कॉर्पोरेट गिफ्टिंग उद्योगातला पॉवरफूल उद्योजक

25 Apr 2019 21:55:52



'रुद्रा क्रिएशन्स'ला लवकरच १७ वर्षे पूर्ण होतील. आज ‘रुद्रा क्रिएशन्स’ची उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात आहे. ४० हून अधिक लोकांना ‘रुद्रा क्रिएशन्स’ कंपनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार देते. आपल्या यशाचं सारं श्रेय संजय पवार आपले भाऊ, पत्नी प्रीती, मोठे साडू, मित्रपरिवार, कंपनीची टीम आणि ग्राहक यांना देतात.


लालबाग-परळच्या मातीचा गुणच वेगळा आहे. सण-उत्सवाने नेहमी उल्हासित होणारी, थोरामोठ्यांच्या जयंत्या- पुण्यतिथीने रोमांचित होणारी या सर्व कारणांमुळे लोकांना एकत्र आणणारी अशी ही माती. या मातीमध्ये नेतृत्व घडविण्याची एक अनोखी ताकद आहे. त्यामुळेच या परिसराने या देशाला राजकारण, नाट्य-चित्र-कला-साहित्य-क्रीडा, कामगार, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील नेतृत्व दिले आहे. तोदेखील याच मातीतला. याच परिसरात खेळला, बागडला, मोठा झाला. या परिसराने त्याला व्यावहारिक ज्ञानाचे धडे दिले. जे त्याला भावी आयुष्यासाठी उपयोगी ठरले. एका साध्या बीपीटी कर्मचाऱ्याचा मुलगा ते कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या उद्योगाचा मालक. हा त्याचा जीवनप्रवास हृदयस्पर्शी आहे. ही कथा आहे ‘रुद्रा क्रिएशन्स’ या कॉर्पोरेट गिफ्टिंग क्षेत्रात प्रथितयश मिळविलेल्या कंपनीचे संचालक संजय पवार यांचीमाझगाव येथील मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये कार्यरत असणारे वसंत पवार आणि त्यांच्या पत्नी वासंती पवार म्हणजे खऱ्या अर्थाने प्रापंचिक जोडपं. तीन मुलगे आणि एक मुलगी असं यांचं एक लहानसं जग होतं. आदर्श माणूस घडविण्यासाठी ज्या आदर्शांची शिदोरी लागते, त्या साऱ्या संस्कारांची शिदोरी पवार दाम्पत्याने आपल्या मुलांना दिली. यातला मधला मुलगा म्हणजेच संजय. लहानपणापासून सगळ्यांसोबत मिळून मिसळून वागणारा. खेळ असो किंवा एखादा उत्सव, संजय सगळ्यात पुढे. त्याच्यामध्ये नेतृत्वगुण हळूहळू रुजत गेले. परळच्या शिरोडकर विद्यालयात शालेय शिक्षण झाल्यानंतर वडाळ्याच्या एसआयडब्ल्यूएस महाविद्यालयातून संजयने वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. मात्र, शिकत असताना त्याने आपल्या शिक्षणाचं ओझं आई-वडिलांवर पडू नये म्हणून बारावीनंतरचं शिक्षण, अर्धवेळ नोकरी करून पूर्ण केलं. सकाळी कॉलेज अन् दुपारपासून नोकरी असा त्याचा दिनक्रम होता.

 

तो काळ व्हिडिओवर चित्रपट पाहण्याचा होता. घरात बारसं असो की गल्लीत सत्यनारायणाची पूजा, व्हीसीआर आणि व्हिडिओ कॅसेट भाड्याने आणून सगळे एकत्र मिळून चित्रपटाचा आनंद लुटायचे. या व्हिडिओ कॅसेटच्या आवरणाच्या डिझाईनचे काम संजय करायचा. त्यातून चांगली कमाई व्हायची. शिक्षणाचा थोडा खर्च निघायचा. संजयच्या मोठ्या भावाचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता. बीकॉम झाल्यावर संजय सुरुवातीला तिथे सेल्समनचे काम करू लागला. सेल्समनचे काम केल्यामुळे वस्तू कशी विकावी, ग्राहकांना कसे आपलेसे करायचे, या सगळ्याचे बाळकडू संजयला मोठ्या भावाकडून आपसूकच मिळाले. काही महिन्यांनी तिघा भावांनी मिळून ट्रॅव्हल बॅग, लेदर बॅग तयार करण्याचा कारखाना सुरू केला. संजयने त्या बॅगसुद्धा विकायला सुरुवात केली. हे सगळं करत असताना संजयला वेगळं काहीतरी करावं असं वाटत होतं. उराशी स्वप्ने मोठी होती. त्याने भावासोबत सल्लामसलत करून दादरच्या शिवाजी पार्कमध्ये एक बुटीक सुरू केलं, नाव होतं ‘किमया’. या बुटीकमध्ये डिझायनर पर्सेस, बॅग्ज, बेल्ट्स, लेदर वॉलेट्स अशा चामड्याच्या सर्व वस्तू मिळत. एकदा एक माणूस संजयकडे आला आणि म्हणाला की, “माझ्याकडे गारमेंटचा विशेषत: टीशर्टचा खूप मोठा साठा आहे. मला माझं दुकान खाली करावं लागल्याने या मालाचं करायचं काय हा यक्षप्रश्न माझ्यासमोर आहे. तुम्ही हा माल तुमच्या बुटीकमध्ये विकण्यास ठेवा, माल विकला गेल्यानंतर पैसे द्या.” त्या व्यक्तीविषयी संजयला आपुलकी वाटली. त्याने त्याचा गारमेंटचा माल एका बाजूला विकण्यास सुरुवात केली. हळूहळू गारमेंटच्या वस्तू जास्त विकल्या जाऊ लागल्या. किंबहुना, त्यामुळेच ‘किमया’ अल्पावधीत शिवाजी पार्क परिसरात प्रसिद्ध झाले. अगदी मराठी चित्रपट क्षेत्रातले बरेचसे कलाकार हे किमयाचे नियमित ग्राहक होते.

 

याचवेळी संजयचा प्रीतीशी विवाह झाला. हुशार आणि व्यवहारकुशल जोडीदार मिळाल्याने संजयचा व्यवसाय चांगलाच वधारला. एका मित्राने संजयला बँकॉकवरून गारमेंट आणायला सांगितले. संजय ते घेऊन आला. मात्र, सुरुवातीला ते विकलेच गेले नाही. काय चूक झाली, हे संजयला कळले नाही. मात्र, भांडवल तरी काढावं म्हणून त्याने अगदी सवलतीच्या दरात टी शर्ट्स, जीन्स विकण्यास सुरुवात केली. दोन-तीन महिन्यानंतर दूरदूरवरून लोक ‘किमया’मध्ये येऊन त्या टी शर्ट्स आणि जीन्सविषयी विचारू लागले. कारण, संजयने आणलेले टी शर्ट्स, जीन्सची फॅशन इथल्या फॅशनच्या काळापेक्षा चार महिने पुढे असायचे. हे गिमिक्स कळल्यानंतर मात्र संजयने मागे वळून पाहिले नाही. राशीनुसार टी शर्ट्स तयार करण्याचा पहिला मान संजय पवारांना जातो. त्यांच्या या टी शर्ट्सना खूप मागणी होती. टी शर्ट्स, शर्ट्स, बॅग्ज या उत्पादनांच्या दर्जामुळे हिंदुस्थान युनिलिव्हर, कोलगेट, नेस्ले, डाबर, सिएट टायर सारखे कॉर्पोरेट क्लायंट्स त्यांना मिळाले. सर्व काही सुरळीत चाललंय, असं वाटत असतानाच जागेच्या मालकांनी मुदतीपूर्व जागा खाली करण्यास संजयना सांगितले. जागा खाली करताना जागामालकाने अजून एक अट ठेवली की, तुम्ही ‘किमया’ हे नाव इकडेच ठेवा. सेट झालेला व्यवसाय दुसरीकडे हलवायचा म्हणजे एक मोठा धोकाच होता आणि भरीस भर म्हणजे ही अट. त्यात पवारांच्या घरी एक गोंडस पाहुणासुद्धा आला होता. सगळं कसं मॅनेज करायचं, या विवंचनेत असताना पुन्हा पत्नी प्रीती खंबीरपणे संजयच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या. माहिममध्ये त्यांनी एक जागा पाहिली आणि सर्व सामान तिकडे हलवले. नव्याने सुरुवात झाली. मुलगा, रुद्राक्ष, त्याच्या नावानेच नवीन कंपनी सुरू झाली. ‘रुद्रा क्रिएशन्स.’ ‘रुद्रा क्रिएशन्स’ला लवकरच १७ वर्षे पूर्ण होतील. आज ‘रुद्रा क्रिएशन्स’ची उलाढाल काही कोटी रुपयांच्या घरात आहे. ४० हून अधिक लोकांना ‘रुद्रा क्रिएशन्स’ कंपनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार देते. आपल्या यशाचं सारं श्रेय संजय पवार आपले भाऊ, पत्नी प्रीती, मोठे साडू, मित्रपरिवार, कंपनीची टीम आणि ग्राहक यांना देतात. कुटुंब, मित्र, ग्राहक आणि मार्गदर्शन करणारे व्यावसायिक गुरू हे आपल्या व्यवसायाचे चार स्तंभ असून त्यांच्या आधारावर हा डोलारा आपण उभारू शकलो, असं ते कृतज्ञतापूर्वक मान्य करतात. “व्यवसाय हा टेस्ट मॅचसारखा आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीत तुम्ही विकेट न टाकता पाय रोऊन पीचवर उभे राहणे आवश्यक आहे. हे जर केलंत तर यश तुमचंच,” हे यशाचं गमक पवार सांगतात. कदाचित याचमुळे आज ते कॉर्पोरेट गिफ्टिंग क्षेत्रातले पॉवरफूल उद्योजक आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0