'या' चार क्रिकेटपटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

    दिनांक  27-Apr-2019नवी दिल्ली : क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कसृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार दिला जातो. या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी बीसीसीआयने भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अष्टपैलू रवींद्र जाडेजा आणि महिला क्रिकेटपटू पूनम यादव यांच्या नावांची शिफारस केली आहे. बुमराह, शमी आणि जाडेजा या तिघांचाही समावेश इंग्लडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या विश्वचषक २०१९च्या भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. शनिवारी बीसीसीआय कार्यकारी समितीची बैठक झाली. यामध्ये एकमताने या चार खेळाडूंची नावे पाठवण्यात आली आहेत.

 

२५ वर्षीय भारतीय जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याला सर्वाधिक पसंती मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळेच अर्जुन पुरस्कारासाठी त्याच्या नावाला सर्वात पहिली पसंती मिळाली आहे. त्याने टी-२०, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. तसेच, मोहम्मद शमी व रवींद्र जाडेजाची नावेही अर्जुन पुरस्कारासाठी निवडली आहेत. या दोघांचीही कामगिरीत सातत्य असल्यामुळे यांची निवड अर्जुन पुरस्कारासाठी करण्यात आली.

 

भारतीय महिला क्रिकेटपटू पूनम यादवच्या नावाचा विचारदेखील बीसीसीआयकडून करण्यात आला आहे. फिरकीपटू असलेल्या पूनमने महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय तसेच टी-२० सामन्यांमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. तिने आतापर्यंत ४१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ६३ बळी, तर ५४ टी-२० सामन्यांत ७४ बळी टिपले आहेत. 'अर्जुन पुरस्कार' हा क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी भारत सरकारकडून देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat