राज्यातील चौथ्या टप्प्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

    दिनांक  25-Apr-2019मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यामध्ये २९ एप्रिल रोजी राज्यातील १७ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. यात नंदूरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई उत्तर-पूर्व, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण,मावळ, शिरुर आणि शिर्डी या लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे.

 

चौथ्या टप्प्यात ३ कोटी ११ लाख ९२ हजार ८२३ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. त्यात १ कोटी ६६ लाख ३१ हजार पुरुष तर १ कोटी ४५ लाख ५९ हजार महिला मतदार आहेत. मुंबई उत्तर मतदारसंघात सर्वाधिक ३३२ तृतीयपंथी मतदार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये १०२ विधानसभा मतदारसंघ असून ३३ हजार ३१४ मतदान केंद्र आहेत. सुमारे १ लाख ७ हजार ९९५ ईव्हीएम (बीयू आणि सीयू) तर ४३ हजार ३०९ व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात आले आहेत.

 

राज्यात आतापर्यंत एकूण तीन टप्प्यांमध्ये ३१ मतदारसंघांमध्ये मतदान शांततेत पार पडले. शेवटच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी तयारी सुरु आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत. 'सखी' मतदार केंद्र, दिव्यांग मतदारांसाठी व्हील चेअर, पिण्याच्या पाण्याची सुविधा, सावलीसाठी मंडप अशा सोयी यापुर्वी झालेल्या मतदान प्रक्रियेत पुरविण्यात आल्या आहेत.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat