कष्टाच्या जगण्याला बळ संस्काराचे

    दिनांक  29-Apr-2019   
सामान्य जीणे जगताना आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणे हेसुद्धा माणूसपणच आहे. हे माणूसपण अनुभवसंपन्न असते. असे माणूसपण लाभलेले रघुनाथ काळे.

 

माणसाच्या यशाचा मापदंड काय असावा? खूप प्रसिद्धी मिळवणे की खूप पैसे मिळवणे? खरे म्हटले तर यापलीकडे जाऊन परिस्थितीवर मात करणे हे माणूसपण आहे आणि ते त्याच्या यशाचे मापदंड आहे. हे माणूसपण रघुनाथ काळे यांना लाभले. मूळ साताऱ्याच्या पांडेवाडीतीलबाळा काळे, गोजाबाई काळे हे कुटुंब मुंबईत १९४१ साली आले. कारण, गावात शेती होती. पण, बाळा यांना पारंपरिक व्यवसायामध्ये विशेष प्राविण्य होते. ते उत्तम प्रतीचे बूट बांधू शकत होते. बूट बांधणे म्हणजे बूट तयार करणे. चप्पल-बूट तयार करणे, शिवणे या कलेत बाळा यांचा हात कोणी धरू शकत नव्हते. त्यामुळे शेतीभातीमध्ये त्यांना इतका रस नव्हता. मुंबईमध्ये बूट-चप्पल शिवण्या-बांधण्याचा व्यवसाय करू, मुंबईमध्ये संसाराचा गाडा चालवू, असे बाळा आणि गोजाबाई दोघांनाही वाटले. गोजाबाईही भारी कष्टाळू. गावातराहताना किरची मिरची साठवून तिने त्याकाळी १०० रुपये साठवले होते. मुंबईला आल्यावर दादर-नायगावच्या केशरबागेत त्या पैशांमधूनच भलेमोठे घर घेतले.

 

मुंबईत राहण्याची सोय झाली. तो काळ इंग्रजांचाच होता. त्यावेळी रघुनाथ लहानच होते. वडील इंग्रजांच्या बंगल्यांमध्ये जात, त्यांना नवीन बूट तयार करून देत. त्यावेळी महिन्याला दहा रुपये मिळणेही मोठी गोष्ट होती. घरी चार मुलं. त्यांच्या राहण्या-खाण्याचा खर्च बाळा यांच्या पैशांतून भागतच नसे. मग गोजाबाई रात्री घरातून जेवून निघत. कल्याणला जाऊन तेथून भाजी आणि मोसमाप्रमाणे विविध गोष्टी विकत घेत. रात्री शेवटच्या गाडीने दादरला परत येत. तात्पर्य, कष्ट करायचे ते दोन वेळची भाकरी खाण्यासाठी आणि दोन वेळची भाकरी खायची ती अपरिमीत कष्ट करण्यासाठी, असेच जगणे. या जगण्याला दुसरे कोणतेही वळण नव्हते. आई-वडिलांचे कष्ट उघड्या डोळ्यांनी आणि मनाने पाहत रघुनाथ वाढत होते. पण, जसजसे कळू लागले तसे तेही आईसोबत भाजीफळे विकण्याचा धंदा करू लागले. कष्टाशिवाय पर्याय नाही आणि जगणे नाही, हा धडा रघुनाथ यांना मिळाला. स्वत:चे असे मोकळे जगणे असते, याचे भान मात्र त्यांना एकदा आले.

 

या परिसराच्या बाजूला नेहमी काही मुले खेळत असत, गाणी गात असत. खेळ शिकवणाऱ्या शिक्षकांनी मात्र एकदा रघुनाथना थांबवले आणि प्रेमाने म्हणाले, “ये खेळायला.” ते शिक्षक होते, नारायण देवस्थळी. तेथील विविध खेळ, गाणी, गोष्टी यामुळे रघुनाथ हरखून गेले. त्यांच्या वागण्या-बोलण्यात फरक पडला. जातीव्यवस्थेच्या उतरंडीत आणि आर्थिक गणिताच्या उतरंडीत मागास म्हणून जन्मलेले रघुनाथ होते मात्र हुशार. ते म्हणतात, “मला कधी कळलेच नाही आणि जाणवलेही नाही की, मी अमूक एक जातीचा आहे आणि त्यामुळे माझ्याशी कोणी विषम वागले. उलट शाळेत असताना साठे नावाच्या शिक्षिका माझी गणित विषयाची आवड पाहून मला मधल्या सुट्टीतही गणित शिकवत. तसेच कामत नावाचे एक संघशिक्षक होते. त्यांनी आयुष्याच्या विविध वळणांवर पालकासारखे मार्गदर्शन केले. ”

 

रघुनाथ महाविद्यालयामध्ये शिकत असतानाही आईबरोबर भाजी-फळांच्या पाट्या घेऊन बाजारात जात. बारावीच्या परीक्षेचा पेपर सकाळी ११ वाजत होता. त्या दिवशी बाजारात जांभळे विकायची होती. नायगावहून भोईवाड्याला पायी चालत ती जांभळाची पाटी घेऊन आणि खिशात पेन-पेन्सिल घेऊन रघुनाथ चालू लागले. आई भोईवाड्याला होती. रघुनाथ यांनी ती पाटी खाली ठेवली आणि त्यांना जाणवले की, सगळे अंग कपडे जांभळाच्या रसाने जांभळे झाले होते. पण पेपर लिहिणे गरजेचे होते. परीक्षा झाली आणि निकाल लागला. ‘त्या’ पेपरमध्ये रघुनाथना ५० पैकी ४८ गुण मिळाले.

 

पुढे त्यांनी रा. स्व. संघाचे तृतीय वर्ष शिक्षण घेतले. संघाची गोडी लागण्याचे कारणही तसेच होते. घरी सत्यनारायणाची पूजा होती. शाखेतील सर्वचजण घरी आले आणि हक्काने जेवले. त्यावेळी आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. तिच्या मते, बामणाची पोरं आपल्या घरी जेवली. माणसांमध्ये जातीचा गरिबी-श्रीमंतीचा भेद न करणाऱ्या लोकांमध्ये माझा रघू जातो. त्यामुळेच की काय रेल्वेमध्ये मुख्य वाणिज्य अधिक मुंबई या वरिष्ठ पदावर असतानाही ते संघशिक्षा वर्गाला जात होते. दरवर्षी २१ दिवसांची रजा घ्यायची आणि जायचे संघवर्गाला, हा त्यांचा वार्षिक क्रमच. त्यावेळी आणीबाणी लादणाऱ्यांचे सरकार होते. त्यामुळेच की काय, जातीचे प्रमाणपत्रअसूनही रघुनाथ यांना नोकरी लागण्याच्या १८ वर्षांनी बढती मिळाली.

 

आता त्यांचे वय ७८ वर्षे आहे. पण, संघशाखेत मनात निर्माण झालेलीखेळाची आवड आजही त्यांच्यामध्ये जशीच्या तशी आहे. या वयातही शाळेतल्या मुलांना ते आवडीने खेळ शिकवतात. विक्रोळी परिसरातील संस्कार केंद्रामध्ये संस्कारवर्ग घेतात. कर्जतच्या अभिनव शाळेत आठवड्यातून एकदा जातात. तिथेही मुलांना टेबल टेनिस खेळण्यास शिकवतात. विक्रोळी ते कर्जत प्रवास करताना या तरुणाच्या मनात एकच नाद असतो, मी समाजाचे देणे लागतो, मला ऋण फेडायला हवे. आज परिसरातील विविध सामाजिक संघटनांचे स्वीकृत सल्लागार म्हणून रघुनाथ यांना मान आहे. वयाच्या या टप्प्यावरही ते बिलकूल थकले नाहीत ना मनाने ना बुद्धीने.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat