रंगांच्या दुनियेतील चिह्न आणि चिह्नसंकेत

    दिनांक  27-Apr-2019   जादूगार रंग जांभळा


विद्वान, व्यासंगी, गंभीर अशा आपल्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाने समाजात प्रभाव पाडणाऱ्या आणि तसे असल्याचा आव आणून तसा देखावा निर्माण करणाऱ्या अशा दोन्ही प्रवृत्तींच्या लोकांना जांभळा रंग प्रिय असतो. सत्ता, खानदानी उमदेपणा, विलासी वृत्ती आणि महत्त्वाकांक्षा असे नैसर्गिक गुणधर्म आणि अशा प्रवृत्ती अनेक व्यक्तींमध्ये दिसून येतात. एखाद्या व्यक्तिमत्त्वातील या सर्व गुणवत्ता आणि सर्व वैगुण्य यांचे रूपक आणि प्रतीक म्हणजे आपला जांभळा रंग. हा रंग बराचसा राजस वृत्तीचा दर्शक आहे. मात्र, याबरोबरच आपल्या सावलीचा रंग म्हणून काहीसे गूढ स्वरूपाचे संकेतसुद्धा हा रंग देत असतो.काही संस्कृतींमध्ये शोक व्यक्त करताना याचा वापर केला जातो.

 

निळा आणि लाल या दोन प्राथमिक रंगांच्या मिश्रणाने जांभळा रंग तयार होतो. लव्हेंडर-पर्पल-लायलॅक-व्हायोलेट अशा इंग्रजी नावांनीसुद्धा जांभळा रंग आपल्याला परिचित आहे. निळ्या रंगाच्या स्थैर्य आणि दृढता या दोन्ही गुणवत्ता आणि लाल रंगाची ऊर्जा या दोन्ही गुणवत्तांचे संतुलन जांभळ्या रंगात दृश्यमान होते. सर्वच रंगांच्या नैसर्गिक व्यक्त संवेदना नेहमीच परस्पर विरोधी संकेतांची अनुभूती देत असतात. जांभळा रंगही याला अपवाद नाही. मात्र, ‘पिण्डे पिण्डे मतिर्भिन्न:’ या उक्तीप्रमाणे हे संकेत व्यक्तिनिष्ठ असतात. विपुलता-समृद्धी-श्रीमंती यासह व्यक्तीचा अनावश्यक खर्च करणारा उधळ्या स्वभाव यांचा परिचय या रंगामुळे निश्चितपणे मिळतो. चातुर्य, बुद्धिमत्ता, प्रतिष्ठा, स्वतंत्र विचार क्षमता सृजनशील निर्मिती, अनाकलनीय गूढ स्वभाव आणि मोहक आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व अशा अनेक व्यक्तींच्या विविध स्वभाव वैशिष्ट्यांचा परिचय, जांभळ्या रंगामुळे होत असतो. याचे कारण असे की, अशा स्वभावधर्माच्या अशा प्रवृत्ती निसर्गतः धारण करणाऱ्या व्यक्तींना हा जांभळा-पर्पल-लायलॅक-व्हायोलेट रंग नेहमीच पसंत असतो, त्यांच्या परिधानात याचा थोडासा परिचय मिळतो.

 

लंबवर्तुळाकार म्हणजेच ओव्हल आकार हे जांभळ्या रंगाचे भूमितीय चिह्न अथवा प्रतीक प्राचीन विद्वान गणितज्ज्ञांनी निश्चित केले आहे. या रचनेला काही विज्ञाननिष्ठ आधार आहे. व्यापक आणि मोकळ्या निळ्या रंगापेक्षा याचा व्यक्त आणि दृश्य आविष्कार अनेकदा गूढ जटील संवेदनांचे संकेत देतो. आपल्या दृष्टीला हा रंग सौम्य-प्रवाही दिसतो. मात्र, याच्या कोन विरहित आकारामुळे आपली नजर याच्यावर स्थिर होत नाही. मूळ रंगाची वैशिष्ट्ये आणि अंडाकृती-ओव्हल भूमितीय आकार या दोन्हीच्या समानतेची घातलेली अशी सांगड फारच लक्षणीय आहे. तुम्ही स्वतः जर या जांभळ्या रंगाचा नियमित वापर करत असाल, तर तुमचे खास व्यक्तिमत्त्व आणि त्याचे शब्दचित्र असे असेल. जांभळा रंग आवडणाऱ्या व्यक्ती चांगल्या जीवनसाथी असतात. अशा व्यक्ती, लाल रंगासारख्या भडक आणि आक्रमक नसतात आणि निळ्या रंगाप्रमाणे सौम्य आणि साध्याही नसतात. अशा व्यक्तींचा नेहमी राजस गुणाकडे जास्त कल असतो. मात्र, अशा व्यक्तींबद्दल पटकन गैरसमज होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांना नेहमी सतर्क राहावे लागते. बऱ्याचदा अशा व्यक्ती आळशी आहेत, असा समज होतो. हलका जांभळा रंग आवडणाऱ्या व्यक्ती शृंगारिक प्रवृत्तीच्या असतात. मात्र, खूप गडद जांभळा रंग आवडणाऱ्या व्यक्ती निराशावादी असल्याचे जाणवते. किशोर वयाच्या आधीच्या साधारण ७५ टक्के मुलांना हलका जांभळा रंग पसंत असतो. महिला वर्ग आणि छोट्या मुलांना आकर्षित करणाऱ्या उत्पादनाच्या जाहिरातीत लव्हेंडर-पर्पल-लायलॅक-व्हायोलेट अशा जांभळ्या रंगाच्या छटा जास्त प्रमाणात वापरलेल्या दिसतात.

 

महिलावर्गात लोकप्रिय असलेला हॉलमार्क हा सोन्याच्या दागिन्यांचे मानांकन करणारा जागतिक ब्रॅण्ड आहे. आबालवृद्धांना आणि विशेष करून लहान मुलांचा आवडता चॉकलेटचा प्रकार कॅडबरी. या दोन्ही जगप्रसिद्ध व्यवसायाचे मानचिह्न अथवा लोगो जांभळ्या रंगाच्या पर्पल छटेत आहेत. कॅडबरी प्रकारातील जगभरातील बहुतांशी उत्पादनांच्या वेष्टनाचा रंग हाच आहे, हे लक्षात घ्यायला हवे. खगोलातील ज्युपिटर म्हणजेच गुरू ग्रह, राशिचक्रातील धनु राशी, आठवड्यातील गुरुवार हा दिवस या सर्वांचे हा जांभळा रंग प्रतीक आहे. या रंगाबद्दल वस्तुनिष्ठ अथवा हेतुपूर्वक, वास्तव विचार करताना वेगवेगळ्या व्यक्तींमधील रुबाबदार, गर्विष्ठ, उग्र, खिन्नता, गूढता अशा विविध गुणवत्ता आणि वैगुण्यांची अनुभूती होते. याचवेळी व्यक्तिनिष्ठ गृहितकांचा पगडा असलेल्या या जांभळ्या रंगामुळे एखादी व्यक्ती निराश अथवा एकाकी असल्याची भावना निर्माण होते. काही शतकांपूर्वी, कपड्यांसाठी जांभळ्या रंगाचे नैसर्गिक रंगद्रव्य बनविणे खूप खर्चिक होते. यामुळेच जांभळ्या रंगाचे कपडे वापरणे फक्त राजघराण्यातील व्यक्तीआणि धनिक कुटुंबातील लोकांनाच शक्य होत असे. यामुळे हा रंग राजे-राण्या, वैभव, श्रीमंती आणि सत्ता अशा संकेतांशी साहजिकपणे जोडला गेला. आपले श्रेष्ठत्व, अधिकार आणि रुबाब याचे दर्शन प्रजेला व्हावे, यासाठी तत्कालीन रोमन साम्राज्यात या रंगाचे परिधान वापरले जात असे. गहन-गंभीर आणि सौम्य अथवा मृदू अशा परस्परविरोधी स्वभावधर्माचा हा रंग, निव्वळ त्याच्या दर्शनाने आणि सान्निध्याने असे वातावरण निर्माण करतो. धुंद, थंड आणि गडद मानसिकतेची अनुभूती देतो. वस्तुनिष्ठ व्यक्तीत अधिकार, वैभव आणि गूढता अशा भावना परावर्तित करतानाच व्यक्तिनिष्ठ अनुभवत हा रंग एकाकीपण आणि निराशा व्यक्त करतो.

 

सर्वच रंगांच्या अनेक छटांचे विविध संकेत, विविध संस्कृती आणि देशात वापरले गेले. जांभळा रंगही याला अपवाद नाही. किन-शी हुआंग हा चीनचा पहिला राज्यकर्ता सम्राट. ख्रिस्तपूर्व २०० वर्षांपूर्वी याचा मृत्यू झाला. ९८ चौरस किलोमीटर इतक्या भव्य परिसरात पसरलेल्या याच्या दफन स्थळावर त्याच्या कबरीच्या चारही बाजूंनी भाजक्या-पक्क्या मातीचे बनवलेले हजारो सैनिक रचले गेले. हे सैन्य मृत्यूपश्चात सम्राटाचे रक्षण करेल, अशी समजूत आणि श्रद्धा या मागे होती. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात निसर्गात उपलब्ध झाडे-फुले-फळे-मातीपासून जांभळा रंग बनविण्याचे तंत्रज्ञान चीनमध्ये विकसित झाले होते. १९७४ मध्ये अचानक सापडलेल्या या जागतिक वारसा स्थळावर सम्राटाचे हे सर्व अंदाजे आठ हजार मातीचे सैनिक, रथ, घोडे अशा जांभळ्या रंगाच्या छटेत रंगवले गेले होते. चिनी संकेतानुसार जांभळा रंग ध्रुव ताऱ्याचे प्रतीक असून, ती सम्राटाच्या राजवाड्याची जागा मानली गेली होती. पौर्वात्य देशात आजही जांभळा रंग शोक व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. जॉर्ज वॉशिंग्टन या अमेरिकेच्या पहिल्या अध्यक्षांनी, सैनिकांना दिलेले पहिले शौर्यपदक हृदयाच्या आकाराचे होते आणि ते पर्पल रंगाच्या फितीवर अंकित झाले होते म्हणून त्या शौर्यपदकाला ‘पर्पल हार्ट’ असे संबोधित केले गेले. काही प्रदेशात बौद्ध धर्म बांधव जांभळा रंग पवित्र मानतात. जांभळ्या रंगाच्या अनेक छटा आपल्याला अनेक नावांनी परिचित आहेत. बैंगनी, आमेथिस्ट, लायलॅक, मोव्ह, व्हायोलेट, प्लम, लव्हेंडर, वस्टेरिया, इंडिगो, आयरीस, फुशिया, एगप्लांट, टायरीयन, रॉयल, इम्पिरियल, हिलीयोट्रोप, मेजंटा, मलबेरी, मार्डी ग्रास अशा जांभळ्या रंगाच्या असंख्य छटांचे विभ्रम, जगभरातले रसिक अनुभवत असतात. मला खात्री आहे, पर्पल रंगातल्या त्या जगप्रसिद्ध चॉकलेट्सची मिठ्ठास चव हा लेख वाचून तुमच्या जिभेवर नक्की रेंगाळली असणार.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat