पहिले पाऊल सोनेरी पदकाचे...

    दिनांक  29-Apr-2019   


 


अंगात ताप असतानादेखील 'भारताला सुवर्णपदक जिंकून द्यायचेच' या दृढनिश्चयाने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उतरलेल्या अमित पंघलबद्दल जाणून घेऊया...


मनात जिद्द आणि स्वप्न गाठण्याची प्रबळ इच्छा असेल, तर कुठलेही ध्येय साध्य करणे अवघड नसते. मग भले कितीही अडथळे येवोत. स्वप्नपूर्तीसमोर आजारपणही क्षुल्लक वाटते. याचीच प्रचिती काही दिवसांपूर्वी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या निमित्ताने आली. भारताच्या ५.९ फूट उंची असलेल्या अमित पंघलने ५२ किलो वजनी गटात या बॉक्सरने त्याच्याहून जास्त उंची असलेल्या प्रतिस्पर्ध्याला धूळ चारली आणि सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक ठरले आहे. अवघ्या २४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पदार्पणातच सुवर्णपदकाला गवसणी घालून त्याने बॉक्सिंग क्षेत्रात येणार्या नवीन तरुणांसमोर एक आदर्श ठेवला आहे. अंगात ताप असतानादेखील त्याने आत्मविश्वासासह बुद्धिचातुर्य आणि योग्य डावपेच वापरून प्रतिस्पर्धी इनक्यूला चीतपट केले.

 

अमितचा जन्म हरियाणामधील रोहतक जिल्ह्यातील मायना गावात झाला. त्याचे वडील विजेंद्र सिंग पंघल हे मायना गावातील सामान्य शेतकरी. त्याचा मोठा भाऊ अजय हा भारतीय लष्करामध्ये आहे. गरीबीमुळे बिकट परिस्थितीशी झगडत असतानाच त्याला लहानपणी आपल्या भावाकडून बॉक्सिंगचे बाळकडू मिळाले होते. त्याचा मोठा भाऊ अजय हादेखील एक हौशी बॉक्सर होता. भावापासून प्रेरणा घेऊन २००७मध्ये रोहतकमधील सर छोटुराम बॉक्सिंग अकादमीमध्ये प्रवेश घेतला. तिथून त्याचा बॉक्सिंगमधील खरा प्रवास सुरू झाला. शालेय जीवनात त्याने अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. २००९मध्ये त्याने औरंगाबाद येथे आयोजित केलेल्या २५व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावले. त्यानंतरही त्याने २०१०मध्ये चेन्नईत झालेल्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये तसेच, २०११ मध्ये पुणे येथे झालेल्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्येही रौप्यपदकांची कमाई केली. शालेय जीवनात त्याच्या या मिळणार्‍या यशाची कीर्ती त्याला पुढे राष्ट्रीय पातळीवर घेऊन गेली. २०१२मध्ये पटियाला येथे झालेल्या ४५व्या ज्युनिअर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अमितने हरियाणा राज्याचे प्रतिनिधीत्व केले. याचवर्षी विशाखापट्टणम येथे आयोजित डॉ. बी. आर. आंबेडकर ऑल-इंडिया मेन बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये स्वतःचे कौशल्य दाखवत आणखी एक सुवर्णपदक खिशात घातले. अमितने अनेक आंतर-विद्यापीठीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आणि अनेक राज्यस्तरीय चॅम्पियनशिपमध्ये त्याची सर्वोत्तम बॉक्सर म्हणून निवड केली.

 

अमितच्या या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी त्याला मिळाली. २०१७मध्ये त्याने राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला. यामध्ये पदार्पणातच त्याने सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर मे २०१७मध्ये ताश्कंद येथे झालेल्या 'आशियाई अमॅच्युअर बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१७'च्या लाईट फ्लायवेट श्रेणीमध्ये कांस्यपदक जिंकले. या कामगिरीवर तो 'एआयबीए वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०१७' स्पर्धेसाठी पात्र ठरला. मात्र, उपांत्यपूर्व फेरीमध्ये उझबेकिस्तानच्या हसनबॉय दसमतोवकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला. या झालेल्या पराभवापासून धडा घेत त्याने पुढेही बॉक्सिंगमधील त्याची वाटचाल चालूच ठेवली. भावाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत अमित पंघलही भारतीय लष्करात सहभागी झाला. वयाच्या २२ व्या वर्षी 'कनिष्ठ कमिशन अधिकारी' म्हणून त्याची भरती झाली. २०१८ हे वर्ष अमितच्या बॉक्सिंग कारकिर्दीमध्ये खास ठरले.

 

फेब्रुवारी २०१८मध्ये बल्गेरियातील सोफीया येथे झालेल्या 'स्ट्रॅन्झा कप'मध्ये अमितने सुवर्णपदकाची कमाई केली. या कामगिरीवर त्याची निवड राष्ट्रकुल स्पर्धा २०१८साठी करण्यात आली. या स्पर्धेमध्ये त्याने रौप्यपदक पटकावले. आशियाई स्पर्धेतीलत्याचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहून भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने 'अर्जुन पुरस्कारा'साठी अमितच्या नावाची शिफारस केली. फेब्रुवारी २०१९मध्ये सोफीया येथे झालेल्या 'स्ट्रॅन्झा कप'मध्ये सुवर्णपदक जिंकून सलग दुसर्‍यावर्षी सुवर्णपदक जिंकण्याची किमया अमितने करून दाखविली. त्यानंतर त्याने एप्रिलमध्ये चालू असलेल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्येही सुवर्णपदक स्वतःच्या नावावर केले. २०१७मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेमध्ये अमितने ४९ वजनी गटातून ५२ किलो वजनी गटात झेप घेतली होती. पहिल्यांदाच या गटात खेळत असतानादेखील अमितने सुवर्णपदक पटकावून भारतीय बॉक्सिंगपटूंसमोर आदर्श ठेवला आहे. विशेष म्हणजे, आदल्यादिवशी अंगात ताप असतानादेखील भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याखातर या पठ्ठ्याने आजाराला न जुमानता म्हणणे पूर्ण करून दाखवले. त्याच्या जिद्दीला सलाम आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat