जागतिक ग्रंथ दिन विशेष : ग्रंथ निघाले लंडनला!

    दिनांक  23-Apr-2019


नाशिक : नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात येत असलेली ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना आता लंडन शहरातदेखील सुरू करण्यात येणार आहे. ‘जागतिक ग्रंथ दिना’च्या निमिताने कुसुमाग्रज प्रतिष्ठान आणि इल्फर्ड मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. योजनेचे जनक विनायक रानडे व लंडनस्थित समन्वयक सागर डुघरेकर यांच्या माध्यमातून ही योजना आता साहेबांच्या देशात मराठी पुस्तकांची उपलब्धी तेथील मराठी वाचकांना करून देणार आहे.

 

भारताबाहेरील ग्रंथ तुमच्या दारी’ या संकल्पनेचे स्वरूप नेमके काय असेल?, याबाबत माहिती देताना विनायक रानडे यांनी सांगितले की, “दर्जेदार विविध विषयांची, लेखकांची २५ पुस्तकांची एक पेटी यात असणार आहे. ज्यामध्ये उत्तमोत्तम, निवडक मराठी अथवा इतर भाषांतील साहित्याचा मराठीत अनुवाद असलेल्या पुस्तकांचा समवेश असणार आहे. सहित्याचे, लेखनशैलीचे जास्तीत जास्त प्रकार जसे कथा, कादंबरी, विनोदी, रहस्य, चरित्र, प्रवासवर्णन यांसारख्या विषयांवरील पुस्तके या ग्रंथपेटीत समाविष्ट असतील.”

 

थोडक्यात सर्वसमावेशक ग्रंथसंपदा या पेटीत असेल, असे रानडे यांनी सांगितले. ग्रंथसंपदा वाचनासाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेदेखील ते यावेळी म्हणाले. एका वाचक कुटुंबाकडे सदर ग्रंथपेटी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी असेल. प्रत्येक ग्रंथपेटीतील पुस्तके वेगवेगळी असल्याचे रानडे यांनी सांगितले. दर तीन महिन्यांनी वाचक गटातील ग्रंथपेटी इतर गटांसोबत बदलण्यात येणार असून या माध्यमातून वाचकांना विविध प्रकारची ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 

ग्रंथ तुमच्या दारीच्या विक्रमी घोडदौडीबाबत बोलताना रानडे म्हणाले की, “या संकल्पनेत १६६१ ग्रंथपेट्या असून सुमारे दोन कोटी रुपयांची ग्रंथसंपदा या संकल्पनेत समाविष्ट आहे. आजवर महाराष्ट्र, गोवा, गुजरात, दिल्ली, सिल्व्हासा, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, ओमान, बे एरिया सॅनफ्रान्सिस्को , मॉरिशस, सिंगापूर आणि आता लंडन येथे ही संकल्पना राबविण्यात आली असल्याचे रानडे यांनी सांगितले.

 

कुसुमाग्रज प्रतिष्ठान वाचनालयाच्या समृद्धीसाठी प्रत्येकाने त्याच्या वाढदिवसानिमित्त पुस्तक खरेदीसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला यथायोग्य देणगी द्यावी, या आवाहनाला उत्स्फूर्त तसेच उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. वाढदिवस, एकसष्ठी, पंच्याहत्तरी, सहस्त्र चंद्रदर्शन तसेच दिवंगत आप्तेष्टांच्या स्मरणार्थ अशा अनेक प्रसंगानुरूप मिळालेल्या देणग्यांना भारतात ८० जी अंतर्गत आयकरात सूट असल्याने असंख्य मराठी वाचकांना त्यांच्या निवासी भागात, कार्यालयात, दवाखान्यात अशा त्यांच्या जवळपासच्या भागात वाचनासाठी विनामोबदला विनासायास उपलब्ध करून देता आल्याचे त्यांनी सांगितले. भारताबाहेरील आपल्या देशातील मराठी वाचकांसाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजना सुरू करण्यासाठी ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ ला सहकार्य करण्याचे आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले.

 

वाचन संस्कृती लयाला जाते आहे आणि आपल्या मराठीचे काही खरे नाही, अशी ओरड करणार्‍यांना ‘ग्रंथ तुमच्या दारी’ सारखी योजना म्हणजे एक चांगलीच विस्मयचकित करणारी गोष्ट वाटेल. जगभरात आज मराठी माणूस नाही, अशी भूमी नाही म्हणजेच ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेच्या भरारीला आता आकाशाला गवसणी घालण्यास कोणतीच बंधने नाहीत. जिथे म्हणून मराठी शब्द, मराठी भाषा आहे, मराठी माणूस आहे, तिथे तिथे आमची योजना जावी, अशी आमची इच्छा आहे. एका छोट्याशा कल्पनेला आज जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, तो उत्तरोत्तर वाढावा, हीच आमची संकल्पना आहे.

 

- विनायक रानडे, विश्वस्त, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat