धनुर्धारी सुवर्णक्षणांचा...

    दिनांक  28-Apr-2019   


 


न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या ‘इनडोअर वर्ल्ड चॅम्पियनशीप’ स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक मिळवणाऱ्या लाभेश तेलीची कहाणी...

 

न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथे पार पडलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मुंबईकर लाभेश राजेंद्र तेलीची ख्याती आज जगभर पसरली आहे. नुकत्याच पार पडलेल्या ‘इनडोअर वर्ल्ड चॅम्पियनशीप’मध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत असून लाभेशला आता जागतिक स्तरावरील विविध तिरंदाजी स्पर्धांचे वेध लागले आहेत. आर्थिक परिस्थिती बिकट असूनही त्याच्यावर मात करत त्याने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. स्पर्धेनंतर विमानतळावर परतल्यावर कुटुंब, मित्रमंडळींनी त्याचे ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. यशोशिखरावर पोहोचल्यानंतरही त्याचे पाय जमिनीवर असल्याचे त्याच्या विचारांतून दिसून येते. या यशापर्यंत पोहोचण्याचे श्रेय तो आई-वडिलांना देतो. भारतात खेळाला अजूनही दुय्यम स्थान दिले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून जाऊन आता तो पुढे आशियाई आणि ऑलिम्पिक पदकांचे स्वप्न पाहतो आहे.

 

लाभेशचा जन्म ९ सप्टेंबर, १९९८ रोजी मुंबईतील जोगेश्वरीत झाला. लहानपणापासूनच खेळाची आवड असल्याने शाळेत तसेच आंतरशालेय क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेचे प्रतिनिधीत्व करत होता. अंधेरीतील सेंट झेव्हियर्स शाळेत त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले. फुटबॉल आणि क्रिकेटच्या विविध स्पर्धांमध्ये त्याने चांगले यश मिळवले. दहावीनंतर पुढील शिक्षणासाठी त्याने अंधेरीतील भवन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुढे बारावीनंतर काय, असा प्रश्न इतर मुलांप्रमाणे लाभेशलाही होता. पुढे मर्चंट नेव्हीसाठी जाण्याची तयारी त्याने सुरू केली. त्यासाठी महाड येथील नवयुग विद्यापीठ ट्रस्टमध्ये त्याने प्रवेश घेतला. खेळाची आवड असल्याने तिथे होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्येही तो सहभागी होऊ लागला. या ठिकाणी त्याचा परिचय तिरंदाजीशी झाली. या खेळाचा सराव करताना तो तासन्तास रमून जात असे. त्यातच एक कसोटीचा क्षण आला. मर्चंट नेव्ही की तिरंदाजी या दोहोंमध्ये निर्णय घेण्यास त्याच्या वडिलांनी सांगितले. लाभेशनेही वेळ न दवडता तिरंदाजीची भवितव्य घडवण्यासाठी निवड केली. लाभेशची मेहनत पाहून घरचेही त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यानंतर संपूर्ण लक्ष लाभेशने याच खेळावर केंद्रित केले. त्याने तीन वर्षांच्या अभ्यासक्रमातून दुसऱ्या वर्षी माघार घेतली. गेली तीन वर्षे तो खेळ उत्तमोत्तम खेळण्याचा प्रयत्न करत आहे. महाडच्या कोकण मर्चंट इन्स्टिट्यूटमधून त्याने प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. प्रशिक्षणासाठी धनुष्य घेण्यासाठी लाभेशला वर्षभर प्रतीक्षा करावी लागली.

 

भारतीय तिरंदाजी स्पर्धेतील धनुष्याची किंमत साधारणतः साडेआठ हजार रुपये इतकी असते. त्यामुळे लाभेशने वर्षभर इन्स्टिट्यूटच्या साहित्यावर सराव केला. त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्याने भारतीय स्पर्धांसाठी मान्यता असणारे साहित्य घेतले. मात्र, इथेच थांबून चालणार नव्हते. आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बाजी मारण्यासाठी विशेष साहित्याची आवश्यकता असते. त्याची किंमत जवळपास दीड लाखांपर्यंत असते. खेळासाठी साहित्य खरेदी करण्यातच मुळात लाभेशला अडचणी येत होत्या. मात्र, अखेर त्याला कुटुंबीयांनी पाठिंबा देत त्याचे आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीचे प्रमाणित धनुष्य आणि इतर साहित्य घेण्यास मदत केली. आता लक्ष्य होते, आंतरराष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा जिंकणे. यापूर्वी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये लाभेशने सात पदके कमावली आहेत. त्यात चार सुवर्ण, दोन कांस्य आणि एक रौप्यपदकांचा सामावेश आहे. आता स्पर्धा जगाशी होती. आव्हान कायम होते, पण त्यापूर्वी स्पर्धा होती ती परिस्थितीशी आणि वाटेत असणाऱ्या काट्यांशी...

 

न्यूझीलंडमध्ये जाण्याचा खर्च सुमारे ४ लाख, ६० हजार होता. सुरुवातीला काही परिचितांनी आम्ही मदत करू, असे आश्वासन दिल्याने लाभेशने काही रक्कम भरून उर्वरित रक्कम नंतर भरण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे लाभेशच्या कुटुंबीयांनी आधी ६० हजार रुपये भरले. मात्र, इतर पैशांची जुळवाजुळव करताना अडचणी येऊ लागल्या. अनेक सामाजिक ट्रस्ट, राजकीय कार्यालये, प्रतिष्ठीत व्यक्तींना भेटून त्याने मदतीसाठी याचना केली. परंतु, त्याच्या पदरात निराशाच पडली. हा खेळ बऱ्याच जणांना माहीत नव्हता. त्यामुळे लाभेशला हे सर्व सोडून नोकरी-धंदा करण्याचा सल्ला अनेकांनी दिला. साहाय्य मिळण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. मात्र, आपल्या मुलाचे प्रयत्न पाहून आई-वडील शांत बसले नाहीत. त्यांनी कमीत कमी वेळात आपल्याजवळ असलेली पुंजी तारण ठेवत उर्वरित रक्कमेचे कर्ज काढून लाभेशचे न्यूझीलंडला जाण्याचा खर्च जुळवला. लाभेशनेही आई-वडिलांनी दाखवलेल्या विश्वासाचे आणि मेहनतीचे चीज करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. संघर्षमय आणि कठीण पल्ला गाठूनही लाभेश खचलेला नाही. त्याने आता आशियाई आणि ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक मिळवण्याचे स्वप्न समोर ठेवले आहे. लाभेशला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा...!

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat