उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईकांचे कौतुकास्पद पाऊल

    दिनांक  24-Apr-2019


 

अपव्यय खर्च व सुरक्षा यंत्रणेवरील ताण लक्षात घेऊन केले टपाली मतदान

 

मुंबई : उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक व पत्नी कुंदा नाईक यांनी टपाली मतदान केले आहे. राम नाईक हे मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघातील मतदार आहेत. २९ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदानाला न जाता २४ एप्रिल रोजीच त्यांनी टपाली मतदान केले. लखनौ येथे मतदान करून त्यांनी आपलं मतदान टपालाने निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठविले.

 

राज्यपाल व त्यांच्या पत्नी यांना घटनेने विशेष मतदाराचा दर्जा दिला असल्याने ते टपालानेही मतदान करू शकतात. लखनौहून मुंबईला येऊन जाण्यासाठी किमान एक दिवस तर जातोच. शिवाय त्या दोघांसह, एडीसी यांचा विमान प्रवास खर्च रु.१,२७,००० येतो. नाईक यांना उच्च दर्जाची झेड सुरक्षा असल्याने सर्व सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांचा प्रवास खर्चही होतो. याखेरीज स्थानिक प्रशासनावरही ऐन मतदानाच्यावेळी राज्यपालांच्या भेटीच्या झेड सुरक्षा व्यवस्थेचा ताण येतो. हे सर्व टाळण्यासाठी राज्यपाल राम नाईक यांनी टपालाने मतदान करण्याचा निर्णय घेतला.

 

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून गेल्या गुरुवारीच नाईक यांना पेसमेकर लावण्यात आला आहे. तरीही मतदान हा राष्‍ट्रधर्म असून ते वेळेवर मुंबईत पोचावे यासाठी आज मतदान करून टपालाने पत्रिका पाठवित असल्‍याचे नाईक यांनी सांगितले. राजभवनचे अप्पर मुख्य सचिव हेमंत राव यांनी नाईक दाम्पत्याच्या मतपत्रिकांवर साक्षीदार अधिकारी म्हणून साक्षांकन केले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat