नेत्रदानाचा मंत्र देणारा अवलिया...

    दिनांक  24-Apr-2019‘देणाऱ्याने देत जावे...’ असा नेत्रदानाचा संदेश आपल्या आगळ्या-वेगळ्या पद्धतीने देणाऱ्या रूप पटेला यांच्याविषयी जाणून घेऊया.


सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या समाजात कार्यरत असतात. पैसा, प्रतिष्ठा आणि मान असूनही समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द या व्यक्तींना स्वस्थ बसू देत नाही. त्यापैकीच एक म्हणजे मुंबईतील बँकिंग क्षेत्रात गुंतवणूक करणारे रूप पटेला. ते नेत्रदानाच्या जागृतीसाठी प्रयत्नशील आहेत. चक्क डोळ्यावर पट्टी बांधून आजपर्यंत त्यांनी ४० पेक्षा जास्त देशात अर्ध-मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. रूप पटेला यांची मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याची सुरुवात त्यांच्या मुलांमुळे झाली. मुलांबरोबर लावलेल्या पैजेला उत्तर देण्यासाठी जिद्दीने त्यांनी २०१३च्या ठाणे मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला व ती आत्मविश्वासाने पूर्ण करून दाखवली. ही मॅरेथॉन त्यांच्या आयुष्याला सर्वार्थाने कलाटणी देणारी ठरली. ‘निरोगी आरोग्या’चा मूलमंत्र उराशी घेऊन रूप पटेला यांनी जगातील अनेक देशांत होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली. २०१७ मध्ये पुणे येथील एका मॅरेथॉन स्पर्धेमध्ये डोळ्यावर पट्टी बांधून त्यांनी ‘नेत्रदान हेच श्रेष्ठ दान’ हा नारा दिला. यानंतर जगभरातील जवळजवळ ४० पेक्षा जास्त देशांत त्यांनी डोळ्यांवर पट्टी बांधून मॅरेथॉन स्पर्धांमध्ये धावून नेत्रदानाचा संदेश दिला. या उपक्रमासाठी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक देशांनी या कार्यासाठी त्यांचा सत्कारही केला आहे. या उपक्रमाला साहाय्य केल्याबद्दल त्यांनी आपल्या कुटुंबीयांचे आभार मानले. “कुटुंबामुळेच या समाजकार्यात मला काम करण्याची संधी मिळाली,” असे रूप पटेला यांनी सांगितले.

 

रूप पटेला या उपक्रमाविषयी म्हणतात की, “मी समाजाचे काही देणे लागतो. त्यामुळे समाजात प्रत्येकाने अवयवदान केल्यास गरजू लोकांना त्याचा उपयोग होईल.” अवयवदानाच्या प्रचारासाठी त्यांनी काम सुरू केले. जनजागृती करताना त्यांच्या लक्षात आले की, भारताबरोबरच अनेक देशात अजूनही अवयवदानाविषयी जाणीव-जागृतीच नाही. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधनाचे कार्य करण्याची गरज आहे. अंधव्यक्तींच्या अडचणी समाजासमोर आणण्यासाठीच रूप पटेला आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होतात. माणसाला शरीररूपी अनमोल गोष्ट लाभली आहे. मग मृत्यूनंतर याच शरीरातील अवयव तरी का फुकट जाऊ द्यायचे? त्यापेक्षा एका गरजू व्यक्तीला अवयवदान करून त्याला नवीन आयुष्य आपण देऊ शकतो. कारण, मृत्युपश्चात आपले अवयव नष्टच होणार आहेत. पण, त्यांचा जीवदानासाठी केलेला उपयोग लाखमोलाचा आहे. अवयदानाविषयी समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करून जनजागृती करण्यासाठी सर्वच स्तरातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सर्व दानांमध्ये नेत्रदान हे बहुमूल्य दान मानले जाते. कारण, दृष्टीहीन लोकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. अशा व्यक्तींना नेत्रदात्यांची गरज असते. त्यामुळेच नागरिकांनीच पुढे येऊन नेत्रदान मोहिमांमध्ये सहभाग घ्यावा, असा अतिशय सुंदर विचार पटेला मांडतात. याशिवाय भारतातील आणि जगभरातील महिलांच्या आरोग्यासाठीसुद्धा रूप पटेला कार्यरत आहेत. महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी जगभरात त्यांनी मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली आहेत.

 

दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान तेथील स्त्रियांमधील आरोग्याबाबत असणारी अनास्था बघून त्यांनी स्त्रियांच्या आरोग्यासाठी जागरूतीची सुरुवात केली. भारतातील अनेक राज्यांत यासंबंधी काम करीत आहेत. विशेषत: मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या गोष्टीबाबत अजूनही महिलांमध्ये जागरुकता नाही. यासाठीच दिल्ली येथे त्यांनी शाळकरी मुलींना घेऊन जागृतीपर रॅली काढली. यात गावातील अनेक मुलींनी स्वत:हून पुढाकार घेत सहभाग घेतला. मुलींमधील वाढता आत्मविश्वास याचे प्रतीकच आहे. सर्व स्त्रियांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा पूर्ण हक्क आहे. मात्र, अनेक महिला या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. महिला आरोग्यविषयक जागृतीच्या कामाचा आवाका त्यांना वाढवायचा असून त्यांनी रोटरी क्लबबरोबर काम करण्यास सुरुवात केली आहे. यातून सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. असाच एक अनोखा उपक्रम रूप पटेला यांनी हाती घेतला. हा विशेष उपक्रम म्हणजे २३ फेब्रुवारीला रोटरी क्लबकडून ‘गेट वे ऑफ इंडिया’पासून ते पवईपर्यंत म्हणजे ८९ किलोमीटर डोळ्यावर पट्टी बांधून धावत त्यांनी अवयवदान जागृतीचा संदेश दिला. यात जमा झालेल्या निधीचा उपयोग त्यांनी रोटरी रुग्णालय बांधण्यासाठी केला असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होते आहे. त्यांच्याकडून अनेकांनी प्रेरणा घेणे आवश्यक आहे. त्यांच्या ‘नेत्रदान हेच श्रेष्ठ दान‘ या मोहिमेत सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. कारण, यात समाजप्रबोधनाची गरज असून लाखो-हजारो लोकांचे पाठबळ हवे आहे. त्यांच्या या आगळ्या-वेगळ्या समाजकार्यासाठी अनेक शुभेच्छा...!

 

- कविता भोसले

  

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat