ड्रॅगनच्या नीतीमागे नेमके कारण काय?

    दिनांक  28-Apr-2019   आज भारताचे सक्षम असणारे परराष्ट्र धोरण, इस्लामिक देशांच्या व्यासपीठांवर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची असणारी उपस्थिती, आपल्या नैतिक सीमांचे उल्लंघन करणारी पाक नीती, महासत्तेसह जगातील प्रमुख देशांत आज वाढलेले भारताचे प्राबल्य, संरक्षण सामग्रीसह अंतराळाची सुरक्षा करण्याकरिता भारताने प्राप्त केलेली सज्जता अशा अनेकविध बाबींनी चीनला नतमस्तक होण्यासाठी भाग पाडले असण्याची शक्यता आहे.


नुकतेच चीनच्या वाणिज्य मंत्रालयामार्फत जे नकाशे जारी करण्यात आले, त्यात अरुणाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर हे भारताचे भाग आहेत, असे दाखविण्यात आले. अगदी काही दिवसांपूर्वी हे भाग भारताचे आहेत, हे दाखविणारे नकाशे नष्ट करण्याची कृती याच ड्रॅगनच्या माध्यमातून करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी या भागांना भारताचा भाग दाखविण्याच्या भूमिकेमागील चीनच्या रणनीतीचा किंवा धोरणाचा विचार करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. मुळात भारताच्या सुरक्षेला पाकिस्तानपेक्षा चीनकडून अधिक धोका असल्याचे विवेचन अनेक अभ्यासक सातत्याने करत असतात. तसेच, अरुणाचल प्रदेशला दक्षिण तिबेटचा भाग समजत असतात. तरीही त्यांनी हा भाग भारताचा भाग आहे, हे दर्शविणारे नकाशे जारी करणे हे निश्चितच भुवया उंचावणारे आहे. मुळात भारत-चीन हा मुद्दा आशिया खंडाच्या एकंदरीत शांततेशी निगडित आहे. ‘हिंदी चिनी-भाई भाई’ या नार्‍याचे नेमके काय फलित भारताला मिळाले, हे सर्वांनाच ज्ञात आहे. त्यानंतर सन २०१४ पर्यंत चीनचे भारतविरोधी धोरण हे कायम राहिले. केंद्रात सन २०१४मध्ये सत्ता परिवर्तन झाल्यावर शी जिनपिंग यांचा भारत दौरा हा या संबंधांना नवा आयाम प्राप्त करून देणारा ठरेल, अशी आसदेखील निर्माण झाली होती. मात्र, नंतर डोकलामच्या घटनेवरून चीनने आपले खरे मनसुबे आणि आपली वृत्ती यांची पुन्हा आठवण भारतालाच नव्हे तर जगाला करून दिली. त्यानंतर आताचा सर्वात चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे मौलाना मसूद अझहर. अझहरला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करण्यात सर्वात जास्त अडसर आणला तो चीनने. तसेच, चीनची कायम पाकपुरस्कृत असणारी नीती हीदेखील भारतासाठी कायमच डोकेदुखी ठरत असते. हवाई सर्जिकल स्ट्राईकनंतर आपले गार्‍हाणे घेऊन पाक सर्वप्रथम चीनच्याच पायाशी गेल्याचे भारतासह जगाने अनुभवले आहे. या व अशा सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर चीनची ही नीती म्हणजे काही नवीन खेळी तर नाही ना, अशी शक्यता निर्माण करणारी ठरत आहे.

 

 
 

चीनमध्ये सध्या बेल्ट रोड इनिशिएटिव्ह अर्थात बीआरआयची बैठक सुरू आहे. या बैठकीवर भारताने सलग दुसर्‍यांदा बहिष्कार घातला. त्यामुळे या बैठकीवर आणि बैठकीपश्चात भारताने काही कडक भूमिका घेऊ नये, यासाठी चीनने हे पाऊल तर उचलले नाही ना, हा संशय निर्माण होण्यास वाव आहे. अर्थात या संशयाची एक दुसरी बाजू अशीदेखील आपण पाहू शकतो की, भारताचा चीनने सध्या धसका घेतला आहे. भारताचे सार्वभौमत्व टिकविण्यासाठी आज केवळ निषेध न करता कृतिशील पाऊल उचलत आहे. हे चीनने चांगलेच ओळखले आहे. त्यामुळे आता जर यापुढील काळात आपण भारताशी आगळीक केली तर, कदाचित त्याचे मोठे परिणाम आपल्याला भोगावे लागतील, याचा धसका कुठेतरी चीनच्या मनात निर्माण झाला आहे, याचे द्योतक म्हणूनदेखील या घटनेकडे पाहावयास हवे. भारताच्याच भागांना भारताचे भाग म्हणून मान्य करणारी चीनची ही कृती पाकिस्तानसाठीदेखील तितकीशी जमेची नाहीच. पाकला या विश्वात सर्वात जास्त आधार चीनचा आहे आणि भारतविरोधी भूमिका घेताना चीन आपल्या पाठीशी असेल, याची निर्विवाद खात्री पाक बाळगून आहे. मात्र, चीनची ही कृती पाकला आंतरराष्ट्रीय राजकारणात एकाकी पाडणारीदेखील ठरू शकते. मात्र, त्याचवेळी भिऊ नका, आम्ही तुमच्याच पाठीशी आहोत, हा तर केवळ एक दिखावा आहे, असे सांगून चीन पाकलादेखील चुचकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकाच वेळी दोन्ही आघाड्यांवर शांतता राखत आपले बेल्ट रोडचे ईप्सित साध्य करण्याचा चीनचा हा प्रयत्न तर नाही ना, असा संशय घेण्यास यामुळे निश्चितच वाव आहे. चीनच्या या धोरणामागील कारणमीमांसा आणि शाश्वतता येणारा काळच विशद करेल. हे जरी मान्य केले तरी, आज भारताचे सक्षम असणारे परराष्ट्र धोरण, इस्लामिक देशांच्या व्यासपीठांवर भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांची असणारी उपस्थिती, आपल्या नैतिक सीमांचे उल्लंघन करणारी पाक नीती, महासत्तेसह जगातील प्रमुख देशांत आज वाढलेले भारताचे प्राबल्य, संरक्षण सामग्रीसह अंतराळाची सुरक्षा करण्याकरिता भारताने प्राप्त केलेली सज्जता अशा अनेकविध बाबींनी चीनला नतमस्तक होण्यासाठी भाग पाडले असण्याची शक्यता आहे. मात्र, काहीही असो, अशा एका कृतीवरून मागील अनेक कृती भारत विसरेल आणि विश्वास ठेवेल, याची सुतराम शक्यता नाही, हे मात्र खरे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat