आहे."

 

चौथ्या टप्प्यातील मतदारसंघ निहाय सायंकाळी ६ वाजेपर्यंतची अंदाजीत मतदानाची टक्केवारी अशी नंदुरबार - ६७.६४ टक्के, धुळे - ५७.२९ टक्के, दिंडोरी ६४.२४ टक्के, नाशिक - ५५.४१ टक्के, पालघर - ६४.०९ टक्के, भिवंडी ५३.६८ टक्के, कल्याण ४४.२७ टक्के, ठाणे ४९.९५ टक्के, मुंबई उत्तर ५९.३२ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम ५४.७१ टक्के, मुंबई उत्तर पूर्व -५६.३१ टक्के, मुंबई उत्तर मध्य - ५२.८४ टक्के, मुंबई दक्षिण मध्य ५५.३५ टक्के, मुंबई दक्षिण ५२.१५ टक्के, मावळ ५९.१२ टक्के, शिरुर -५९.५५ टक्के आणि शिर्डी ६६.४२ टक्के.

 

चौथ्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या वेळेस ११६५ बीयू तर ७३२ सीयू आणि २ हजार ४६७ व्हीव्हीपॅट बदलण्यात आले. आतापर्यंत सी व्हीजील ॲपवर ३ हजार ९९१ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी २ हजार २३१ तक्रारी योग्य असल्याने त्यावर कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर मतदार यादीत नाव शोधण्यासाठी सुमारे १ कोटी ९९ लाख हिटस् झाल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

 

अश्वनी कुमार म्हणाले की, सन २०१९ या वर्षी होणारी निवडणूक विचारात घेऊन जानेवारी, २०१८ पासून मतदार यादी शुद्ध व अद्ययावत (Pure & Update) करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले आहेत. मतदारांमध्ये जागृती निर्माण करणे आणि त्यांचा सहभाग वाढविणे याकरिता स्वीप (SVEEP) अंतर्गत विविध उपक्रम हाती घेण्यात आले. त्याचा चांगला परिणाम झाला.

 

महाराष्ट्रात चारही टप्प्यात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये सांगताना श्री. कुमार म्हणाले की, कडक उन्हाळ्याचे दिवस असूनही मतदानाच्या सर्वच टप्प्यांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीज यांनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले. शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही मतदानाचे प्रमाण चांगले राहीले. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे ७१.९८ टक्के इतके मतदान झाले तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी ४४.२७ टक्के मतदान झाले, असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे ७ लाख ४९ हजार ३७४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे १ लाख ४ हजार पोलीसांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण सुमारे साडे आठ लाख कर्मचारी या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आले होते. यावेळी राज्यामध्ये प्रथमच प्रत्येक मतदान केंद्रावर इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला. त्याकरिता एकूण १ लाख ८५ हजार ८५० (बीयू), लाख १७ हजार १३९ (सीयू) आणि १ लाख २३ हजार २०६ व्हीव्हीपॅट वापरण्यात आले.

 

आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण रुपये ५३ कोटी आठ लाख रोख रक्कम, ७० कोटी १२ लाख किमतीचे सोने, ३४ कोटी १५ लाख रकमेचे मद्य व मादक पदार्थ असे एकूण १५७ कोटी ५४ लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यासंदर्भात १७ हजार ५८८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 


सायंकाळी सहा वाजेपर्यंत राज्यातील मतदानाची आकडेवारी*

नंदुरबार : ६०.२७ टक्के

धुळे : ५१.१५ टक्के

दिंडोरी : ५७.९० टक्के

नाशिक : ५२.४५ टक्के

पालघर : ५६.९६ टक्के

भिवंडी : ५०.९५ टक्के

कल्याण : ४५.५६ टक्के

ठाणे : ४८.५६ टक्के

मुंबई उत्तर : ५४.७२ टक्के

मुंबई उत्तर मध्य : ४७.११ टक्के

मुंबई दक्षिण : ४७.९६ टक्के

मावळ : ५१.३५ टक्के

शिरूर : ५१.२५ टक्के

शिर्डी : ५५.२० टक्के

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat