राज, तुम्ही नाशिकला काय दिले?

    दिनांक  26-Apr-2019   यावेळच्या लोकसभा निवडणुकांत कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा पक्षाच्या राजकीय धोरणांना विरोध झालेला पाहावयास मिळाला नाही. अपवाद केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी. राज्यात मोदींवर टीका करण्यात सर्वात जास्त आघाडीवर होते ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे. ‘लाव रे, तो व्हिडिओ’ फेम त्यांचा प्रचार अवघ्या राज्याने अनुभवला आहे. ‘भाजप सरकारने देशाला काय दिले?’ या प्रश्नावर त्यांचे इंजिन अडकलेले दिसले. मात्र, याच निवडणुकीच्या निमित्ताने ‘राज ठाकरे, तुम्ही नाशिकला काय दिले?‘, असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना नक्कीच भेडसावत आहे.


सन २००९ मध्ये राज ठाकरेंच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन नाशिककर जनतेने मनसेचे तीन आमदार शहरातील चार विधानसभा मतदार संघांतून निवडून दिले. तसेच, तब्बल ४० नगरसेवक निवडून देत नाशिक महानगरपालिकेची एकहाती सत्ता, व्यवस्था सुतासारखी सरळ (राज यांची भाषा) करण्यासाठी दिली होती. नाशिक मनपाच्या स्थायी समितीच्या चाव्यादेखील मनसेच्या हातीच होत्या. राज्यातील मनसेचा पहिला महापौर नाशिकमध्येच विराजमान होण्याची संधी नाशिककरांनी मनसेला पर्यायाने राज ठाकरे यांना दिली होती. इतके दान देऊन कर्णाच्या भूमिकेत असणाऱ्या नाशिककरांना राज ठाकरे यांनी काय दिले, हाच मोठा प्रश्न आहे. शहराच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सक्षम आहात, असे राज ठाकरे यांनी सांगितल्याने त्यावर विश्वास ठेऊन नाशिकच्या जनतेने मनसेच्या उमेदवारांस निवडून दिले होते. मात्र, असे असूनही नाशिकच्या समस्या जैसे थे च राहिल्या. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर आणि मुंबई आणि पुणे या शहरांसाठी मध्यवर्ती असणारे नाशिक औद्योगिक क्षितिजावर पोहोचविणार असल्याचे मत राज ठाकरे यांनी मांडले होते. मात्र, मनसेच्या काळात एकही मोठा उद्योग नाशिकमध्ये आला नाही. किंबहुना नाशिकच देशाच्या औद्योगिक क्षितिजावरून गायब झाले की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. नाशिकचे औद्योगिकीकरण व्हावे आणि नाशिक जिल्ह्यातील आणि शहरातील पाणीप्रश्न सुटावा, दुष्काळाच्या छायेतून जिल्ह्याची मुक्तता व्हावी, शहरवासीयांना पाणीकपातीला सामोरे जावे लागू नये, यासाठी राज ठाकरे यांनी मुकणे धरण परियोजना कार्यान्वित करण्याचे आश्वासनदेखील नाशिककरांना दिले होते. मात्र, ती परियोजना मनसेच्या कार्यकाळात पूर्णत्वास न जाता भाजपच्या काळात पूर्णत्वास गेली आहे. राज यांनी बहुचर्चित गोदा पार्कचा मुद्दा राज्यभर चर्चिला. मात्र, वास्तवात मनसेला त्यांच्या कार्यकाळात नाशिकमध्ये त्यांनी निर्धारित केलेले गोदा पार्क साकारण्यात अपयशच आले. पूररेषेत असणाऱ्या गोदापार्कची गोदावरीच्या एकाच पुरात दुरवस्था झाली. या पार्कला जलसंपदा विभागानेदेखील हरकत नोंदविली होती. राज यांनी रामवाडी ते होळकर पूल आणि चोपडा लॉन्स ते आसाराम बापू पूल परिसर या भागात गोदापार्क साकारले आणि त्याचीही लगेचच दुरवस्था झाली. जेव्हा की, संपूर्ण नदीकिनारी गोदापार्क साकारण्याचे आश्वासन राज यांनी दिले होते.

 

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आणि नाशिककर असणारे दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला कलाकाराच्या नजरेतून पुनर्वैभव प्राप्त करून देणार असल्याची बतावणीदेखील राज ठाकरे यांनी केली होती. मात्र, तेदेखील कार्य मनसेच्या काळात नाशिकमध्ये साकारले गेले नाही. उलटपक्षी या स्मारकाची अवस्था अजूनच बिकट झाली. मोठ्या उद्योगपतींच्या साहाय्याने नाशिकनगरीत राज यांनी बोटॅनिकल गार्डन साकारले. त्यामागे नाशिककरांना विरंगुळ्याचे काही क्षण अनुभवता येतील, असा त्यांचा उद्देश असल्याचे ते म्हणत असत. मात्र, समस्याग्रस्त नाशिककरांना राज यांनी समस्यामुक्त केले असते तरी, येथील नागरिकांच्या जीवनात विरंगुळा फुलला असता. हेच राज यांना उमगले नाही. तसेच, बोटॅनिकल गार्डनसाठी वनविभागाची जागा उपलब्ध करून देण्यात राज यांना आज ते ज्या मुख्यमंत्र्यांवर शरसंधान साधत आहे, त्यांच्याच नेतृत्वाखाली वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मदत केली होती. म्हणजेच, राज यांच्या कार्यपूर्तीत भाजपचाच वाटा मोठा होता, हे आज राज ठाकरे सोयीस्कररित्या विसरले आहेत. राज यांनी देशातील बड्या उद्योगपतींना हाताशी धरत नाशिकचा दौरा त्यांना घडवला, तेव्हा सर्वसामान्य नाशिककर नागरिकांना राज ठाकरे या उद्योगपतींच्या माध्यमातून नाशिक नगरीत एखाद्या मोठ्या उद्योग व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवत असल्याची आस निर्माण झाली होती. मात्र, राज यांनी देशातील या उद्योगपतींकडे एखादा मोठा प्रकल्प न मागता मागितले ते पैसे आणि तेही शहर सुशोभिकरणासाठी. शहराचे सुशोभिकरण हे जिन्नसांचा वापर करून नव्हे तर शहरातील नागरिकांना जिन्नस उपलब्ध करून कसे करता येईल, हे राज नेमके नाशिकच्याच बाबतीत विसरले. नाशिकनगरीत उद्योगांसाठी देशाच्या विविध कानाकोपऱ्यांतून नागरिक स्थलांतरित होत असतात. राज यांनी परप्रांतीयांचा मुद्दा हाती घेतला, तेव्हा नाशिक नगरातील अनेक परप्रांतीय मजूर नाशिक सोडून निघून गेल्याचे चित्र दिसले. त्यामुळे नाशिकमधील अनेक उद्योगधंदे त्यावेळी ओस पडले होते. बेकरीत मिळणारा पावदेखील त्यावेळी उपलब्ध होत नसल्याचे चित्र नाशिककर नागरिकांनी अनुभवले होते. सुरक्षेची हमी देत या सर्व कामगारांना पुन्हा नाशिकमध्ये आणण्यासभारत भारती’च्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले गेले. त्यानंतर कुठे नाशिकची उद्योगव्यवस्था सुरळीत झाली.

 

एवढेच काय तर नाशिकमध्ये मनसेच्या सत्ता काळात नाशिक दौऱ्यावर येण्याचे नियोजन राज आखत. त्यांची नाशिक येथे पोहोचण्याची वेळ ही सकाळी ११ ची असल्यास ते संध्याकाळी ४ ला नाशिकला आल्याचे अनेकांनी अनुभवले आहे. मात्र, या काळात नाशिकचे प्रथम नागरिक त्यांच्या स्वागतासाठी सकाळी ११ पासून नाशिकच्या वेशीवर त्यांची वाट पाहात असत. राज ठाकरे यांच्या प्रतीक्षेत शहराचा प्रथम नागरिक इतका वेळ ताटकळत उभे राहिल्याचे चित्र यानिमित्ताने नाशिकने पाहिले आहे. या सर्व प्रक्रियेत आवश्यक त्या प्रशासकीय कामाच्या वेळेचा अपव्यय होत असे, तो वेगळाच. राज यांच्या नाशिकच्या ‘ब्लू प्रिंट’ मध्ये नेमकी कोणती कार्ये समाविष्ट होती, त्यांची कालमर्यादा किती होती आणि ती कामे कशी पूर्ण करण्यात येणार होती, याचे कोडे अजूनही नाशिककर नागरिकांना उलगडले नाही. स्वतः कोड्यात राहण्यापेक्षा नाशिककर नागरिकांना कोड्यात पाडणाऱ्या मनसेला २०१४ च्या विधानसभेत आणि त्यानंतर नाशिक महानगरपालिकेत नाकारण्यात आले. राज यांनी छगन भुजबळ यांच्या काळात बांधलेल्या उड्डाणपुलाखाली सुशोभिकरण केले आणि त्यांनी याच कार्यातून भुजबळ यांच्या मैत्रीची वीण तेव्हा विणली होती का? असा सवाल आजच्या राज यांच्या भूमिकेमुळे नाशिककरांना सतावत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे,’ या उक्तीची प्रचिती केवळ राज यांच्यामुळे नाशिकला अनुभवता आली, हे मात्र नक्की.

 

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांनी स्वतः काय केले, हेच नाशिकच्या जनतेला सांगावे. नाशिककर नागरिक सुजाण आहेत. ते राज यांचे कार्य उत्तमरित्या जाणून आहेत.

 

- देवयानी फरांदे, आमदार, भाजप

 

मनसेच्या काळात महापालिकेचा कोणताही निधी न वापरता सीएसआरच्या माध्यमातून नाशिक महानगरपालिकेने कार्य केले आहे. मनसेची कामे नाशिकमध्ये येणाऱ्या काळात मैलाचा दगड ठरणार आहेत. मनसेने नाशिकमध्ये बोटॅनिकल गार्डन, बाळासाहेब ठाकरे स्मारक, रिंग रोड, चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क अशी कामे केली आहेत. तसेच, मनसेवर महापालिका सत्ताकाळात विरोधकांनी भ्रष्टाचाराचा एकही आरोप केला नाही.

 

- राहुल ढिकले, प्रदेश उपाध्यक्ष, मनसे

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat