संघर्ष जन्मानंतरचा...

    दिनांक  29-Apr-2019   संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका हिंदू पिता व मुस्लीम मातेच्या नऊ महिन्यांच्या मुलीला नियम बदलून जन्मप्रमाणपत्र दिले आणि जगभरात हा चर्चेचा विषय झाला.


‘मातृत्व’ आणि ‘पितृत्व’ हा सर्वच विवाहितांच्या जीवनातला उत्कटचा क्षण. बाळाला जन्म दिला की, सर्वाधिक आनंद जसा जन्मदात्यांना होतो, तसाच घरातल्या सदस्यांनाही होतो. घरात वा रुग्णालयात अथवा कुठेही बाळाचा जन्म झाला की, त्याच्या जन्माची नोंदणी करावी लागते किंवा जन्मनोंदणी करून घेणे गरजेचे असते. जन्मप्रमाणपत्र मिळाले की, जन्मलेले बाळ घरातल्याप्रमाणेच देशाचेही सदस्य होते. जन्मप्रमाणपत्र बाळाच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक असते. भारतात वय ठरवण्यासाठी, शाळा प्रवेशासाठी, मतदान ओळखपत्रासाठी, पॅनकार्ड काढण्यासाठी आणि नोकरीसाठीही जन्मप्रमाणपत्र महत्त्वाचे ठरते. परंतु, बाळाचे जन्मप्रमाणपत्रच मिळाले नाही तर? किंवा बाळाचे जन्मप्रमाणपत्र द्यायला प्रशासनाने, सरकारने नकार दिला तर? नुकसानच होणार ना! बाळाचे भविष्य संकटातच सापडणार ना! असाच प्रकार घडला तो संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईमध्ये! मुस्लीम राष्ट्र असल्याने हा प्रकार झाला, तर बघूया नेमके काय घडले!

 

संयुक्त अरब अमिरातीमध्ये एका हिंदू पिता व मुस्लीम मातेच्या नऊ महिन्यांच्या मुलीला नियम बदलून जन्मप्रमाणपत्र दिले आणि जगभरात हा चर्चेचा विषय झाला. संयुक्त अरब अमिरातीत लागू असलेल्या कायद्यांमुळे तिथे मुस्लीम पुरुष बिगर मुस्लीम महिलांशी विवाह करू शकतात. परंतु, मुस्लीम महिला बिगर मुस्लीम पुरुषांशी विवाह करू शकत नाहीत. तशी परवानगीच युएईचा कायदा देत नाही. परिणामी, अशा दाम्पत्यांची पुढेही फरफटच होते. आताचे जे प्रकरण आहे, तेदेखील असेच आणि त्याचा भारताशीही संबंध आहे अन् या दाम्पत्याच्या लढ्यामुळेच संयुक्त अरब अमिरातीला आपला कायदा बदलावा लागला, नियम बदलावा लागला.

 

शारजाहमध्ये राहणार्‍या किरण बाबू आणि सनम साबू सिद्दीकी यांचा २०१६ साली केरळमध्ये विवाह झाला. किरण हिंदू, तर सनम मुस्लीम. त्यामुळे युएईच्या कायद्याप्रमाणे हा विवाहही अडचणीत सापडला. २०१८ साली या दाम्पत्यापुढे संकट उभे ठाकले, ज्यावेळी त्यांची मुलगी अनाम्ता एसीलीन किरणचा जन्म झाला. किरण बाबू यांच्या मते, त्यांच्याकडे अबुधाबीचा व्हिसा आहे. तसेच विमाही उतरलवलेले आहे. किरण यांनी प्रसुतीवेळी पत्नीला ‘मेडिओर २४ु७’ रुग्णालयात दाखल केले. सनम यांची वेळेवर प्रसुती होऊन त्यांनी एका मुलीला जन्म दिला. परंतु, मुलीचे जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जेव्हा त्यांनी संबंधित विभागात संपर्क केला, तेव्हा त्यांना धक्काच बसला. “तुम्ही हिंदू आहात, त्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र देऊ शकत नाहीत,” असे उत्तर किरण बाबू यांना ऐकावे लागले.

 

इथूनच किरण बाबू, सनम साबू आणि लहानग्या अनाम्ताचाही संघर्ष सुरू झाला, जन्मप्रमाणपत्र मिळवण्याचा. किरणबाबूंनी न्यायालयात ‘ना हरकत’ प्रमाणपत्रासाठी याचिका दाखल केली, चार महिने सुनावणीही झाली. परंतु, नंतर मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. तेव्हापासून त्यांच्याकडे मुलीच्या जन्माचे कोणतेही कायदेशीर दस्तावेज नव्हते. म्हणजेच अनाम्ता नोंदणीशिवायच राहिली. दरम्यानच्याच काळात संयुक्त अरब अमिरातीने २०१९ ला ‘इयर ऑफ टॉलरन्स’ म्हणजेच ‘सहिष्णुता वर्ष’ म्हणून घोषित केले. सहिष्णुता वर्षाचा उद्देश विभिन्न संस्कृतींदरम्यान उत्तम ताळमेळ स्थापन व्हावा आणि लोकांमध्ये परस्परांत स्वीकारार्हता वाढावी, हा आहे.

 

दुसरीकडे जन्माचे दस्तावेज नसल्याने किरण आणि सनम हे दाम्पत्य तणावाखाली होते. तेव्हाच युएईतील भारतीय दूतावासाने त्यांना एक आऊटपास देण्यासाठी मदत केली. दूतावासातील एम. राजामुरुगन यांनीही त्यांना सहकार्य केले. तरीही मुलीला इमिग्रेशन क्लीअरन्स मिळालेच नाही. कारण, तिचा जन्म झाल्याच्या पुरावा म्हणून नोंदणी क्रमांकच नव्हता! मग पुन्हा झगडा सुरू झाला आणि अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश आले. युएईच्या ज्युडिशियल डिपार्टमेंटने अनाम्ताच्या प्रकरणाला अपवाद म्हणून दाखल करून घेतले. सोबतच या दाम्पत्याने युएईच्या आरोग्य मंत्रालयाला पत्रही लिहिले. मुख्य न्यायाधीशांनीदेखील जन्म प्रमाणपत्रासाठी अनुमती दिली. शेवटी १४ एप्रिल रोजी किरण बाबूंना आपल्या कन्येचे जन्म प्रमाणपत्र मिळाले. आजपर्यंत युएईचे कायदे बदलण्याची कोणी कल्पनाही करत नसे, पण तो विक्रम या भारतीय दाम्पत्याने करून दाखवला. म्हणूनच युएईसह, सोशल मीडियातही या निर्णयाला क्रांतिकारक म्हटले जात आहे. जन्मप्रमाणपत्र मिळाल्यावर किरण बाबू यांनी भारतीय दूतावासाचेही आभार मानले आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat