'दोहन' आणि 'शोषण'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Apr-2019   
Total Views |वरील उदाहरणांमधून अर्थतज्ज्ञ हर्मन डॅले यांनी सांगितलेले पहिले तत्त्व सिद्ध होते - 'पुनर्नवीकरणीय संसाधनांच्या वापराचा वेग त्याच्या पैदाशीच्या वेगापेक्षा जास्त नसावा.' उत्तर कन्नडच्या संदर्भात स्थानिक लोकांकडून जी बांबूची तोड होत होती, ते निसर्गाचे 'दोहन' होते; तर कागद कारखान्यांकडून जी बांबूची तोड झाली ते निसर्गाचे शोषण होते.


'शाश्वत विकास' या शब्दांची व्याख्याच अशी आहे की, पुढील पिढ्यांच्या गरजांच्या पूर्ततेसाठी संसाधने अबाधित ठेवून वर्तमानकालीन गरज भागवणे. अर्थशास्त्रामध्ये 'Exploitation of Resources' हा शब्दप्रयोग सर्रास केला जातो. 'Exploitation'चा शब्दश: अर्थ होतो 'शोषण.' त्या अर्थाने अर्थशास्त्राचा अर्थ 'संसाधनांचे शोषण करण्याचे शास्त्र' असा होतो. 'शोषण' म्हणजे 'कधीतरी ते संसाधन संपेल' याची कसलीही पर्वा न करता त्या संसाधनाचा उपयोग घेणे. गेल्या अडीचशे वर्षांमध्ये जो काही आर्थिक विकास झाला तो निसर्गाच्या शोषणावर आधारित आहे. संसाधनाच्या उपलब्धतेचा शोध घेणे, ते संसाधन वापरणे, ते संपत आले की त्याला पर्याय शोधणे अशा रेषीय गतीने संसाधनांचा उपयोग सुरू आहे. 'दोहन' हा शब्द संसाधनांचा विवेकी वापर सूचित करतो. 'दोहन' म्हणजे निसर्गाची मर्यादा ओळखून संसाधनांची उपलब्धता संपुष्टात येणार नाही, अशा पद्धतीने उपयोग घेणे. याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे, आपण गाईचे दूध काढतो, तिच्या शेण-गोमुत्राचा वापर करतो पण, गाईला मारून टाकत नाही. गाईलाच मारून टाकणे हे झाले 'शोषण.' गाय जीवंत ठेवून तिचे दूध काढून घेणे, हे झाले 'दोहन.' शाश्वत विकासाने निसर्गाचे, निसर्गातल्या संसाधनांचे दोहन अपेक्षित आहे. शाश्वत विकासासाठी संसाधनांचा वापर करण्यासंबंधी अर्थशास्त्रज्ञ हर्मन डॅले सुचवतोकी,

 

. पुनर्नवीकरणीय स्रोतांच्या वापराचा दर हा त्यांच्या पैदाशीच्या दरापेक्षा जास्त नसावा.

 

. पर्यावरणाच्या शोषणशक्तीपेक्षा जास्त टाकावू पदार्थ पर्यावरणात सोडू नयेत.

 

. पुनर्नवीकरणीय पर्यायी स्रोत तयार होण्याच्या दरापेक्षा अधिक दराने अपुनर्नवीकरणीय स्रोतांचा वापर केला जाऊ नये.

 

वरील तीनही उदाहरणांमध्ये 'संसाधनाचा मर्यादित वापर' म्हणजेच 'निसर्गाचे दोहन' हेच मूळ तत्त्व सांगितले आहे. थोडक्यात 'Fixed Deposit' तसेच ठेवून त्यावरचे व्याज तेवढे काढून घ्यायचे. संसाधनाचा अतिरेकी वापर हा संसाधन आणि जैवविविधता विनाशाला कसा कारणीभूत ठरतो, याचे बोलके उदाहरण म्हणजे उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या 'बांबू' या नैसर्गिक संसाधनाचा झालेला विनाश. डॉ. माधव गाडगीळ यांनी केलेला हा संशोधनात्मक अभ्यास, माणूस आणि निसर्गाच्या आंतरसंबंधाचा अभ्यास करण्यासाठी एक चपखल उदाहरण म्हणून समोर ठेवला जातो. उत्तर कन्नड हा कर्नाटक राज्यातला पश्चिम घाटाच्या डोंगर साखळीच्या मध्याजवळ वसलेला एक जिल्हा. दुसऱ्या महायुद्धापूर्वी इथे घनदाट जंगल आणि विरळ लोकवस्ती होती. या भागात मलेरियाचे प्राबल्य खूप होते. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी डीडीटी (डायक्लोरो डायफेनिल ट्रायक्लोरो इथेन)चा शोध लागला व भारतात मलेरियाच्या उच्चाटनासाठी मोठ्या प्रमाणावर डीडीटीचा वापर केला जाऊ लागला. त्यामुळे उत्तर कन्नडमधून मलेरियाचे बऱ्यापैकी उच्चाटन झाले. त्यानंतर त्या भागात गवळी लोकांची वस्ती वाढली. उत्तर कन्नडच्या जंगलात राहणारेगवळी लोक, बांबूच्या टोपल्या विणणारे व इतर स्थानिक लोक यांच्यासाठी 'बांबू' हे एक महत्त्वाचे संसाधन होते. घरबांधणीसाठी तसेच विविध वस्तू तयार करण्यासाठी बांबू वापरला जात असे. दुष्काळी काळात बांबूची पाने गुरांना चारा म्हणून उपयोगी पडते.उत्तर कन्नड जिल्ह्यातील बांबूच्या प्रमुख जातींमध्ये बांबूच्या तळाशी एक नैसर्गिक काटेरी आच्छादन आपोआप तयार होते. गवळी व इतर स्थानिक लोकांना हे ज्ञान होते की, बांबूच्या कोवळ्या फुटव्यांचे साळींदरे, माकडे, डुकरे व गुरे यांपासून रक्षण करण्यासाठी आवरण महत्त्वाचे आहे. म्हणूनच स्थानिक लोक बांबू तोडताना या काटेरी आवरणाच्या वरपर्यंतच बांबू तोडून आवरण शिल्लक ठेवतात, जेणेकरून नवीन येणारे फुटवे सुरक्षित राहावेत. यामुळे बांबूचे उत्पादन हे शाश्वत स्थितीत राहत होते.

 

१९५०-६०च्या दशकात भारतातऔद्योगिकरणाने वेग घेतला. उत्तर कन्नडातला मलेरियाचा त्रास दूर झाल्यावर इथे मँगनीजच्या खाणी व कागद कारखाने सुरू झाले. हे कारखाने आधुनिक तंत्रज्ञानाने बांबूची तोड करू लागले. कारखान्यांना या संदर्भातले ज्ञान काळजीपूर्वक केलेल्या शास्त्रीय अभ्यासावर आधारित नव्हते, तर कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवणे ही त्यामागची प्रेरणा होती. बांबूच्या तळाशी असलेल्या नैसर्गिक काटेरी आवरणाचीनैसर्गिक भूमिका समजावून न घेता कारखान्यांनी त्याकडे एक त्रास म्हणून पाहिले आणि कामगार लावून हे आवरणकाढून टाकले. त्याचा परिणाम म्हणून बांबूचे कोवळे कोंब उघडे पडले व त्यांचा जनावरांकडून नाश झाला. यामुळे बांबूचे उत्पादन झपाट्याने घटले. थोड्याच काळात कागद कारखान्यांना होणारा बांबूचा पुरवठा संपुष्टात आला. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटातून उत्तर कन्नडात स्थलांतरीत झालेल्या गुराख्यांची म्हणजेच गवळी समाजाची सुरुवातीच्या काळात खूप भरभराट झाली. मात्र, जसजशीतिथे गवळी समाजाच्या संख्येत आणि गुरांच्या संख्येत वाढ झाली तसतशी तिथे अतिप्रमाणात गुरेचराई होऊन गवळी समाजाच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक असणाऱ्या वनोपजांमध्ये लक्षणीय घट झाली. वरील उदाहरणांमधून अर्थतज्ज्ञ हर्मन डॅले यांनी सांगितलेले पहिले तत्त्व सिद्ध होते- 'पुनर्नवीकरणीय संसाधनांच्या वापराचावेग त्याच्या पैदाशीच्या वेगापेक्षा जास्त नसावा.'उत्तर कन्नडच्या संदर्भात स्थानिक लोकांकडून जी बांबूची तोड होत होती, ते निसर्गाचे 'दोहन' होते; तर कागद कारखान्यांकडून जी बांबूची तोड झाली ते निसर्गाचे शोषण होते. कोकणात हापूस आंब्याच्या लागवडीचे वारे जोपर्यंत नव्हते, तोपर्यंत होणारी वृक्षतोड ही 'दोहन' या प्रकारात मोडत होती. घरबांधणीसाठी आवश्यक तेवढीच जंगली झाडे तोडली जायची. हापूस आंब्याच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात निर्वनीकरण झाले. शिवाय हापूस आंब्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी खोक्यांसाठी प्रचंड प्रमाणावर जंगली झाडे तोडण्यात आली. निसर्गाचे 'शोषण' व्हायला लागले. सध्या कोकणात शहरीकरणाचे वारे वाहू लागल्यामुळे बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर चिरेखाणींमधून उपसला जाणारा चिरा हे निसर्गाचे 'शोषण'च आहे.

 

दोहनांची मर्यादा ओलांडून 'शोषण' होण्यास कारणीभूत ठरते ते तंत्रज्ञान. पूर्वी माणसांकडून नैसर्गिक संसाधनांचा मर्यादित वापर होत होता. कारण, माणसांच्या क्षमतांनाच मर्यादा होती. आज तंत्रज्ञानामुळे संसाधनांचा वापर सहजसोपा झाल्याने त्याचा वेग प्रचंड वाढला आहे. पूर्वी रहाटाने पाणी काढावे लागत असल्याने आपोआपच शरीराला झेपेल इतकेच पाणी विहिरीतून काढले जायचे. आता 'पंप' नावाचे तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यामुळे एक बटण दाबले की हवे तितके पाणी उपसता येते. पूर्वी नुसत्या कुर्‍हाडीने झाडे तोडली जायची तेव्हा एक झाड तोडायला एक अख्खा दिवस लागायचा. आता जेसीबी लावून काही एकरांवरचे जंगल काही तासांत जमीनदोस्त करता येते. अशाप्रकारे पूर्वीचे उद्योग आणि लोकजीवन हे मानवी श्रमांवर आधारित असल्याने संसाधनांच्या वापराचा वेग कमी होता. आज तंत्रज्ञानामुळे हा वेग वाढल्याने संसाधनांचा उपभोग हा शाश्वत राहिलेला नाही. साध्या गळाने केलेली मासेमारी ही शाश्वत आहे. कारण, मासेमारीचा दर हा माशांच्या प्रजनन दरापेक्षा कमी आहे. मात्र, 'पर्ससीन नेट' वा तत्सम आधुनिक साधनांनी केलेली मासेमारी ही प्रजनन दरापेक्षा जास्त वेगाने होत असल्याने अशाश्वत ठरते. 'दोहना'ची मर्यादा ओलांडून संसाधनांचे शोषण होण्यास तंत्रज्ञान कारणीभूत आहे. अशावेळी संसाधनांच्या वापरासाठी उपभोगाबाबत कायदेशीर निर्बंध आवश्यक ठरतात. माणसाच्या उपभोगवादावर आणि इच्छा-आकांक्षांवर 'विवेका'चा लगाम आवश्यक ठरतो. 'वनहक्क सुधारणा कायदा २००६' नुसार वनवासींना गौण वनोपजांवर म्हणजेच मोहाची फुले, मध, डिंक यांवर सामूहिक हक्क दिले गेले आहेत. या हक्काद्वारे वनवासी लोक गौण वनोपजांचे उत्पादन आणि विक्री करू शकतात. मात्र, अख्खे झाड तोडायचे असेल, तर मात्र वनखात्याची परवानगी घ्यावी लागते. हेसुद्धा निसर्गाचे 'दोहन' करणाऱ्या व्यवस्थेचे एक उदाहरण आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@