आधी होकार...

    दिनांक  26-Apr-2019   प्रियांका गांधी-वाड्रा यांना काँग्रेसने निवडणुकीपूर्वी पूर्व उत्तर प्रदेशसह महासचिवपदाची जबाबदारी देत प्रचाराच्या मैदानात उतरवले. अखेरीस घरातूनच मिळालेली जबाबदारी स्वीकारून प्रियांका सर्व शक्तिनिशी रिंगणात उतरल्या. त्यांच्यामुळे निष्प्रभ, निष्क्रिय झालेल्या उत्तर प्रदेशमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक नवचैतन्यही फुंकले गेले. मग रोड शो, रॅली, सभांचा प्रियांकाने एकच धडाका लावला. गांधी बंधुभगिनी हातात हात घालून प्रचारात उतरताना दिसले. अमेठी-रायबरेली आणि वायनाडमध्येही ‘प्रियांका गांधी आगे बढो चे’ नारे गुंजू लागले. त्यातच माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची झलक प्रियांकामध्ये पाहण्यासाठी लोकांनीही प्रियांकांच्या सभांना गर्दी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांचे, जनतेचे हे प्रेम बघून प्रियांका गांधींमध्येही क्षणभर का होईना, लोकसभेची एखादी जागा आपणही लढवू शकतो, असा कदाचित आत्मविश्वास जागृत झाला असावा. पण, अमेठी-रायबरेली हे खानदानी मतदारसंघ तर आधीच आई आणि भावाची जणू जहागिरच असल्याने प्रियांकाने थेट वाराणसीचीच गुगली टाकली. काँग्रेस अध्यक्षांनी निवडणूक लढवायला सांगितले, तर वाराणसीतून मोदींना टक्कर देण्यासाठी सज्ज असल्याचे प्रियांकाने माध्यमांमध्ये उघडपणे कबूलही केले. त्यानंतर प्रियांका मोदींविरोधात वाराणसीतून लढणार, यावर बरेच चर्वितचर्वण झाले. प्रियांका विरुद्ध मोदी सामना, आकडेवारीही माध्यमांनी रंगविली. मोदींसाठी मग वाराणसी जिंकणे कसे सोपे राहणार नाही, याच्या सुरस कथा रंगल्या. प्रियांकाला वाराणसीतून तिकीट दिल्यास त्याचे पडसाद संपूर्ण उत्तर प्रदेशमध्येच उमटून त्याचा मोठा राजकीय फायदा काँग्रेसला होऊ शकतो, म्हणून कित्येक काँग्रेस नेत्यांनी प्रियांकाच्या या मागणीला समर्थनही दिले. एकाएकी प्रियांकामध्ये मोदींना टक्कर देण्याची ताकद असल्याचा विश्वास काँग्रेसमध्ये निर्माण झाला. शिवाय, प्रियांका वाराणसीतून रिंगणात उतरल्यास महागठबंधनचीही साथ मिळेल, अशी भाबडी आशा काँग्रेसजनांना होती. प्रियांकाच्या वाराणसी दौऱ्याने, गंगा नदीतून केलेल्या प्रवासामुळे या दाव्यांना अधिकच हवा मिळत गेली आणि प्रियांकाची उमेदवारी जवळपास निश्चित आहेच, फक्त घोषणाच बाकी आहे, या स्वरूपाची वातावरण निर्मिती करण्याचा काँग्रेसने पुरेपूर प्रयत्न केला. पण, अखेरीस जे अपेक्षित होते, तेच झाले. प्रियांका गांधींऐवजी अजय राय याच २०१४ साली मोदींविरोधात पराभूत उमेदवाराचे वाराणसीतून नाव काँग्रेसने जाहीर केले आणि या चर्चांवर पडदा पडला.

 

नंतर नकार...

वरकरणी प्रियांकाची वाराणसीतून निवडणूक लढविण्याची इच्छा आणि काँग्रेसची अनिच्छा असे चित्र दिसत असले तरी मुळात परिस्थिती तशी नाहीच. खरंतर प्रियांकाने आणि अर्थोअर्थी काँग्रेसने केवळ भाजपसमोरच्या अडचणी वाढविण्यासाठीच हा डाव खेळल्याची शक्यता अधिक आहे. म्हणजे, भाजपचे सर्व लक्ष केवळ वाराणसीत केंद्रित होईल आणि इतरत्र काँग्रेसला त्याचा लाभ मिळेल. पण, भाजपनेही प्रियांकाच्या उमेदवारीला फारसे महत्त्व न देता, त्यांना वाराणसीतून लढण्याची इच्छा असेल, तर त्यांनी खुशाल लढावे, अशीच सुरुवातीपासून भूमिका घेतली आणि अखेरीस हा फक्त एक राजकीय फार्स निघालादुसरीकडे सपा-बसपा-राजद यांनी महागठबंधनतर्फे सपाच्या शालिनी यादव यांना वाराणसीतून उमेदवारी जाहीर केल्यावर हे जवळपास निश्चित झाले की, प्रियांका वाराणसीतून लढणार नाही. त्यातच ज्या दिवशी मोदी वाराणसीत दाखल झाले, त्याच दिवशी काँग्रेसने अजय राय यांची उमेदवारी जाहीर करून एकप्रकारे मोदींसाठी हा ‘वॉकओव्हर’ असल्याचेच संकेत दिले. वाराणसीतून मोदींना पराभूत करणे केवळ अशक्यप्राय असल्याची पूर्ण कल्पना सोनिया आणि राहुल गांधी यांना आहेच. त्यामुळे प्रियांकाने तिच्या पहिली निवडणुकीत असा मोठा पराभव पत्करणे प्रियांकाच्या आणि काँग्रेसच्याही सोयीचे निश्चितच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे, प्रियांका या काँग्रेसच्या स्टार प्रचारक आहेत. सोनिया आणि राहुल आपापल्या मतदारसंघातून निवडणुका लढवत असताना कुटुंबातील एक सदस्याने तरी प्रचारासाठी आपल्या मतदारसंघाचे दडपण न घेता फिरते राहावे, हा त्यामागील उद्देश. त्यातच सोनिया गांधी यांची तब्येत बघता, त्याही प्रचारात फारशा सहभागी नाहीत. त्यामुळे काँग्रेसची धुरा ही राहुलच्या गळ्यात असताना आणि राहुल दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवत असल्यामुळे प्रियांका गांधींनी खासकरून उत्तर प्रदेशकडे लक्ष केंद्रित करणे काँग्रेससाठीच आवश्यक आहे. म्हणूनच आधी होकार आणि नंतर नकाराचे हे राजकीय नाट्य काँग्रेसकडून रंगवले गेले. निर्णय होणारच नव्हता, तो आधीच झाला होता. माध्यमांना चघळायला एक विषय मिळावा आणि सर्व लक्ष काँग्रेसकडे, प्रियांकाच्या भूमिकेकडे असावे, हाच यामागचा सुप्त हेतू. पण, जनता सुज्ञ आहे. सत्ता कोणाच्या हातात द्यायची, ते ठरविण्यास ती समर्थ आहे.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat