निवडणूक आयोगाने जप्त केला १२४ कोटींचा मुद्देमाल

23 Apr 2019 16:20:09



मुंबई : राज्यात आचारसंहिता कालावधीत पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभाग आदी विभागांकडून काटेकोर कार्यवाही सुरू आहे. या विभागांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत रोख रक्कम, दारु, मादक पदार्थ, सोने- चांदी आदी स्वरुपात १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली. पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभाग आदी विभागांकडून केलेल्या कारवाईमध्ये १२३ कोटी ७५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये ४६ कोटी ६२ लाख रुपये रोकड, २३ कोटी ९६ लाख रुपये किमतीची ३ कोटी ८ लाख ७९३ लिटर दारु, ७ कोटी ६१ लाख रुपयांचे मादक पदार्थ, ४५ कोटी ४७ लाख रुपयांचे सोने, चांदी यांचा समावेश आहे.

 

राज्यात आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडीत इतर स्वरुपाचे २२ हजार ७९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये पोलीस विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत शस्त्र परवानाधारकांकडून ४० हजार ३३७ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. सूचना देऊनही जमा न केलेली ३० शस्त्रे जप्त करण्यात आली असून १३५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच १ हजार ५७१ विनापरवाना शस्त्रे, ५६६ काडतुसे आणि १८ हजार ५१३ जिलेटीन आदी स्वरूपाचे स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, ‘सी-व्हिजिलॲपवर आतापर्यंत ३ हजार ५६१ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी २ हजार ३४ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून त्यामध्ये जिल्हा स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

Powered By Sangraha 9.0