राज्यात मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण

    दिनांक  23-Apr-2019


 मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात सरासरी ३५.७० टक्के मतदान झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, बारामती, अहमदनगर, सांगली, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, माढा, पुणे व हातकणंगले या १४ मतदार संघामध्ये राज्यात मतदान होत आहे. यासाठी २४९ उमेदवार रिंगणात असून २ कोटी ५७ लाख ८९ हजार ७३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
 

राज्यात आतापर्यंत सरासरी ३५.७० टक्के मतदान

 
राज्यात दुपारी एक वाजेपर्यंत राज्याच्या १४ मतदार संघात सरासरी ३५.७० टक्के मतदान झाले आहे. उन्हाचा पारा वाढत असला तरीही मतदार मतदानासाठी बाहेर पडत आहेत. जळगावमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत ३३.१२, रावेरमध्ये ३५.१५, जालन्यात ३७.९१, औरंगाबादमध्ये ३५ .४२, रायगडमध्ये ३८.७४, पुण्यामध्ये २७.१७, बारामतीमध्ये ३५.५८, अहमदनगरमध्ये ३४.७३, माढ्यात ३३.४१, सांगलीत ३४.५६, सातारा ३४.९४, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ४०, कोल्हापूरात ४२.०४ तर हातकणंगले ३९.६८ टक्के मतदान झाले आहे.
 

मतदानासाठी आवश्यक ११ कागदपत्र

 

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat