अजिंक्य रहाणेचे काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण

    दिनांक  26-Apr-2019नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. इंग्लंडमधला काऊंटी क्लब हॅम्पशायरने अजिंक्य रहाणेशी करार केला आहे. यामुळे तो हॅम्पशायरकडून खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमच्या जागी हॅम्पशायर क्रिकेट क्लबने रहाणेला संघात स्थान दिले आहे. बीसीसीआयने परवानगी दिल्यानंतर रहाणेने हॅम्पशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

 

"हॅम्पशायरकडून खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. काऊंटीमध्ये खेळताना मोठ्याप्रमाणावर धावा करून संघाला जिंकवून देण्याचा माझा मानस आहे. काऊंटी खेळण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचा आभारी आहे." अशी प्रतिक्रिया अजिंक्य रहाणेने दिली. याच वर्षी होणाऱ्या विश्वचषक २०१९मध्ये भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला नाही. परंतु, काऊंटीमधून रहाणे त्याचे सामर्थ्य दाखवेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. अजिंक्य रहाणेने ५६ कसोटी सामन्यांमध्ये ४०.५५ च्या सरासरीने ३,४८८ धावा केल्या आहेत. यामध्ये ९ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे.

 

विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात स्थान न मिळालेल्या अजिंक्य रहाणेने काउंटी क्रिकेट खेळण्यााचा निर्णय घेतला. यासाठी त्याने बीसीसीआयकडून परवानगी मागितली होती. त्यावर निर्णय देताना बीसीसीआयने रहाणेला इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी मान्यता दिली आहे. बीसीसीआयने यापूर्वी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि इशांत शर्मा या भारतीय खेळाडूंना काउंटी क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली होती. मात्र ऐन मोक्याच्या क्षणी झालेल्या दुखापतीमुळे विराट काउंटी क्रिकेट खेळू शकला नव्हता. पुजारा आणि शर्मा यांनी काउंटी क्रिकेट खेळले असून त्याचा फायदा त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली कामगिरी सुधारण्यास झाला.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat