बदलापूरच्या ‘समरशेड्स’

    दिनांक  26-Apr-2019दि. २५ एप्रिलपासून तर ९ मेपर्यंतच्या १५ दिवसांच्या कालावधीत दोन प्रतिथयश कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू झालेले आहे. त्यापैकी एक कलाकार प्रा. राहुल थोरात हे सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिव्याख्याते आहेत.


सध्याचं वातावरण फारच तापलेलं आहे. नैसर्गिक वातावरणातही तप्तता आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्याचे सामाजिक वातावरणही तापलेले आहे. अशा परिस्थितीत जर आल्हाददायक असा अनुभव आला, तर मग काय मजा येते, हे तो अनुभव घेणाराच सांगू शकेल. मुंबई-पुण्यासारख्या लोकसंख्येची घनता दाट स्वरूपात असणाऱ्या शहरात जहांगिर कलादानासारख्या ज्येष्ठ गॅलरीदेखील अनेक वर्षे चित्रकार वा शिल्पकार अशा कलाकारांना ‘वेटिंग’वर ठेवत असतात. अगदी पाच-पाच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जहांगिर कलादालनाची तारीख मिळते. तसं पाहिलं तर ही बाब गंभीर विचार करायला लावणारी आहेच. परंतु, आणखी एक बाब अशी की, सर्वच कलारसिक हे अगदी मुंबईच्या उपनगरांतून खास येऊन जहांगिरच्या कलाप्रदर्शनांना भेटी देऊ शकत नाहीत. प्रश्न अनेक आहेत, कारणेही अनेक आहेत. मात्र, हे कटुसत्य मात्र कोणीही नाकारू शकत नाही. मुंबईच्या सुप्रसिद्ध सर जे. जे. स्कूलमधून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ प्राध्यापक आणि कलाकार श्रीकांत जाधव हे बदलापूर या उपनगरात राहतात. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर तेथील तत्कालीन नगरसेवक राजेंद्र घोरपडे आणि संभाजी शिंदे यांच्या कलाप्रेमाबद्दल आदर बाळगून त्यांच्याशी संपर्क केला.

 

वृद्धिंगत संबंधांनंतर श्रीकांत जाधवांच्या चिकाटीच्या प्रयत्नांना सदर दोन्ही नगरसेवकांनी प्रतिसाद दिला आणि बदलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारित भारत कॉलेजसमोर, हॅन्री पाडा येथे ‘बदलापूर आर्ट गॅलरी’ची स्थापना केली. फेब्रुवारी २०१९ला या गॅलरीचे लोकार्पण झाले. सर्व कलाकारांना जहांगिरसारख्या गॅलरीज मिळायला प्रचंड विलंब लागतो. ही अडचण ध्यानात घेऊन, बदलापूरसारख्या महानगरपालिकेने ‘बदलापूर आर्ट गॅलरी’ची स्थापना करून सर्वसामान्य कलाकारांना सहज गॅलरी उपलब्ध करून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न म्हणजे, जणू एक प्रकारे जहांगिर वा सहज उपलब्ध न होऊ शकणाऱ्या कलादालनांवर ‘बदला’च घेतला आहे. अर्थात, चांगल्या अर्थाने हा ‘बदला’ आहे. ही गॅलरी म्हणजे युरोपियन शहरांच्या धर्तीवरील ज्या खुल्या कलादालनांची रसिकमान्यता असलेल्या गॅलरीज आहेत, त्याचप्रकारची ‘बदलापूर आर्ट गॅलरी’देखील खुली गॅलरी आहे. अत्यंत प्रशस्त आणि कलाकृतींना प्रदर्शनासाठी यथायोग्य सुलभता निर्माण करून सोय असलेली ही गॅलरी आहे.

 

दि. २५ एप्रिलपासून तर ९ मेपर्यंतच्या १५ दिवसांच्या कालावधीत दोन प्रतिथयश कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरू झालेले आहे. त्यापैकी एक कलाकार प्रा. राहुल थोरात हे सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिव्याख्याते आहेत. त्यांची अमूर्त शैलीतील पेटिंग्ज या कलादालनात पाहायला मिळतात. त्यांच्या कलाकृतीचे विषय हे पूर्णतः निसर्गाधारित आहेत. लहानपणी त्यांचा ग्रामीण आणि निसर्गाच्या सान्निध्यात वावर होता. त्यावेळची त्यांची निरीक्षणे हीच त्यांच्या कलाकृतींचा विषय ठरली आहेत. निसर्गातील डोंगर, झाडे, नदीकिनारे वा खडक, त्यांच्यावरील पोत, टेक्सचर्स ही राहुल यांना आकर्षून घेत होती. तेच आकार आणि रंग थोरात यांच्या कलाकृतींचा मुख्य विषय ठरली आहेत. निसर्ग हा नेहमी ‘सृजन’ करीत असतो. नवनिर्मिती करीत असतो. तोच भाव राहुल थोरात यांच्या प्रतिभाविष्कारात आहे. म्हणूनच त्यांच्या कलाकृती त्या अमूर्त जरी असल्या तरी मूर्त स्वरूपाचा संवाद साधू शकतात. कदाचित हेच त्यांच्या कलाकृतीचे वैशिष्ट्य ठरते. दुसरे कलाकार हेही एक प्रयोगशील चित्रकार आहेत. रमेश देशमाने हे विविध माध्यमे यशस्वीपणे हाताळणारे आणि उचित परिणाम मिळविणारे कलाकार आहेत. दैनंदिन वातावरणातील धकाधकीच्या जीवनात अनेकांच्या चेहऱ्यावरील हावभाव टिपण्यात रमेश देशमाने यांचे कसब आहे. म्हणूनच ते त्यांच्या अर्धमूर्त शैलीतील कलाकृती विविध रंगाकारांच्या माध्यमातून समर्थपणे रंगवितात. या दोन्ही कलाकारांच्या कलाकृती या खुल्या कलादालनात पाहताना खरोखरच खुलेआम आनंद मिळविण्याशिवाय राहत नाहीत, असे रसिक म्हणतात...!

- प्रा. गजानन शेपाळ

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat