मध्यरात्रीचे युद्ध

    दिनांक  24-Apr-2019धृष्टद्युम्नाच्या रथाचा आणि धनुष्याचा अश्वत्थाम्याने नाश केला व त्यास पळवून लावले. इकडे दुर्योधन आणि भीमाची जुंपली. सोमदत्त सात्यकीशी लढला. सात्यकीने एका तीक्ष्ण बाणाने सोमदत्तास मारले.


राधेय येत असलेला पाहून पांडवांच्या सैन्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले. राधेयाने अनेक सैनिक मारले, असुरांशी लढाई करणाऱ्या देवांप्रमाणे तो दिसत होता. त्याला अर्जुन सामोरा गेला. आकाशात फक्त तारे दिसत होते. अंधारात दोघांनी सोडलेले बाण आणि भाले हे विद्युतलतेप्रमाणे चमकत होते. दुर्योधन रागाने बेभान होऊन राधेयाच्या मदतीला आला. हे पाहून कृप अश्वत्थाम्याला म्हणाले, “दुर्योधन संकटात आहे. त्याच्या रक्षणास जा.” अश्वत्थामा दुर्योधनाच्या जवळ आला आणि म्हणाला, “राजा, आम्ही असताना तू कशासाठी लढत आहेस? या अर्जुनाला मी पाहतो. तू नि:शंक हो.” दुर्योधन म्हणाला, “तुझे पिता द्रोण अर्जुनाचे रक्षण करतात. कारण, तो त्यांचा आवडता शिष्य आहे आणि तूसुद्धा तुझ्या पित्याची री ओढत आहेस. तुलादेखील पांडव आवडतात हेच तर माझे दुर्दैव आहे.” अश्वत्थामा म्हणाला, “आम्हाला पांडव आवडतात हे खरे आहे. पण, युद्धात आम्ही भावना बाजूला ठेवतो. तू खूप संशयी आहेस म्हणून तुला असे वाटते. आज तू पाहशील मी पांडवांशी कसा लढतो ते!” तो खरोखर त्वेषाने पांडवांशी लढू लागला. त्याने धृष्टद्युम्नाचा पराभव केला. शस्त्रांपेक्षा दोघांची शाब्दिक लढाई भयंकर होती. कारण, दोघेही एकमेकांचा टोकाचा द्वेष करत होते. धृष्टद्युम्नाच्या रथाचा आणि धनुष्याचा अश्वत्थाम्याने नाश केला व त्यास पळवून लावले. इकडे दुर्योधन आणि भीमाची जुंपली. सोमदत्त सात्यकीशी लढला. सात्यकीने एका तीक्ष्ण बाणाने सोमदत्तास मारले. युधिष्ठिराने काही काळ द्रोणांना बेशुद्ध पाडले. ते शुद्धीवर आल्यावर त्यांनी वायव्यास्त्र सोडले आणि त्यास उत्तर म्हणून युधिष्ठिरानेही वायव्यास्त्र सोडले. कृष्णाने युधिष्ठिराला द्रोणांपासून बाजूला नेले. कारण, द्रोण त्याला अटक करतील अशी त्याला भीती वाटत होती.

 

रात्री इतका गडद अंधार होता की, अनेक योद्धे शत्रूचे सैनिक समजून आपलेच सैनिक मारत होते. मग द्रोण व दुर्योधन यांनी मशाली मागवल्या. पांडवांनी पण मशाली मागवल्या आणि मशाली हातात धरून सैनिक युद्ध करू लागले. राधेय व सहदेव यांच्यात युद्ध झाले. राधेयने सहदेवाचा रथ मोडला, घोडे मारून टाकले आणि धनुष्य तोडले. तो रथाचे चाक हाती घेऊन खाली उतरला, तसे राधेयने बाण सोडून त्या चाकास खिळ घातली आणि जवळ येऊन आपल्या धनुष्याचा सहदेवाच्या खांद्याला स्पर्श करून सहदेवास म्हणाला, “जे शक्य नाही ते तू करू नकोस. तुझ्या बरोबरीच्या योद्ध्यांशी लढ. तुझ्या भावाला, अर्जुनाला साथ दे अथवा घरी जाऊन बस!” अशा रीतीने राधेयने सहदेवाचा घोर अपमान केला. शक्य असूनही त्याने आपल्याला ठार कसे केले नाही याचे सहदेवास आश्चर्यच वाटले. तो पांडवांच्या सैन्याकडे निघून गेला. शल्याने विराट राजास मारले. अर्जुनाने अल राजाचा पराभव केला. नकुलाने शकुनीचा पराभव केला आणि कृपाचार्यांनी शिखंडीचा वध केला. द्रोण व धृष्टद्युम्न यांच्यात भयंकर लढाई सुरू झाली. तसेच सात्यकी व राधेय यांच्यातही घनघोर युद्ध झाले.

 

दुर्योधन व शकुनी अर्जुनावर चालून गेले. पण, अर्जुन त्यांना बधत नव्हता. एका बाजूस अर्जुनाचा पराक्रम, तर दुसऱ्या बाजूला राधेय, द्रोण, अश्वत्थामा यांचा पराक्रम असे ते भयंकर युद्ध त्या रात्री सुरूच होते. राधेयने धृष्टद्युम्नाचा दारुण पराभव केला. त्याची मुसंडी पाहून अर्जुन कृष्णास म्हणाला, “कृष्णा, मला असे वाटते आहे की, युधिष्ठिर राधेयचा पराक्रम पाहून भयभीत झाला असून आपले सैन्य आता टिकणार नाही, या शंकेने व्याकुळ झाला आहे. तू माझा रथ राधेयसमोर घेऊन चल. मला त्याचा वध करायचा आहे.” पण, कृष्णाला हे मान्य नव्हते. कारण, राधेयकडे इंद्राने दिलेली ‘वासवी’ शक्ती आहे, हे त्याला माहिती होते आणि त्या शक्तीचा वापर तो अर्जुनावरच करणार आहे हेही त्याला ठाऊक होते. म्हणून तो म्हणाला, “अर्जुना, आणखीन एक पर्याय आहे. राधेयला तुल्यबळ असा एक योद्धा आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे, घटोत्कच! तो नक्कीच त्याचा पराभव करेल आणि तो त्याचा समाचार घेत असताना तू द्रोणांशी लढ, जेणेकरून युधिष्ठिर वाचेल अन्यथा द्रोण त्याला कैद करून घेऊन जातील.” अर्जुनाला खरे तर राधेयवर तुटून पडायचे होते. पण, ‘युधिष्ठिराचे रक्षण’ हा तर महत्त्वाचा मुद्दा होता आणि घटोत्कच राधेयशी लढू शकतो हे तर स्पष्ट होते. त्यामुळे त्याने मनाविरुद्धच कृष्णाला होकार दिला. अर्जुनाने घटोत्कचाला बोलावले. कृष्णाने स्मित करत त्यास म्हटले, “घटोत्कचा, आता आमची मदार तुझ्यावर आहे. हा राधेय आपल्या सैन्याचा अतोनात संहार करतो आहे. त्याला तूच पायबंद घालू शकतो. तू मायावी तंत्र वापरण्यात प्रवीण आहेस. रात्रीचे युद्ध तुला छान जमते. तुझ्या दिव्य अस्त्रांनी तू राधेयला ठार कर आणि कौरवांचे सैन्य नष्ट कर. या घडीला तुझी पांडवांना खूप मोठी मदत होणार आहे. द्रोण व अश्वत्थामा यांचा समाचार अर्जुन घेईल आणि राधेयास तू पराभूत कर.” हे ऐकून राधेयच्या वधाची संधी आपल्याला मिळाली म्हणून घटोत्कच संतोषला. अर्जुनाने सात्यकीस घटोत्कचाच्या मदतीस पाठवले. घटोत्कचाला समोर पाहून कौरवांच्या सैन्याच्या उरात धडकीच भरली! (क्रमश:)

 

- सुरेश कुळकर्णी

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat