मुंबईच्या किनाऱ्यांवर 'ब्ल्यू-बटन' जेलिफिश

    दिनांक  23-Apr-2019

विषारी नसले तरी सागरी अभ्यासकांकडून खबरदारी घेण्याचे आवाहन

 
मुंबई (अक्षय मांडवकर) : समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या वेग वाढल्याने मुंबईच्या किनाऱ्यालगत जेलिफिशचे आगमन झाले आहे. मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर हजारोच्या संख्येने जेलिफिशच्या प्रजातीमधील ब्ल्यू-बटनजेलिफिश वाहून येत आहेत. हा जेलिफिश कमी विषारी असला तरी त्यापाठोपाठ येणारे ब्ल्यू-बॉटलजेलिफिश विषारी असल्याने नागरिकांनी उत्साहाच्या भरात समुद्रात उतरू नये, असा सल्ला सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांनी दिला आहे.
 


 

 

समुद्रात हेलकावे घेणाऱ्या छत्रीच्या आकाराचे जेलिफिश आकर्षक दिसत असले तरी त्यातील काही प्रजाती विषारी दंश करणाऱ्या असतात. गेल्या काही वर्षांत मुंबईत जेलिफिशच्या डंखामुळे नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबईच्या सागरी परिसंस्थेत सुमारे तीन प्रकारचे जेलिफिश आढळतात. ठरावीक मोसमात हे जेलिफिश किनाऱ्यालगत येतात. पावसाळ्याआधी ब्ल्यू-बटन’, पावसाळ्यात ब्ल्यू-बॉटलआणि पाऊस ओसरल्यावर बॉक्सजेलिफिश किनाऱ्यालगत येतात. हलके असल्याने वाऱ्याच्या दिशेने हेलकावे खात ते समुद्रकिनारी पोहोचत असल्याची माहिती सागरी अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी दिली. मार्चनंतर समुद्राकडून जमिनीच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग वाढत असल्याने जेलिफिश मुंबईच्या किनाऱ्यावर वाहून येत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 

गेल्य़ा काही दिवसांत जुहू, गोराई आणि कळंबच्या किनाऱ्यावर मोठ्य़ा संख्येने 'ब्ल्यू बटन' जेलिफिश वाहून आल्याचे निरीक्षण 'मरीन लाईफ आॅफ मुंबई'च्या कार्यकर्त्यांनी नोंदवले आहे. त्यामुळे येत्य़ा काही दिवसांत गिरगाव चौपाटीवरही या जेलिफिशच्या आगमनाची शक्यता वर्तवली जात आहे. दोन रुपयांच्या नाण्यासारखे शरीर असलेल्या या जेलिफिशला दोन इंच लांबीचे दोरीसारखे पाय असतात. हे जेलिफिश अधिक विषारी नसले तरी त्यांना न हाताळण्याचा सल्ला पाताडे यांनी दिला आहे. तसेच या जेलिफिशच्या पाठोपाठ ब्ल्यू-बॉटल हे विषारी जेलिफिश किनाऱ्यालगत येत असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

 
 

वन्यजीव व पर्यावरण विषयक मजकूरासाठी लाईक करा...


facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat