तेरा वैभव अमर रहे माँ!

    दिनांक  28-Apr-2019   या देशात असहिष्णुता आहे, या देशात इतके वाईट चालले आहे, तितके खराब वातावरण आहे असे म्हणण्यात गेल्या पाच वर्षांत काही लोकांची अहमहमिका लागली होती. अर्थात यात तथाकथित राजकीय संबंधामुळे साहित्यिक वगैरे झालेले, वशिलेबाजी करून पुरस्कार प्राप्त झालेले लोकच होते, हे नक्की. या सगळ्या असंतुष्ट भुतावळीची आठवण झाली, कारण याचवेळी या देशाची सर्वतोपरी स्थिरता, देशाची सौहार्दशील, उद्यमशील सामूहिकता विचारात घेत २०० अमेरिकी कंपन्यानी चीनला सोडचिठ्ठी देत भारतात येण्याचे संकेत दिले आहेत. आता दिल्लीचे स्वयंघोषित राजकुमार, त्यांची बहीण, इथे महाराष्ट्रात अजाणता राजा, तसेच आता उरलो व्हिडिओपुरता असणारे राज ठाकरे, शोषित वंचितांचे स्वयंघोषित बिनकामाचे तारणहार प्रकाश आंबेडकर आणि हो, त्याचप्रमाणे मुस्लीम समाजाचे आपणच काय ते नेते, या गैरसमजात वावरणारे ओवेसी या सगळ्यांचे काय होणार? कारण गेली पाच वर्षे यांनी केवळ नसलेल्या किंवा असून उपयोगाच्या नसलेल्या अकलेचे तारे तोडले. या सर्वांच्या बोलण्यात एकसंघता होती, ती म्हणजे मोदींनी इतक्या परदेश वाऱ्या केल्या. काय झाले? कुठे आहे रोजगार? सांगा कुठे आहे रोजगार? देशाची प्रगती काही होत नाही वगैरे वगैरे... पण आता अमेरिकेच्या कंपन्यांनी चीन सोडून भारतामध्ये उद्योगनिर्मिती करायची आहे, असे संकेत दिले आहेत. पाच वर्षांत नोटाबंदी, जीएसटीमुळे आणि असिहष्णूतेमुळे देशात चिंतेचे वातावरण आहे, असे चित्र रंगविणाऱ्यांची थोबाडे यानिमित्ताने नक्कीच फुटतील. दुसरीकडे चीन नेहमीच आशियाई राष्ट्राच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरायचा प्रयत्न करायचा. साम, दाम, दंड, भेद वापरून इतर आशियाई देशांवर दबाव टाकायचा. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कंपन्यांनी चीनला झिडकारून भारताचा हात हातात घेतला आहे. उद्योगाला अनुकूल असलेला देश म्हणून जगभरात भारताची प्रतिमा निर्माण झाली तर त्याचवेळी चीनच्या व्यावसायिक धोरणाबद्दल जगात शंकेचा सूर उमटला आहे. मसूद अझहरला साथ देणाऱ्या चीनला भारताने काहीही न बोलता, करता चांगलीच चपराक दिली आहे. जगाच्या पटलावर भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या स्थिर सरकारचे अभिनंदन! अर्थात ‘हम दिन चार रहे ना रहे, तेरा वैभव अमर रहे माँ,’ म्हणणारेच हे करू शकतात.

 

लबाडा आवडे विकृती

 

मला उमेदवारी दिल्याने शिवराज सिंह घाबरले, उमा भारतींनीही निवडणूक लढवायला नकार दिला, शेवटी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची उमेदवारी जाहीर झाली. शिवराज सिंह, उमा भारती ज्यांना घाबरल्या, असे कोण बरं महान शूरवीर आहेत? असा प्रश्न पडला असेल तर तो प्रश्न मागे घ्या. कारण, असे वाटणारे दुसरे तिसरे कुणी नसून दिग्विजय सिंह आहेत. ज्यांच्या वाणीने, कर्माने आणि एकंदरच व्यक्तिमत्त्वाने काँग्रेसला गेल्या निवडणुकीमध्ये चांगलाच चमत्कार मिळवून दिला होता. जसे मनोरंजन म्हटले की, आपल्याकडे राज्यस्तरावर राज ठाकरे आठवतात. तसे केंद्र स्तरावर राष्ट्रीय दर्जाचा मनोकरंजनकार म्हणून दिग्विजय यांना फार मोठी मान्यता आहे. त्यांनी कोणताही शब्द उच्चारो, तो शब्द मनोरजंनाचे उच्चांक गाठतोच गाठतो. तरीही विरोधक त्यांच्या ‘टंच माल’ या शब्दावरच अडून असतात, हे विरोधकांचे दुर्दैव. विरोधकांना मुळी कलेची किंमतच नाही. त्यामुळे इतक्या उच्च कोटीच्या मनोरंजनकारास ते ज्येष्ठ, रंगिला वगैरेंच्या चौकटीत अडकवतात. वयानुसार आणि पदानुसार माणसाने मुळीच वागू नये, असा महान संदेश देत दिग्विजय सिंह जगत आहेत. त्यामुळे त्यांचे राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यही स्थळ-काळ-वेळ यांच्याशी अजिबात मॅच होत नाही. असो, दिग्विजय यांनाही अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे. संचारस्वातंत्र्य आहे. पण, या सगळ्या स्वातंत्र्याचा वापर वर्षानुवर्षे स्वतःच्या राजकीय लाभासाठी करणाऱ्या दिग्विजय यांच्याबद्दल मध्य प्रदेशातील जनतेला काय वाटत असेल? त्यांची विधाने नेहमीच बहुसंख्यकांच्या धार्मिकतेला टोचणारी असतात. ते म्हणाले की, “प्रज्ञासिंग ठाकूर यांनी मसूद अझहरला शाप द्यायचा होता, म्हणजे सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज पडली नसती.” मुळात प्रज्ञासिंह काय म्हणाल्या आणि त्याचा काय विपर्यास केला गेला, ही गोष्ट दूरची. पण या निमित्ताने दिग्विजय यांनी सर्जिकल स्ट्राईकची खिल्ली उडवली आहे. देशाचे जवान शीर तळहातावर घेऊन लढतात, मात्र दिग्विजय सिंगांना त्याबद्दलही विनोद वाटतो. समर्थ म्हणाले होते की, “टवाळा आवडे विनोद पण इथे म्हणणे लागू होते, लबाडा आवडे विकृती.” निधर्मीपणाच्या बुरख्याआड देशाच्या सन्माननीय घटकांचा अपमान करणाऱ्या विकृतांचे दिग्विजय सरसेनानी आहेत, हेच खरे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat